टीईटी २०२५ परीक्षा २३ नोव्हेंबर रोजी होणार
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १५ सप्टेंबरपासून सुरू होईल
२०१८ आणि २०१९ मध्ये गैरप्रकारात अडकलेले विद्यार्थी कायमस्वरूपी ठरले अपात्र
पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 'महाराष्ट्र शिक्षक पात्रता (टीईटी) २०२५’ ही परीक्षा येत्या २३ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी इयत्ता पहिली आणि आठवीच्या सर्व व्यवस्थापनांच्या सर्व परीक्षा मंडळांच्या शाळांमध्ये शिक्षक सेवक आणि शिक्षकपदांसाठी पात्रता परीक्षा होणार आहे. या परीक्षासाठी ऑनलाइन अर्ज येत्या सोमवारपासून भरता येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
राज्य परीक्षा परिषदेकडून टीईटी परीक्षेअंतर्गत इयत्ता पहिली ते पाचवी (पेपर एक) आणि इयत्ता सहावी ते आठवी (पेपर दोन) असे दोन पेपर घेण्यात येतात. सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे आणि सर्व माध्यमांच्या अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित अशा शाळांमध्ये शिक्षण सेवक आणि शिक्षकपदांवर नियुक्ती होण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागेल . त्याचबरोबर परीक्षेशी संबंधित शासन निर्णय आणि सूचना, तसेच ऑनलाइन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे आणि परीक्षेची वेळ आणि इतर सविस्तर माहिती अधिकृत संकेतसंस्थळावर उपलब्ध असणार आहे.
या टीईटी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरु होत आहे. विद्यार्थ्यांना 3 ऑक्टोबरपासून परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे. मात्र, काही प्रशासकीय अडचणीमुळे वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परीक्षार्थ्यांसाठी अद्ययावत माहिती राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात येईल, अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली.
ऑनलाइन अर्ज आणि परीक्षा शुल्क भरण्यासाठी १५ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर ही मुदत देण्यात आली आहे. तर प्रवेशपत्र ऑनलाइन प्रिंट काढून घेण्यासाठी १० ते २३ नोव्हेंबर हा कालावधी देण्यात आला आहे.
- टीईटी परीक्षा ही २३ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. पहिला पेपर हा सकाळी १०.३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत असेल. तर दुसरा पेपर हा दुपारी २.३० ते सायंकाळी ५.०० या कालावधीत असेल.
या परीक्षेबाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी महत्वाची माहिती दिली. 'शिक्षक पात्रता परीक्षा २०१८ आणि २०१९ मधील गैरप्रकारात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने गैरप्रकारात समाविष्ट विद्यार्थ्यांची संपादणूक रद्द करणे, यापुढे होणाऱ्या टीईटी परीक्षेत कायमस्वरूपी प्रतिबंधित, अशी शास्ती निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी अर्ज भरता येणार नाही. परीक्षेच्या गैरप्रकाराच्या यादीत नाव समाविष्ट असूनही खोटी आणि चुकीची माहिती भरून परीक्षा दिल्यास संबंधितांवर नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आयुक्त ओक यांनी स्पष्ट केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.