अहमदनगर ः पुत्रासाठी माय काय करेल, याचा अंदाज कोणीच बांधू शकत नाही. तिच्या प्रेमापुढे मनुष्य असो नाही तर जनावर त्याला खाली मान घालूनच निघून जावं लागते. संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्दची घटनाही अशीच. त्या मायेच्या लेकरावर बिबट्याने हल्ला केला. त्या आईने क्षणाचाही विचार न करता बिबट्यावर प्रतिहल्ला केला.
त्याचं असं झालं.... संगमनेर तालुक्यातील माणकेश्वर परिसरातील वस्तीवर सागर खताळ राहतात. त्यांना एक लहान मुलगा आहे. त्यांच्या पत्नी कविता जनावरांना चारा आणण्यासाठी घराजवळील शेतात गेल्या. त्यांच्या मागे मुलगा शिवराज (वय पाच) आला. Woman attacks leopard for child
आईजवळ आलेला असतानाच बिबट्या त्याच्या मागावर होता. त्याने संधी मिळताच शिवराज झडप घातली. आणि त्याची मान पकडण्याचा प्रयत्न केला. जवळच असलेल्या कविता यांच्या ही झटापट निदर्शनास आली.
त्यांनी मागचा पुढचा काहीच विचार केला नाही. मुलाला उचलून घेऊन जाणाऱ्या बिबट्यावर त्यांनी हल्ला चढवला. तेथे शेतात पडलेली काठी हाती घेत बिबट्यावर प्रतिहल्ला केला. अचानक झालेल्या हल्लाने बिबट्याही गोंधळला. त्यामुळे त्याला शिवराजला उचलून नेता आले नाही.
कविता यांनी मदतीसाठी आरडाओरड सुरू केला. बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु कविता यांनी काठीने प्रहार चालूच ठेवला. तेवढ्यात इतर लोकही मदतीला धावले. त्यामुळे बिबट्याने तेथून धूम ठोकली.
या हल्ल्यात शिवराजची मान, डोके, पाठ, तोंडावर बिबट्याचे दात व नखे लागले आहेत. जखमाही गंभीर आहेत. त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती समजताच संगमनेर भाग-एकचे वनक्षेत्रपाल नीलेश आखाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे पिंजरा लावला आहे. या घटनेमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कविता यांच्या प्रसंगावधानाबरोबरच त्यांनी दाखविलेल्या धैर्याचे कौतुक होत आहे. Woman attacks leopard for child
प्रवरा पट्ट्यात बिबटे वाढलेत
संगमनेरमधील प्रवरा पट्ट्यात बिबट्यांची संख्या वाढत आहे. शेतवस्तीवर राहणाऱ्या ग्रामस्थांनी अधिक सजग व सावध राहणे आवश्यक आहे. सायंकाळच्या वेळी लहान मुलांना एकटे सोडू नये, तसेच अंगणात खेळणाऱ्या मुलांवरही लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे.
- नीलेश आखाडे, वनक्षेत्रपाल, संगमनेर भाग-एक
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.