अमोल कलये, साम टीव्ही
Ratnagiri News Heavy Rains: मागील आठवडाभरापासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक असलेल्या जगबुडी नदीने सकाळी ७ वाजेच्या सुमारास धोक्याची पातळी ओलांडली आहे.
या पार्श्वभूमीवर नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे खेड शहराची परिस्थिती बिकट बनली आहे. शहरातील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलं आहे. मटन-मच्छी मार्केटमध्ये पाणी शिरलं असून ७ ते ८ दुकानं पाण्याखाली आहेत.
नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे खेड नगर प्रशासनाने तसेच तालुका प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. नदीच्या किनाऱ्यावर कुणीही जाऊ नये अशा सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने पुढील 5 दिवसांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भाच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
याशिवाय आज मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्याला देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर संपूर्ण विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
Edited by - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.