Clash between Awhad and Padalkar supporters : विधिमंडळाला गुरूवारी आखाड्याचे स्वरूप आले होते. विविध मुद्द्यांवर चर्चा करणाऱ्या विधिमंडळाच्या परिसरात आमदार जितेंद्र आव्हाड आणि गोपिचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. पण हा राडा इतक्यावरच थांबला नाही, जिवाभावाच्या कार्यकर्त्यासाठी मध्यरात्रीपर्यंत सुरू होता. कार्यकर्त्यांसाठी आंदोलनाला बसलेल्या आमदार जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी फरफटत नेले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. गुरुवारी झालेल्या या आंदोलनावर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या सर्व घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खेद व्यक्त केला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी या घटनेची गंभीर दखल घेत आहवाल मागवला असून कारवाईची घोषणा केली.
महाराष्ट्र विधिमंडळ परिसरात गुरुवारी रात्री आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीमुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. या घटनेने राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली असून, राजकीय आणि सामाजिक स्तरावर तीव्र टीका होत आहे. विधिमंडळात अशा प्रकारे घटना घडणं निंदनीय असल्याचे बोलले जातेय. पडळकर यांचे कार्यकर्ते मकोकाचे असल्याची टीका आव्हाडांनी केली आहे. पडळकर यांचे कार्यकर्ते मलाच मारण्यासाठी आल्याचा आरोपही यावेळी आव्हाड यांनी केलाय.
विधानभवन परिसरात १७ जुलै रोजी मध्यरात्री दोन ते तीन तास गोंधळ झाला. यादरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांपैकी नितीन देशमुख याला पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांची गाडी अडवून ठिय्या आंदोलन केले. यामुळे परिसरात तणाव वाढला. पोलिसांनी बळाचा वापर करत आव्हाड यांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आमदार आव्हाड यांना फरफटत गाडीपासून बाजूला केले. दुसऱ्या गाडीतून कार्यकर्त्याला घेऊन जाण्याचा प्रयत्न झाला. मात्र, आव्हाड यांनी ही गोष्ट लक्षात घेऊन पुन्हा आंदोलन तीव्र केले. या घटनेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार हे देखील उपस्थित होते.
पडळकर यांच्या गुंडांनी माझा कार्यकर्ता नितीन देशमुख विधानभवनात याला मारहाण केली.यानंतर मारहाण करणारे विधानभवनातून पळून गेले.शिवाय पोलिसांनी माझ्याच मार खाणाऱ्या कार्यकर्त्याला पकडलं.आणि विधानसभा सचिवांनी माझ्याच कार्यकर्त्याला पोलिस स्टेशनला नेण्याचा घाट घातला आहे. म्हणजे मार खाणार आमचा कार्यकर्ता,पळून जाणार पडळकर चे कार्यकर्ते आणि प्रशासन पकडून कारवाई कोणावर करत आहे तर आमच्याच कार्यकर्त्यांवर..! सत्ताधाऱ्यांना इतक शरण गेलेलं प्रशासन मी आजवर पाहिल नव्हतं..! या अधिकाऱ्यांकडे आत्मसन्मान नावाची काही गोष्टच नाही..! मी इतकच सांगतो, माझ्या कार्यकर्त्याला सोडल्याशिवाय मी उठणार नाही.!जितेंद्र आव्हाड, आमदार
आंदोलनावेळी जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले. मारहाण करणाऱ्या पडळकर यांच्या पाच कार्यकर्त्यांना पोलिसांनी सोडून दिले, तर मारहाण सहन करणाऱ्या नितीन देशमुख याला ताब्यात घेतल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी पोलिसांनी कथितरित्या मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांना वडापाव आणि तंबाखू पुरवल्याचा आरोपही आव्हाड यांनी केला.
पावसाळी अधिवेशनात जितेंद्र आव्हाड यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये बाचाबाची अन् शिविगाळ झाली. यानंतर विधानभवनाच्या लॉबीत आव्हाड आणि पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या वादात पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले आणि आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख यांच्यामध्ये लाथाबुक्क्यांनी हाणामारी झाली. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दात संपात व्यक्त करत कारवाईचे संकेत दिले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.