राज्यसभेसाठी ज्योती वाघमारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल.
माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज झालेत.
राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी सस्पेन्स संपवत शिंदे गटाने ज्योती वाघमारे यांना उमेदवारी जाहीर केली. शिवसेनेतील वरिष्ठांना, दिग्गजांना मागे टाकत वाघमारेंनी राज्यसभेचं तिकीट मिळवलं. वाघमारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र वाघमारेंना उमेदवारी देण्यात आल्यानं शिवसेनेतील अंतर्गत नाराजी समोर आली आहे.
राज्यसभेसाठी शिंदे गटाचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आग्रही होते. राज्यसभेत आपल्याला पाठवण्यात यावं यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे प्रस्ताव मांडला होता. विशेष म्हणजे ते पाच वेळा खासदार राहिलेत तर सहावेळा संसदरत्न पुरस्कार पटकावला आहे. मात्र त्यांना डावलत पक्षानं आज ज्योती वाघमारे यांना संधी दिली. त्यामुळे अडसूळ नाराजी झालेत. त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. माजी खासदार अडसूळ यांनी याबद्दल मनातील खदखद बोलून दाखवली आहे. या नाराजीनंतर ते राजीनामा देणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राज्यातील राज्यसभेच्या ७ जागा रिक्त होत आहेत. यासाठी ४ पक्षांकडून ७ नावं जाहीर करण्यात आलीत. ७ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात असल्यानं निवडणूक बिनविरोध होईल. शिंदेसेनेकडून माजी खासदार आनंदराव अडसूळ, राहुल शेवाळे, संजय निरुपम, प्रवक्त्या शायना एनसी यांना राज्यसभेची उमेदवारी मिळू शकते अशी चर्चा होती. मात्र या दिग्गजांना मागे टाकून ज्योती वाघमारे यांनी बाजी मारली.
यानंतर अडसूळ यांनी त्यांची नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली.वरिष्ठांच्या मनात जे होतं, ते झालं. आता त्यावर अधिक बोलणं योग्य वाटत नाही, असे अडसूळ म्हणाले. आनंदराव अडसूळ यांनी मनातील खंत बोलून दाखवली. केंद्रीय मंत्री अमित शहांपासून अनेकांनी आश्वासनं दिली. राज्यपाल करणार असं सांगितलं. त्याला २ वर्षे लोटली.
या कालावधीत १० राज्यपाल नियुक्त झाले. पण माझा नंबर लागला नाही, असं अडसूळ म्हणाले. शेवटी मीच ऑफर दिली. राज्यपाल पद जाऊ द्या पण तुमच्या कोट्यातून राज्यसभा तरी द्या. माझी मागणी काही चुकीची नव्हती. प्रत्येक वेळी हो, हो म्हटलं जातं. पण होत काहीच नाही. त्यांनी दिलेलं नाही आणि भविष्यात देणारही नाहीत. हा माझा अनुभव आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना अमित शहांसमोर बैठक झाली होती. तेव्हा लिखित प्रस्ताव दिला होता. अडसूळांना राज्यपालपद देऊ असं सांगितलं. पण ते काही दिलं नाही. आपण पाच वेळा खासदार राहिलो. सहावेळा संसदरत्न पुरस्कार पटकावला आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.