Yashomati Thakur Saam Tv
महाराष्ट्र

यशोमती ठाकूर यांचा महायुती सरकारवर हल्लाबोल, 'भाऊ, भाई, दादा...'

Yashomati Thakur letter to Mahayuti government : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. हिवाळी अधिवेशनात लिहिलेल्या पत्रातून कृषी धोरणांवर गंभीर आरोप केले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमरावती -नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी बोचऱ्या शब्दांत पत्र लिहून महायुती सरकारचे कान टोचले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भाऊ, भाई, दादा असा उल्लेख करत यशोमती ठाकूर यांनी एक पत्र लिहिले आहे.

ॲड. ठाकूर यांनी स्वतःला 'लाडकी बहीण' म्हणत लिहिलेल्या या पत्रातून महायुती सरकारच्या शेतकरी धोरणांवर चौफेर हल्ला चढवला आहे. पुरवणी मागण्यांमध्ये कृषी क्षेत्रासाठी केलेली तरतूद म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे, असा घणाघाती आरोप त्यांनी केला आहे. 

पत्रात काय म्हटले ?

दादांनी मांडलेल्या ७५,२८६ कोटींच्या पुरवणी मागण्या म्हणजे शेतकऱ्यांसाठी 'खोदा पहाड, निकला चुहा' असा प्रकार आहे. २८ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि अवकाळीने खरीप-रब्बी दोन्ही हंगाम मातीमोल केले. त्यासाठी सरकारने ऑक्टोबरमध्ये जाहीर केलेले ३१,६२८ कोटींचे पॅकेज केवळ 'कागदी घोडा' ठरले. कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रती हेक्टर १८,५०० रुपये मदतीचे गाजर दाखवले, पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरात फक्त ८,५०० रुपये टाकले. त्यातही 'केवायसी'च्या जाळ्यात अडकवून बहुतांश शेतकऱ्यांची मदत अडवून ठेवण्यात आली आहे.

कृषी विभागाने ६,००० कोटी रुपयांची मागणी केली असताना सरकारने शेतकऱ्यांसाठी केवळ ६१६ कोटी रुपये दिले. यामध्येही बहुतेक निधी गोशाळा आणि नौकांच्या दुरुस्तीसाठी आहे. तसेच चार महिन्यांपूर्वी 'कृषी समृद्धी' योजनेची मोठी घोषणा केली, पण आजपर्यंत या योजनेसाठी 'एका कवडीचाही निधी' मिळाला नाही. याचा अर्थ, शेतकऱ्यांच्या पदरात प्रत्यक्षात काहीच पडणार नाही, हे 'लाडक्या बहिणी'ने उघड करून दाखवले आहे.

तब्बल ४२ लाख शेतकऱ्यांच्या पदरात अनुदानाचा लाभ पडला नसल्याचा आरोपही ठाकूर यांनी केला. गतकाळात विविध योजनांतर्गत ४२ लाख शेतकऱ्यांच्या अनुदानाच्या अर्जांना मंजुरी मिळाली आहे. पण त्यासाठी लागणारे ३०,००० कोटी रुपये कधी मिळणार, असा थेट सवाल ठाकूर यांनी उपस्थित केला आहे. आर्थिक वर्ष संपायला अडीच महिने उरले असताना कृषीसाठी अर्थसंकल्पीय तरतुदीच्या केवळ ३४ टक्के निधी खर्च झाला आहे. उर्वरित निधी कधी खर्च करणार, असा सवाल विचारत ठाकूर यांनी धक्कादायक प्रकार उघड केला.

ठाकूर यांनी पुढे लिहिले की, एका बाजूला बियाणे, खते, कीटकनाशके यांच्या किमती १७५ टक्क्यांनी वाढल्या, तर दुसरीकडे शेतमालाचे दर मातीमोल झाले. पांढरं सोनं (कापूस) काळवंडून गेलंय, पिवळं सोनं (सोयाबीन) मातीमोल झालंय आणि कांदा शेतात सडतोय. शेतकऱ्यांनी जगायचं कसं, हे तुम्हीच सांगा, असा सवालही केला. सोयाबीनचे दर ७,५०० वरून ४,०००-४,१०० रुपयांवर कसे आले, याचा हिशेबही त्यांनी मागितला.

विदर्भ, मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचा मुद्दा दिवसेंदिवस भीषण बनत आहे. सत्तेवर येताना 'महाराष्ट्रात कोणताही शेतकरी आत्महत्या करणार नाही' असा पण करणाऱ्या 'भाऊ, भाई आणि दादा' यांना अॅड. ठाकूर यांनी आरसा दाखवला. आज राज्यात दररोज किमान ११ शेतकरी स्वतःचं जीवन संपवत आहेत. १ जानेवारी २०२५ ते ३१ ऑगस्ट २०२५ या आठ महिन्यात विदर्भ मराठवाड्यात १ हजार १८३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी देत शेतकरी आत्महत्येत महाराष्ट्र देशात अव्वल आहे, या वस्तुस्थितीकडे त्यांनी लक्ष वेधले.

कोरोना काळात देशाला आधार देणाऱ्या कृषी क्षेत्राकडे निधीच्या बाबतीत केलेले हे दुर्लक्ष 'पुरोगामी महाराष्ट्राला परवडणारे नाही', अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. अखेरीस 'लाडकी बहीण' म्हणून त्यांनी कळकळीची विनंती केली. शेतकऱ्यांची ही आर्थिक कोंडी तत्काळ फोडा. शेतकऱ्याला नुसत्या शब्दांनी नाही, तर प्रत्यक्ष निधीच्या आधाराने जगवा, असे त्या म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EVM: उंदराने भेदला स्ट्राँगरुमचा पहारा, स्ट्राँगरुमचा दरवाजा उघडला, राज्यात खळबळ

Prithviraj Chavan: 19 डिसेंबरला होणार मराठी पंतप्रधान'; पृथ्वीराज चव्हाणाचं वक्तव्य, राज्यात खळबळ

Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईतील स्थानिक गुंडांकडून भररस्त्यात पोलिसांवर हल्ला

IND vs SA 3rd T20I: भारतीय 'धुरंधरां'चा करिष्मा; ७ विकेट राखत टीम इंडियाचा शानदार विजय, मालिकेत २-१नं आघाडी

ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना बसणार मोठा धक्का; बड्या महिला नेत्या भाजपमध्ये प्रवेश करणार?

SCROLL FOR NEXT