राजाभाऊ वाजेंना 100 कोटी आणि केंद्रीय मंत्रीपदाची ऑफर.
वाजेंनी ही ऑफर नाकारल्याचा आरोप, निष्ठावान नेत्यांची प्रतिष्ठा धोक्यात असल्याचे विधान.
वाजे यांच्या कुटुंबातील सदस्याला फोडल्याचा आणि उमेदवारी दिल्याचा भाजपावर आरोप.
या विधानामुळे नाशिक तसेच राज्यातील राजकीय वातावरणात खळबळ
सिन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा प्रचार शुभारंभप्रसंगी निष्ठावंतांचा मेळावा पार पडला. यावेळी माजी आमदार वसंत गिते यांनी भाजपावर शरसंधान करताना मोठा गौप्यस्फोट केला. राजाभाऊ वाजे यांना सत्ताधारी पक्षाकडून कशाप्रकारे ऑफर येत आहेत, याबाबत त्यांनी वक्तव्य केले. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.
माजी आमदार वसंत गिते यांनी राजाभाऊ वाजेंसारखा खासदार नाशिकला मिळाला हे नाशिकचे भाग्य असल्याचे गौरवोद्गार काढले. १०० कोटी आणि केंद्रात राज्यमंत्रीपद अशी ऑफर राजाभाऊ यांनी धुडकावून लावली आहे. अशा निष्ठावंत आणि नीतीवंत नेत्यांची प्रतिष्ठा आज पणाला लागली आहे. भाजपाने वाजे यांच्या कुटुंबातील सदस्याला फोडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी बहाल केली. किती पाठीत खंजीर खुपसनार् आणि एवढी विकृत बुद्धी कशी येते. ज्या कुटुंबाने सिन्नरसाठी आपले सर्वस्व वाहून दिले, त्यांना त्रास दिला जात आहे, असे माजी आमदार वसंत गिते म्हणाले.
कोण आहे राजाभाऊ वाजे?
राजाभाऊ वाजे यांची ठाकरेंच्या शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळख आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वाजे यांना ऐनवेळी तिकीट देण्यात आले. त्याची त्यांना कल्पना देखील नव्हती. विजय कारंजकर यांचे नाव चर्चेत असताना अनपेक्षित उमेदवार उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या लोकसभा निवडणुकीत दिल्याने अनेकांच्या भुवया देखील उंचवल्या होत्या. शिंदे गटाचे दोन वेळा खासदार राहिलेल्या हेमंत गोडसे यांचा त्यांनी तब्बल 1 लाख 60 हजार मतांच्या फरकाने विजय मिळवत हेमंत गोडसे यांचा दारुण पराभव केला होता.
लोकसभेत निवडून गेल्यानंतर राजभाऊ वाजे यांनी शहरातील अनेक महत्वाचे प्रश्न मांडले आणि ते ही थेट इंग्रजीमध्ये. ग्रामीण भागातून येणारे वाजे यांच्यावर भाषेवरून विरोधकांनी टीका केली होती. मात्र त्यानंतर त्यांनी धडाधड इंग्रजीमध्ये प्रश्न मांडत विरोधकांना प्रत्युत्तर दिले होते.
अशातच आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते वेगवेगळ्या पक्षांमध्ये कोलांट्या उड्या घेत आहे. यावरच माजी आमदार वसंत गिते यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.