भारत नागणे, साम प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. दहा दिवसात दोन्ही नेते तीनदा एकत्र दिसले आहेत, त्यामुळे राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झालीय. राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा सुरू झालीय. काल-परवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.
दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली. तर दुसरीकडे राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार हे पुन्हा तिसऱ्यांदा एकत्र दिसले. यामुळे राज्यातील राजकारणात मोठी घडामोड होणार असल्याची चर्चा गावागावातील चौकात होत आहे.
आगामी काळात स्वायत्त संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी केली केली जात आहे. त्याच आधी मोठी घडामोड होणार असल्याचं म्हटलं जात आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्र दिसण्यावर महायुतीच्या नेत्यांमध्ये टेन्शन वाढलंय. तर परत एकदा मोठा राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरू झालीय. त्याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र येणार का? याबाबत मोठं विधान केलंय.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे हे पंढरपूर दौऱ्यावर होते. त्यांनी विठ्ठल मंदिरात जात विठुरायाचं दर्शन घेतलं. त्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी बाबत मोठं विधान केलं. अजित पवार आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी पुन्हा एकत्र यावी, याबाबत आपण विठुरायाला साकडं घातलं नाही. तसे साकडे घालण्यात कोणतेच कारण नाही, असं वक्तव्य सुनिल तटकरे यांनी केलंय.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मिळून एनडीएसोबत जाण्याचा सामुदायिक निर्णय घेतलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय आम्ही घेतलाय. उद्याच्या राजकीय भविष्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलाय. त्यात आम्हाला यश मिळत राहो. आमच्या या विचारांशी जे असतील त्यांच्यासोबत आहोत, असं ही तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.
राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर सार्वजनिक व्यासपीठावर एकत्रित येण्यास टाळाटाळ करणारे शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे काका-पुतणे मागील काही दिवसांपासून मात्र विविध कार्यक्रम, बैठकांच्या निमित्ताने एकत्र पाहायला मिळत आहेत. या भेटीमुळे आगामी घडामोडींबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. २१ एप्रिलला एआय (AI) संबंधित विषयावर चर्चा करण्यासाठी पुण्यातील साखर संकुल येथे सकाळी ९ वाजता बैठकीचे आयोज करण्यात आलंय.
यावेळी हे दोन्ही नेते एकत्र येणार आहेत. मागील १० दिवसात अजित पवार आणि शरद पवार तिसऱ्यांदा एकत्र येणार आहेत. त्यामुळे दोन्ही नेते एकत्र येणार का? असा सवाल केला जात आहे. दरम्यान याआधी साताऱ्यात रयत संस्थेच्या बैठकीत शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.