छत्रपती संभाजीनगरमध्ये टेलिग्रामवर घरबसल्या हजारो रुपये कमवण्याची संधी असल्याची थाप मारून सायबर भामट्याने एका गृहिणीकडून तब्बल २५ लाख ७२ हजार ९७८ रुपये उकळले. तर दुसरीकडे एचडीएफसी बँकेच्या बीड बायपास रोडवरील ब्रँच सेल्स ऑफिसरने शेतकऱ्यासह ५ खातेधारकांना तब्बल ४६ लाख २० हजार ८३७ रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. त्यामुळे खळबळ उडालीय. ऐन दसरा आणि दिवाळी सणाच्या काळामध्ये सायबर भामटे सक्रिय झाल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क आणि सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे.
सणासुदीच्या काळामध्ये खरेदी किंवा व्यवहार करताना प्रत्येकाने सायबर भामट्यापासून सावध राहावं असं आवाहन संभाजीनगर पोलिसांनी केले आहे. संभाजीनगर शहरातील रोहिणी नावाच्या महिलेला टेलिग्राम अॅपवर नर्मदा नावाच्या अकाऊंटवरून पार्ट टाईम जॉबसाठी मेसेज आला. हॉटेलच्या बुकिंगचे टास्क पूर्ण केल्यास मोठ्या प्रमाणात घरबसल्या पैसे कमवता येतील असे आमिष त्यांना दाखवण्यात आले. रोहिणी यांना सायबर भामटे ऑनलाइन हॉटेल बुकिंगचा टास्क द्यायचे. रोहिणी यादेखील टास्क पूर्ण करायच्या.
त्याबदल्यात आरोपींनी सुरुवातीला त्यांना परतावा दिला. मात्र, मध्येच परतावा थांबवून आणखी पैसे कमावण्याची संधी असल्याचे आमिष दाखविले. त्यासाठी त्यांना मोठी रक्कम गुंतवायला लावली. वेगवेगळी कारणे देत सायबर भामट्यांनी त्यांच्याकडून २५ लाख उकळल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी थेट पोलिस ठाण्यामध्ये धाव घेत यासंदर्भात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.
संभाजीनगरच्या दुसऱ्या घटनेत गांधेली परिसरातील ५ शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत एचडीएफसी बँक सेल्स ऑफिसरने तब्बल ४६ लाख २० हजार ८३७ रुपयांचा घोटाळा केला असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गांधेली येथील शेतकऱ्यांच्या वडिलांनी शेती विकून त्यांच्या बँक खात्यात ५१ लाख ३१ हजार ४९२ रुपये टाकले होते. सेल्स मॅनेजरने खातेधारक अज्ञान असल्याचे पाहताच त्यांचे सिमकार्ड बंद केले आणि नेट बँकिंगच्या आधारे ३१ लाख ५० हजार वेगळ्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले.
शेतकऱ्याने शाखाधिकार्यासोबत चर्चा केल्यानंतर बँकेतीलच कर्मचारी सेल्स ऑफिसर संतोष चंदनसे याने हा प्रकार केल्याचा समोर आले. याशिवाय त्याने गांधेली गावातील इतर चार शेतकऱ्यांच्या नावावर क्रेडिट कार्ड घेऊन त्यावर कर्ज घेतल्याचे बँकेच्या निदर्शनास आले. सेल्स ऑफिसरने एकूण ५ शेतकऱ्यांना ४६ लाख २० हजार ८३७ रुपयांना फसविण्यात आल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी शेतकऱ्याच्या तक्रारीवरून सातारा ठाण्यात बँकेच्या सेल्स ऑफिसरविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला नोटीस पाठवून पुढील कारवाई करत असल्याचे सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.