अमोल कलये, साम टीव्ही
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाबाबत गंभीर आरोप करत वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्याची मागणी केली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पुरावे नष्ट करण्याचे काम झाले का, याची चौकशी झाली पाहिजे, असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे. तसंच, आदित्य ठाकरे यांच्या रात्रीच्या हालचालींचीही चौकशी झाली पाहिजे, असा दावा कदम यांनी केला. आदित्य ठाकरे रात्री बारा वाजता कुठे जायचे आणि सकाळी सहा वाजता परत यायचे, याची चौकशी झाल्यास आणखी काही गोष्टी समोर येतील, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वासाठी काम केलं, मात्र त्यांच्या नावावर काही लोकांनी कलंक लावण्याचं काम केलं, अशी टीकाही रामदास कदम यांनी केली. मधल्या काळात काही लोकांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्यामुळे याला उशीर झाल्याचा दावाही त्यांनी केला.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनाही रामदास कदम यांनी आवाहन केलं आहे. सण-उत्सव सुरू झाले आहेत. जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्यांपैकी काही मागण्या सरकारने पूर्ण केल्या आहेत. मराठा समाजाला न्याय देताना ओबीसी समाजावर अन्याय होऊ नये, हीच सरकारची भूमिका आहे. त्यामुळे जरांगे यांनी थोडं समजून घ्यावं, त्यांच्या मनाप्रमाणे नक्कीच होईल, अशी विनंती कदम यांनी केली.
दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावरूनही रामदास कदम यांनी भाष्य केलं. प्रभू रामचंद्रांनी 14 वर्षांचा वनवास भोगला, मात्र कोकणवासीयांचा वनवास 16 वर्षांनंतरही संपलेला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. यंदाच्या गणपती बाप्पाकडे पुढच्या वर्षी तरी मुंबई-गोवा महामार्गाचं काम पूर्ण व्हावं, अशी प्रार्थना करणार असल्याचं कदम यांनी सांगितलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा स्वतः लक्ष घालून या प्रश्नाला न्याय द्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.