Shiv Sena Dasara Melava
दसरा मेळावा मर्दांचा असतो आणि एकच असतो. हेच मर्द महाराष्ट्रात पुन्हा भगवा फडकविणार आहेत. मात्र ज्यांनी गद्दारी केली त्यांनी दिल्लीची चाकरी करावी, असा घणाघात विधानपरिषदेचे नेते अंबादास दानवे यांनी केला.
राज्यातल्या या पापी सरकारवर निसर्ग देखील कोपला आहे. राज्यात दुष्काळ पडला आहे. मात्र सरकारकडून एक रुपयाच्या विम्याचे गाजर दाखवले जात आहे. बुलेट ट्रेनसाठी ६ हजार कोटी एका झटक्यात मंजूर होतात. मात्र शेतकऱ्याला अनुदान मिळत नाही. हे या सरकारचे अपयश आहे. मागच्या हंगामात शेतकऱ्यांनी पिकवलेला कापूस अजून शेतकऱ्यांच्या घरात आहे. नवीन कापसाचं पीक आलं तरी शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मिळत नसल्याची टीका त्यांनी केली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा दसरा मेळावा मुंबईच्या छत्रपती शिवाजी पार्कमध्ये हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडला. मेळाव्यासाठी राज्यभरातून लाखो शिवसैनिक मुंबईत दाखल झाले होते.
खासदार संजय राऊत म्हणाले, आजच्या या दसऱ्या मेळाव्यातून पुढचे सरकार ठाकरे सरकार असल्याचा प्रत्यय येतोय. दुसरा मेळावा हा भाजपचा माज आहे तो २०२४ च्या निवडणुकीत उतरवला जाईल. बाळासाहेबांनी धगधगते निखारे तयार केले. मात्र जे निखारे विझून कोळसे झाले ते पळून गेले. भ्रष्टाचार करणाऱ्यांना उलटे लटकवू म्हणणारे अमित शहा महाराष्ट्रात खोके वाटून आमदार फोडतात. त्यांना भ्रष्टाचार मिटवायचा असेल तर पहिला महाराष्ट्रातून सुरुवात करा. तुमच्या साकारमध्ये जे भ्रष्ट नेते आले आहेत. त्यांना पहिलं उलट लटकवा, असं आव्हान खासदार संजय राऊत यांनी अमित शहा यांनी दिलं.
महाराष्ट्राचा उडता पंजाब होऊ नये. महाराष्ट्राला व्यसनमुक्त करण्यासाठी आधी ड्रुग्ज मुक्ती झाली पाहिजे. एकामागोमाग महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अमली पदार्थांचे साठे सापडत आहेत. मागील दीड महिन्यांपासून भूमिका मांडत आहे आणि माझ्यावर कारवाई करणारे माझ्याशी मांडवली करतात. मला घाबरवण्यासाठी फडणवीस लोकांना पाठवताहेत. मात्र मी घाबरत नाही. गृहमंत्र्यांनी ललित पाटीलला कोणत्या आजारपणासाठी हॉस्पिटलमध्ये ९ महिने ठेवले होते, असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. असेच आजपर्यंत कोणाला घडवलं नाही, अनेकांना संपवायचे काम केले. आता चंद्रकांत पाटील यांच्या मागे लागले आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.
पुलवामामध्ये जवान मारले गेले तेव्हा पंतप्रधान त्यांच्यावर काढण्यात येणाऱ्या चित्रपटात व्यस्त होते. आपल्या जवानांच्या बलिदानाचा फायदा निवडणुकीसाठी भाजपने करून घेतला. जम्मू काश्मीरच्या राज्यपालांनी जमिनीवरून जवानांना पाठवू नका असं सांगून ही पंतप्रधानांनाही ऐकलं नाही, असा आरोप भास्कर जाधव यांनी केला. मोदी सरकारने हे संविधान संपवण्याचा घाट घातला आहे. आणि हे संविधान वाचवायचे असेल तर शिवसेना आणि भीम सेनेने एकत्र येण्याचं आवाहन भास्कर जाधव यांनी केले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.