दौंड (पुणे) : दौंड तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. यात तालुक्यातील हातवळणमध्ये वादळी वाऱ्याने आणि मुसळधार पावसाने शेतकऱ्याचे पोल्ट्री शेड जमीनदोस्त झाले आहे. शेडच्या भिंती आणि पत्रे पडल्याने पोल्ट्रीफॉर्ममधील १८ हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सुमारे ८० ते ८५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
राज्यभरात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्याचा तडाखा देखील बसला आहे. यात शेतातील पिकांसह घरांची पडझड होऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीची झळ बसली आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान दौंड तालुक्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यात देखील प्रचंड नुकसान झाल्याचे पाहण्यास मिळत आहे.
शेतकऱ्याचे मोठे नुकसान
दौंड तालुक्यातील हातवळण गावातील शुभम गोगावले यांचे वादळी वाऱ्याच्या पावसाने पोल्ट्री शेडचे पत्रे आणि भिंती कोसळून पोल्ट्री शेडमधील १८ हजार कोंबड्या मृत पावल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्याचे ८० ते ८५ लाखांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी तसेच तलाठी दाखल होऊन पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. दौंड तालुक्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा पावसाला जोर धरल्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे
सोलापूर जिल्ह्यात १ हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान
सोलापूर जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या तुफान पावसामुळे कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजित अहवालनुसार जवळपास १ हजार २४८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने आंबा, केळी, कलिंगड, खरबूज या फळपिकासह भुईमूग, उडीद, उन्हाळी कांदा इत्यादी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर सोलापूर जिल्ह्यात झालेल्या या नुकसानीचे प्रत्यक्ष पंचनाम्याना सुरुवात करण्यात आली असून कृषी आणि महसूल विभागामार्फत शेतकऱ्यांच्या बांधावर आणि नुकसानस्थळी जाऊन प्रत्यक्ष पंचनामे करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.