मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली
राज्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत
राज्यात १५ लाख नोकऱ्या उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले
परदेशी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हेच खरे गेट वे ऑफ इंडिया असल्याचे मत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. स्वित्झर्लंडच्या दावोस येथे आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीत त्यांनी हे विधान केले. महाराष्ट्र हे भारताच्या भविष्याचे पॉवर हाऊस असल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी १४ लाख ५० हजार कोटी गुंतवणूकींचे १९ सामंजस्य करार झाले. यावेळी गुंतवणुकीसोबतच राज्यात १५ लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाचे प्रतिनिधीमंडळ दावोस येथे गेले आहेत. दावोस दौऱ्याच्या पहिल्याच दिवसापासून जगभरातील विविध क्षेत्रातील उद्योगांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी स्वारस्य दाखवण्यास सुरुवात केली. यातून गुंतवणुकीचा मोठा ओघ सुरु झाला आहे. या दौऱ्यावेळी दावोसमधील महाराष्ट्र पॅव्हेलियनचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
तब्बल १४ लाख ५० हजार कोटींचे गुंतवणूक करार करण्यात आला. या गुंतवणूकीसोबतच राज्यात १५ लाख रोजगार संधी निर्माण होणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, गुंतवणूक आणि सेवा विभागाच्या माध्यमातून यावेळी विविध विभागांनी आणि विविध क्षेत्रातील उद्योगांच्या प्रतिनिधी समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
हरित ऊर्जा, अन्न प्रक्रीया, पोलाद निर्मिती, आयटी-आयटीईस, डाटा सेंटर्सह ईव्ही- ऑटोमोबाईल, जहाज बांधणी, डीजिटल इन्फ्रा अशा विविध क्षेत्रातील ही गुंतवणूक मुंबईसह राज्याच्या रत्नागिरी, पालघर, गडचिरोली, अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये पोहचणार आहे. त्यामुळे या सर्व ठिकाणी उद्योग वाढीसह मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे.
या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, 'भविष्याचे वेध घेण्यासाठी सज्ज, विश्वासार्ह आणि दीर्घकाळचा भागीदार म्हणून महाराष्ट्र स्वागत करीत आहे. भारताच्या भविष्याचे पॉवर हाऊस म्हणून महाराष्ट्र जगाला, उद्योग विश्वाला साद घालत आहे. महाराष्ट्रावरील उद्योग क्षेत्राचा, गुंतवणूकदारांचा हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आम्ही सदैव सज्ज आहोत. येथे होणाऱ्या करारांवरील पुढील कार्यवाहीबाबत वॉर रूमच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येईल. उद्योजकांना आवश्यक सुविधा वेळेत आणि दर्जदार पद्धतीने मिळाव्यात याची काळजी घेतली जाईल.'
तसंच, ‘उद्योजक – गुंतवणूकदारांकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहता, यंदा गतवर्षीहून अधिक गुंतवणूक आणि रोजगार संधीचे सामंजस्य करार होतील असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. विशेषतः मुंबईतील घन कचरा व्यवस्थापन, हवा आणि पाणी गुण संनियत्रणाच्या माध्यमातून सर्क्युलर ईकॉनॉमीची संरचना उभी केली जात आहे. तसेच महाराष्ट्र हे अमर्याद संधीचे राज्य आहे. त्याबाबत आणि एमएमआर क्षेत्राच्या विकासासह, तिसऱ्या मुंबईच्या निर्मितीसाठी महाराष्ट्र आर्थिक सल्लागार समितीने आराखडा निश्चित करून दिला आहे. या माध्यमातून व्यवसायाच्या आणि चांगल्या पगाराच्या रोजगार निमिर्तीवर भर दिला जात आहे.', असे मुख्यमंत्री म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.