पंढरपूर : अठ्ठावीस युगापासून कर कटेवर ठेवून भक्तांना दर्शन देण्यासाठी उभा असलेला सावळा विठुराया दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात गोपाळपूरजवळ चंद्रभागेमध्ये असलेल्या विष्णूपद मंदिरात वास्तव्यास असतो; अशी अख्यायिका आहे. त्यानुसार मार्गशीर्ष महिन्याला सुरवात झाल्यापासून आता महिनाभर विठूरायाचा मुक्काम गोपाळपुराच्या विष्णुपद मंदिरात राहणार आहे. यामुळे भाविक देखील याठिकाणी दर्शनासाठी गर्दी करत आहेत.
पंढरपूर जवळच असलेल्या गोपाळपूर येथील चंद्रभागेच्या पात्रात एक पुरातन दगडी विष्णूपद मंदिर आहे. जेव्हा रूक्मिणी विठुरायावर रूसून दिंडीर वनात आली. तेव्हा देवीच्या शोधात विठ्ठल ज्या ठिकाणी पंढरपुरात प्रथम आले. ते ठिकाण म्हणजे चंद्रभागेच्या पात्रातील मोठा खडक म्हणजे विष्णूपद. अशी अख्यायिका पद्म पुराणात सांगितली आहे. भाविक शिदोरी घेऊन या ठिकाणी येतात. दर्शनानंतर सहकुटुंब वनभोजनाचा आनंद घेतात. मार्गशीर्षमध्ये पंढरपुरात वारीला आलेले वारकरी व दिंड्याही बारस सोडायला या ठिकाणी येतात. मार्गशीर्ष अमावस्येपर्यंत येथे देवाचा मुक्काम असतो.
येथील विष्णूपद मंदिरात एका मोठ्या शिळेवर मध्यभागी देवाचे समचरण आणि देहूडाचरण पाऊले उमटलेली आहेत. त्यासोबत काठी ठेवल्याची व काल्याच्या वाडग्याची खूण आहे. या शिळेवर दगडी मंडप उभारला आहे. येथील खांबावर चतुर्भुज समचरण विष्णुमूर्ती आणि देहूडाचरण मुरलीधराची आकर्षक अशी मूर्ती कोरण्यात आली आहे. याच ठिकाणी विठुरायाने आपल्या सवंगडी व गाईसह क्रीडा केल्याचे व येथेच त्यांनी सर्वांसोबत भोजन केले होते. तेव्हापासून या ठिकाणी देवाची आणि गाईची पाऊले उमटल्याची अख्यायिका आहे.
विठुराया भगवान विष्णूचा अवतार मानले जातात. त्यामुळे इथे उमटलेल्या पावलांमुळे विष्णूपद असं नाव मिळाले आहे. मार्गशीर्ष महिन्यात साक्षात विठुराया या ठिकाणी एक महिनाभर मुक्कामी राहायला येतात, असेही मानले जाते. त्यामुळे राज्यभरातून अनेक भाविक मार्गशीर्ष महिन्यात विष्णुपद येथे दर्शनासाठी गर्दी करत असतात. विष्णूपदाकडे जाण्यासाठी चंद्रभागा नदीतून नौकानयन करत जाता येते. तर वाहनातून गोपाळपूर येथे जाण्याची सोय आहे. येथे दर्शनासाठी महिनाभर भाविकांची गर्दी असते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.