सचिन बनसोडे, साम टीव्ही
राज्यभरात सध्या दुष्काळाने थैमान घातले आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर बळीराजा देखील चिंतेत सापडला आहे. पावसाने पाठ फिरवल्याने धरणे देखील कोरडे पडले आहेत. यामुळे पाणीटंचाईच्या झळा आता ग्रामीण भागासह शहरी भागालाही जाणवत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपुर शहरात भीषण पाणीबाणी दिसून येत असून दररोज पाणी पुरवठा होणाऱ्या शहराला आता आठ दिवसांनी पाणी मिळणार आहे.
केवळ 11 दिवस पुरेल इतकेच पाणी तलावात शिल्लक असून आवर्तन सुटे पर्यंत पाणी पुरवावे लागणार असल्याने श्रीरामपुर शहरवासीयांना आता कठीण परिस्थीतीचा सामना करावा लागणार आहे.
सलग 365 दिवस पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या श्रीरामपुर नगरपरिषदेवर आठ दिवसातून एकदा म्हणजे दर बुधवारी पाणी पुरवठा करण्याची नामुष्की ओढावली आहे. पुढील अडीच महिने तरी पाण्याची टंचाई भासणार आहे. भंडारदरा धरणातून 16 डिसेंबर रोजी पिण्याचे आवर्तन सुटणार आणि त्यानंतर 20 ते 21 डिसेंबर पर्यंत पाणी नगरपरिषदेच्या तलावात पोहचेल.
नागरिकांना पुढील अडीच महिने संकटकालीन परिस्थितीला सामोरे जावं लागणार असून नागरिक पाणी साठवण्यासाठी मिळतील ते भांडे, ड्रम आणि पाण्याच्या टाक्या खरेदी करत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. नगरपरिषद प्रशासनाने शहरातील पाणीसाठा असलेल्या विहीरी आणि बोअरवेल अधिग्रहीत करण्याचा निर्णय घेतला असून श्रीरामपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मनोज उकिर्डे यांनी पाणी बचत करण्याचं आवाहन केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.