Maharashtra vidhan Sabha Election Results : विधानसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्राने न भूतो न भविष्यति असं यश दिलेय. भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरलाय. भाजपने तब्बल १३२ जागा जिंकल्यात. महायुतीमध्ये आता भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत असेल. महाराष्ट्र भाजपच्या इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्रात इतकं मोठं यश मिळाले असेल. २०१४ मध्ये मोदींच्या लाटेतही भाजपला इतकं अभूतपूर्व यश मिळालं नव्हतं. त्यावेळी भाजपने १२२ जागांवर विजय मिळवला होता. आता एकटा भाजप १३२ जागांपर्यंत पोहचलाय.
भाजपच्या या अभुतपूर्व विजयात देवेंद्र फडणवीस यांचं योगदान नाकारता येणार नाही. महायुतीचं दोन दिवसांत सरकार स्थापन केलं जाणार आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीचा फायदा झाला का? काँग्रेससाठी ही धोक्याची घंटा आहे का? यासारखी राजकीय चर्चा सुरू आहे.
२०१९ विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचे राजकारण ३६० डिग्रीमध्ये बदलले. ठाकरेंनी भाजपसोबत जाण्यास नकार दिला, त्यानंतर फडणवीस यांनी पहाटेच अजितदादांसोबत सूर जुळवले. पण खूप काळ हे टिकलं नाही. राज्यात मविआच्या सरकारचा जन्म झाला. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस हे पक्ष एकत्र आले. त्यांनी सत्तास्थापन करत भाजपला जोरदार धक्का दिला. देवेंद्र फडणवीस यांना मुखमंत्रिपदावरुन पायउतार व्हावं लागलं. ही सल कायम त्यांच्या मनात राहिली. पण २०२२ मध्ये शिवसेना आणि २०२३ मध्ये एकसंध राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले.
मुख्यमंत्रिपदावरुन भाजप आणि एकसंध शिवसेना यांचं फाटलं. ठाकरेंनी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यासोबत हातमिळवणी करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. उद्धव ठाकरे यांनी स्वत: मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत महाराष्ट्राला आणखी एक धक्का दिला. पण दोन-अडीच वर्षात ठाकरेंचं सरकार कोसळलं. एकनाथ शिंदें यांच्या बंडामुळे ठाकरेंचं सरकार कोसळलं. एकनाथ शिंदे यांनी ४० आमगारांना सोबत जात गुनाहाटी गाठली. मविआचे सरकार कोसळलं, अन् एकनाथ शिंदेंच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. शिवसेनेत उभी फूट लढली. शिवसेना कुणाची याचा सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरु आहे. पण आता झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरेंना धक्का बसला.
२०१९ ते २०२२ या काळात महाराष्ट्राने तीन मुख्यमंत्री पाहिले. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत पडलेली फूट पाहिली. पण अजून धक्कातंत्र बाकी होतं. २०२३ मध्ये अजित पवार यांनी महायुतीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांनी आपल्या ४० आमदारांना हाताशी धरत शरद पवार यांच्याविरोधातच बंड केलं. अजित पवार महायुतीमध्ये सामील झाले. त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले. महाराष्ट्राने पहिल्यांदाच दोन उपमुख्यमंत्री पाहिले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना कुणाची, याबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. पण या दोन पक्षातील फूट भाजपच्या पथ्यावर पडल्याची चर्चा आहे. आकडे काय सांगतात पाहूयात...
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पदरी २६.७७ टक्के मते मिळाली आहेत. २०१९ च्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपच्या मतांमध्ये एक टक्के वाढ झाल्याचे दिसतेय. २०१९ विधानसभा निवडणुकीत भाजपला २५.७५ टक्के मते मिळाली होती.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला एकूण मतांच्या ९.९६ टक्के मते मिळाली आहेत.. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला १२.३८ टक्के मते मिळाली आहेत. जर एकसंध शिवसेना असती तर यांची मतांची टक्केवारी २२ टक्क्के झाली असती. त्याशिवाय आमदारांची संख्याही वाढली असती. २०१९ मध्ये एकसंध शिवसेनेच्या पदरी 16.41 इतकी मते पडली होती.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत एकसंध राष्ट्रवादी काँग्रेसला १६.७१ टक्के मतं मिळाली होती. पण २०२३ मध्ये राष्ट्रवादीमध्ये फूट पडली. २०२४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला ११.२८ टक्के मते मिळाली आहेत. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ९ टक्के मतदारांनी पसंती दर्शवली होती.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतांच्या विभागणीचा फायदा भाजपला झाल्याचं राजकीय विश्लेषकांचे म्हणणं आहे. भाजपच्या मतांमध्ये कोणतीही फूट पडली नाही, तर दुसरीकडे दोन पक्षांचा मतदार विभागला गेला. २०१४ मोदी लाटेत महाराष्ट्रात विरोधी टिकून होते. पण २०२४ च्या त्सुनामीमध्ये विरोधक चारीमुंड्या चीत झाले. त्यांची अवस्था इतकी भयंकर झाली, की विरोधी पक्ष नेताही निवडू शकत नाहीत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसलाय. अनेक दिग्गजाचे गड ढासळलेच. पण आमदारांची संख्याही खूपच कमी झाली.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे ५४ आमदार होते, त्यांची मताची टक्केवारी १६.७१ इतकी होती. पण २०२४ मध्ये काँग्रेसची अवस्था अतिशय खराब झाली. काँग्रेसचे आमदार फक्त १६ आले आहेत. म्हणजे ३८ जागा कमी झाल्या. त्याशिवाय मतांची टक्केवारीही घसरली आहे. काँग्रेसला मिळालेल्या मतांची टक्केवारी १२ वर घसरली आहे. २०१९ च्या तुलनेत काँग्रेसच्या ३८ जागा तर घसरल्याच, त्याशिवाय त्यांची मतांची टक्केवारी चार टक्यांनी घसरल्याचे चित्र आहे. काँग्रेससाठी ही धोक्याची घंटा मानली जातेय. लोकसभेला काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली होती. पण चार महिन्यानंतर आलेल्या विधानसभेला त्यांना दोरदार धक्का बसलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.