मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने मंगळवारी (२० फेब्रुवारी) विशेष अधिवेशन बोलावलं. या अधिवेशनात मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, दुसरीकडे सरकारने आमची फसवणूक केली असून आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण हवंय, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी आज (२१ फेब्रुवारी) दुपारी १२ वाजता जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा समाजाची निर्णायक बैठक बोलावली आहे. या बैठकीत मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार आहे. तत्पूर्वी बैठकीआधीच जरांगे यांनी राज्य सरकारला दिल्ली आंदोलनाचा इशारा दिला आहे. (Latest Marathi News)
"राज्य सरकार खरंच शहाणं असेल, तर त्यांनी ओळखावं की मराठा पूर्वीसारखा राहीला नाही. तो आता शहाणा झाला आहे. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आम्ही कुठेही शांततेत आंदोलन करायला तयार आहोत. त्यामुळे राज्य सरकारने सगेसोयरे अध्यादेशाची अंमलजावणी करून आतातरी कायदा पारित करावा, नसता आंदोलनाची दिशा ठरलीच म्हणून समजा", असा इशारा जरांगे यांनी सरकारला दिला.
"मराठा समाजाची एकदा बैठक सुरू झाली, तर आंदोलनाचा निर्णय ठरलाच म्हणून समजायचं आणि निर्णय ठरला, तारीख ठरली, की मराठे आंदोलनाच्या तयारीला लागले म्हणून समजायचं. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी घेतल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही", असंही जरांगे यांनी ठणकावून सांगितलं आहे.
आजच्या बैठकीत मराठा आंदोलनाचे स्वरुप तसेच दिशा ठरवली जाईल. आम्ही अंधार काहीच केलं नसून कुणाच्याही पाठीत खंजीर खुपसला नाही. आम्हाला जे करायचं होतं ते आम्ही सांगून केलं आहे. आता पुढचं आंदोलन कदाचित महाराष्ट्रापेक्षा बाहेर होईल. नुसता महाराष्ट्र हादरवून काही उपयोग नाही. आंदोलन लाल किल्ल्यावर जाणार, असं म्हणत जरांगेंनी दिल्ली आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.