मुंबई : सर्वांचंच लक्ष लागून असलेल्या राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election 2022) भाजपने जोरदार मुसंडी मारली. पुरेशी मतं नसताना देखील भाजपने (BJP) अतिशय अनपेक्षितरित्या आपला तिसरा उमेदवार निवडून आणण्याचा चमत्कार घडवला. महाविकास आघाडीकडे (Mahavikas Aghadi) पुरेसं संख्याबळ असताना देखील अनेक मतं फोडून भाजपने धनजंय महाडिक यांना राज्यसभेवर निवडून आणलं. दुसरीकडे सहाव्या जागेसाठी प्रबळ मानल्या जाणाऱ्या शिवसेनेचे संजय पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, यावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. (Rajya Sabha Election 2022 Latest News Updates)
"राज्यसभा निवडणूक... ठाकरे यांचे माफिया सरकार चे काउन्ट डाऊन उलटी गिनती सुरू", असं ट्विट भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलं आहे. खरं तर दोन दिवसांपासून महाविकास आघाडीने दावा केला होता की, निवडणुकीत त्यांचे चारही उमेदवार निवडणूक येतील. एकीकडे महाविकास आघाडी सरकारमधील नेते निवडणुकीत आम्हीच जिंकणार असा दावा करत असताना, दुसरीकडे भाजपकडून कोणताही नेता प्रतिक्रिया देत नव्हता. विशेष बाब म्हणजे मतदान पार पडल्यानंतर तसेच मतमोजणी सुरू झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासह कोणत्याही भाजपच्या नेत्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली नव्हती.
मात्र, निवडणुकीत सहाव्या जागेवर विजय मिळवताच, आता भाजपने शिवसेनेसह, महाविकास आघाडीला डिवचवण्यास सुरूवात केली आहे. 'आजचा विजय सर्वार्थाने महत्त्वाचा विजय आहे. महाराष्ट्राच्या जनतेने भाजपला बहुमत दिलं होतं. पण ते बहुमत आमच्या पाठीत खंजीर खुपसून काढून घेण्यात आलं आणि अशाप्रकारचं सरकार हे किती अंतर्विरोधाने भरलं जातं हे आपल्याला आजच्या विजयानंतर पाहायला मिळालेलं आहे.' अशी टीकाच देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीवर केली.
दुसरीकडे, सहाव्या जागेवर पराभव झाल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. "भाजपने नक्कीच सहावी जागा जिंकली. त्यांचा विजय झाला असं मी मानत नाही. पहिल्या पसंतीची सर्वाधिक मते ही संजय पवार यांना मिळाली. दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत महाडीकांचा विजय झाला. मोठा विजय झाला ते चित्र निर्माण केलं पण तसं काही नाही. दोन-चार मतांची घासाघीस झाली. सगळ्या प्रमुख नेत्यांनी संजय पवारांची जागा जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पहिल्या पसंतीच्या मतांचा विचार झाला तर आम्ही जवळजवळ जिंकलो होतो. ही अतिशय किचकट प्रक्रिया आहे. पण तरीही त्यांचे अभिनंदन". असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.