मुंबई: पेट्रोल पंप चालकांनी मंगळवारी इंधन न खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये इंधनाचा (Petrol-Diesel) तुटवडा जाणवला. पेट्रोल मिळणार नाही या भीतीने राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर रांगा लागल्याचं चित्र पहायला मिळालं. दरम्यान, आंदोलन सुरू असतानाच आज सकाळी (बुधवारी) पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर (Petrol-Diesel Prices) जाहीर केले आहेत.
पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होऊनही म्हणावा तसा नफा होत नसल्याने पेट्रोल पंप चालकांनी मंगळवारी इंधन न खरेदी करण्याचा निर्णय घेतला. या आंदोलनात देशातील जवळपास २४ राज्यांमधील पेट्रोल पंप चालक सहभागी झाले होते. पंप चालकांच्या या आंदोलनामुळे महाराष्ट्रासहीत अनेक राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलचा तुटवडा जाणवला. अनेक ठिकाणी इंधनामुळे वाहने रस्त्यावरच अडकून पडली होती.
एकीकडे पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे आंदोलन सुरू आहे तर कच्च्या तेलाची किंमत वाढत असून कच्च्या तेलाचे (Crude Oil) दर प्रति बॅरल 124 डॉलरपर्यंत पोहोचले आहेत. अशातच तेल कंपन्यांनी आज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले. त्यानुसार आज देखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
आज बुधवारी देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई शहरात पेट्रोल 109.27 रुपये आणि डिझेल 95.84 रुपये प्रति लिटर दराने विकलं जात आहे. तर, दुसरीकडे देशातील सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रातील परभणीमध्ये विकलं जात आहेत. परभणीत पेट्रोलचा दर 114.38 रुपये प्रति लिटर इतका आहे. सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअरमध्ये मिळत आहे. पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर आहे.
चार प्रमुख महानगरांमधील इंधनाचे दर
मुंबई - मुंबईत पेट्रोल 109.27 रुपये आणि डिझेल 95.84 रुपये प्रति लिटर मिळत आहे
दिल्ली - दिल्लीत पेट्रोलचे दर 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर इतके आहे.
चेन्नई - चेन्नईमध्ये पेट्रोल भाव 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर इतका आहे.
कोलकाता - कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर मिळत आहे.
Edited By - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.