Nashik Raigad Guardian Minister : विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला न भूतो न भविष्यति असं यश मिळालं, पण त्यानंतर खातेवाटपापासून ते पालकमंत्रिपदापर्यंत प्रत्येकवेळी तिढा निर्माण झाला. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील वाद चव्हाट्यावर अनेकदा आलाय. आधी खातेवाटपाचे गुऱ्हाळ चालले, त्यानंतर आता पालकमंत्रिपदाचा तिढा आलाय. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून घोडं अडलंय. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीमध्ये चर्चा अन् रस्सीखेच सुरू आहे. भाजप नाशिकच्या पालकमंत्रिपदावर ठाम आहे, तर अजितदादा रायगड सोडण्यास तयार नाहीत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची कोंडी झाल्याचे चित्र आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंकडून तोडगा लवकर निघेल असं सांगण्यात येतेय, पण मंत्रिमंडळाच्या बैठकीपर्यंत यावर ठोस निर्णय होईल, असे दिसत नाही. (Dispute over Nashik and Raigad Guardian Minister in Mahayuti government)
नाशिकचे पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली, पण त्यानंतर शिवसेनेकडून याला विरोध करण्यात आला. दादा भुसे यांना नाशिकचे पालकमंत्रिपद द्या, या मागणीने जोर धरला. त्यात अजितदादा यांच्या राष्ट्रवादीनेही उडी घेतली. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनीही पालकमंत्रिपदावरून खंत व्यक्त केली. त्यामुळे नाशिकवरून महायुतीमधील खदखद समोर आली. २०२६ मध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे, त्यामुळे भाजप हे पालकमंत्रिपद सोडण्यास तयार नाही. नाशिक वेगाने विकसीत होणारे शहर आहे, त्यामुळेही भाजपचा या शहरावर डोळा आहे. शिवसेनेलाही नाशिक सोडायचं नाही.
रायगडच्या पालकमंत्रिपदावरून राष्ट्रवादी आणि शिवसेना भिडण्याची पहिली वेळ नाही. याआधीही महायुतीच्या सरकारमध्ये तटकरे आणि गोगावले रायगडवरून आमनेसामने आले होते. आता गोगावले यांना मंत्रिपद मिळाले, त्यामुळे रायगडच्या पालकमंत्रिपदावर त्यांना दावा ठोकलाय. तटकरे आणि गोगावले यांच्यातील संघर्ष महाराष्ट्राने पाहिलाय. आदिती तटकरे यांची पालकमंत्रिपदी वर्णी लागताच गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली. त्याशिवाय गोगावले समर्थकांनी आंदोलने केली होती. रायगडचे पालकमंत्रिपदासाठी शिवसेना आमदार आक्रमक झाले आहेत. त्यात सुनील तटकरे रायगड सोडण्यास तयार नाहीत. रायगडवर अजितदादा आणि एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात? याकडे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या नजरा लागल्या आहेत.
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या निर्णयामुळे एकनाथ शिंदेंची मात्र कोंडी झाली आहे. भाजप नाशिक आणि राष्ट्रवादी रायगड सोडण्यास तयार नाहीत. तर शिवसेना मंत्री गोगावले आणि दादा भुसे यांना आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद हवेय, त्यांची समजूत शिंदेंना काढावी लागेल. शिवसेना कार्यकर्ते आणि आमदार यांच्याकडून नाशिक, रायगडचे पालकमंत्रिपदाची मागणी केली जातेय. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यापुढे मोठी कोंडी झाली आहे. एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात? त्याकडे शिवसैनिकांच्या नजरा खिळल्या आहेत.
भाजप नाशिक सोडण्यास कोणत्याही परिस्थितीमध्ये तयार नाही, तर अजितदादा रायगडवर ठाम आहेत. या दोन ठिकाणी कोणता पालकमंत्री होणार, याकडे याकडे राज्याचे लक्ष लागलेय. सरकार सत्तेत येऊन दोन महिन्याचा कालावधी उलटला पण रायगड,नाशिकचा पेच सुटला नाही. यावर तोडगा काढण्यासाठी दोन दिवसांत बैठक होऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक आणि रायगड या दोन ठिकाणी महायुती सह-पालकमंत्री म्हणून दोन जणांची निवड केली जाऊ शकते. त्याशिवाय काही पालकमंत्रिपदाची अदलाबदली होऊ शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.