Surabhi Jayashree Jagdish
मेथीच्या दाण्यांमध्ये विरघळणारे आणि न विरघळणारे असे दोन्ही प्रकारचे तंतू आढळतात. त्यामुळे आहारातील फायबर वाढवण्यास त्याची मदत होऊ शकते. त्यामुळे ज्यांना याचा त्रास आहे त्यांनी याचं सेवन करणं फायदेशीर ठरतं.
मेथीच्या सेवनामुळे टाइप-२ मधुमेह असलेल्या काही व्यक्तींमध्ये रक्तातील साखरेच्या पातळीत घट दिसून आल्याचं काही अभ्यासांमध्ये आढळून आलंय. मात्र या अभ्यासांमध्ये मेथीचं प्रमाण आणि सेवनाची पद्धत वेगवेगळी होती.
मेथीच्या दाण्यांचा आहारात समावेश केल्याने फायबरचं सेवन वाढण्यास मदत होऊ शकते. फायबरमुळे पोट भरल्यासारखं वाटण्यास मदत होऊ शकते, त्यामुळे एकूण आहार नियंत्रित ठेवण्यास काही प्रमाणात फायदा होऊ शकतो.
मेथी ही स्वयंपाकात वापरली जाणारी वनस्पती असून तिच्या दाण्यांचा पारंपरिक आहारात आणि काही ठिकाणी औषधी वापरातही समावेश केला जातो. त्यामुळे निरोगी प्रौढ व्यक्तीला, आहारातील इतर पदार्थांसोबत योग्य प्रमाणात मेथीचा समावेश करता येऊ शकतो.
चहा किंवा कॉफीऐवजी साधं मेथी भिजवलेलं पाणी घेतल्यास त्यात अतिरिक्त साखर किंवा कॅलरी नसतात. त्यामुळे काही लोकांसाठी हा साधा पर्याय ठरू शकतो. मेथीच्या दाण्याचं पाणी घेतल्यानंतरही दिवसभराचा एकूण आहार पौष्टिक आणि संतुलित असणं आवश्यक आहे.
गर्भवती महिलांनी अन्नामध्ये नेहमीच्या प्रमाणापेक्षा जास्त मेथी घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण जास्त प्रमाणातील मेथी गर्भावस्थेत सुरक्षित मानली जात नाही. मेथीमुळे काही लोकांना जुलाब, मळमळ, पोटाशी संबंधित त्रास किंवा अॅलर्जी होऊ शकते.
साधारणपणे रात्री एक ग्लास पाण्यात थोडे मेथी दाणे भिजवून ठेवून सकाळी ते पाणी गाळून घेण्याची पद्धत वापरली जाते. मात्र ‘एक चमचा रोज’ हे सर्वांसाठी वैद्यकीयदृष्ट्या ठरलेलं प्रमाण नाही कारण अभ्यासांमध्ये मेथीची मात्रा आणि स्वरूप वेगवेगळं राहिलं आहे.