वडवणी न्यायालयात सरकारी वकिल विनायक चंदेल यांनी आत्महत्या केली.
आत्महत्येपूर्वी सर्वोच्च न्यायालयाला ई-मेल पाठवून गंभीर आरोप केले होते.
ई-मेल आणि सुसाईड नोटमुळे तपासाच्या दिशेला नवं वळण लागलं आहे.
घटनेनंतर न्यायव्यवस्थेवरील विश्वासाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
बीड जिल्ह्यातील वडवणी येथे घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. बुधवारी (२० ऑगस्ट) वडवणी येथील स्थानिक न्यायालयात सरकारी वकील विनायक चंदेल यांनी खिडकीला दोरी बांधून आत्महत्या करून आपले जीवन संपवले. अचानक घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला. न्यायालयाच्या आवारात घडलेल्या या आत्महत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच एक नवा धक्कादायक ट्विस्ट समोर आला आहे.
विनायक चंदेल यांनी बुधवारी वडवणी येथील स्थानिक न्यायालयात आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाला एक ई-मेल पाठवला होता. या ई-मेलमध्ये त्यांनी न्यायालयातीलच काही व्यक्तींवर गंभीर आरोप केले होते. विशेष म्हणजे, आत्महत्येनंतर पोलिसांच्या हाताला हा ई-मेल आणि एक सुसाईड नोट लागली असून दोन्हीही त्यांच्या मुलगा विश्वजीत चंदेल यांनी आपल्याच वडिलांची असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या घटनेला आणखी गंभीर वळण मिळाले आहे.
विनायक चंदेल यांनी सर्वोच्च न्यायालयाला केलेल्या ई-मेलमध्ये त्यांनी न्यायाधीश रफिक शेख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. चंदेल यांच्या मते, न्यायाधीश शेख कोर्टात सर्वांसमोर त्यांचा अपमान करत होते, त्यांचे अर्ध स्वीकृत होत नव्हते, तसेच मनमानी पद्धतीने आदेश पारित केले जात होते. केवळ एवढेच नाही, तर न्यायालयातील क्लार्क तारडे यांनी देखील स्वतःला अपमानास्पद पद शब्द वापरून हिणवले असल्याचे त्यांनी ई-मेलमध्ये लिहिले होते. या सर्वांमुळे त्यांना मानसिक छळ सहन करावा लागत होता, अशा आशयाची तक्रार सर्वोच्च न्यायालयाला करण्यात आली होती.
आता या ई-मेलमुळे आणि सुसाईड नोटमुळे तपासाच्या दिशेला नवीन वळण लागले आहे. न्यायालयात आत्महत्या करणं हे अत्यंत गंभीर असून, सरकारी वकिलासारख्या जबाबदार पदावरील व्यक्तीने एवढं टोकाचं पाऊल उचलणं ही न्याय व्यवस्थेसाठी मोठी धोक्याची घंटा मानली जात आहे. विशेष म्हणजे, आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्यांचा उल्लेख स्पष्टपणे पत्रात केल्यामुळे तपास अधिक गुंतागुंतीचा झाला आहे.
सध्या या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून सुरू असून सर्वोच्च न्यायालयाला ई-मेल पाठविण्याच्या संदर्भातही चौकशी केली जात आहे. आत्महत्या प्रकरणामागे खरोखर न्यायालयातील छळ कारणीभूत होता का? की यामागे अन्य काही वैयक्तिक किंवा व्यावसायिक कारणं होती, याबाबत तपास अधिकाऱ्यांकडून पडताळणी केली जात आहे. दरम्यान, वकिलांच्या आत्महत्येच्या या घटनेनंतर न्यायालयीन यंत्रणेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सरकारी वकिलासारखी व्यक्ती जर स्वतःला न्यायालयात सुरक्षित वाटत नसेल, तर सामान्य नागरिकांचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास टिकणार कसा, असा सवाल समाजातून उपस्थित केला जात आहे. या घटनेमुळे केवळ बीड जिल्हाच नव्हे तर राज्यभरात कायदा क्षेत्रात खळबळ माजली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.