राज्यात अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याच्या अनेक घटना सुरू आहेत. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारामध्ये कधी आळ्या, झुरळ, किडे, बेडूक तर कधी साप आढळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशीच घटना आता पालघरमधून समोर आली आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये दिल्या जाणाऱ्या पोषण आहारामध्ये अळ्या निघाल्या आणि बुरशी आलेले मिलेट न्यूट्रेटिव्ह बार फूड वाटण्यात आले आहेत. यामुळे पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पालघर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. शाळेत विद्यार्थ्यांना शासनाकडून पुरवण्यात येणाऱ्या पोषण आहारात बुरशी आणि जिवंत अळ्या सापडल्या. याचे व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पालघर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील मुलांना पुरविण्यात येणाऱ्या मिलेट न्यूट्रेटिव्ह बार फूडमध्ये जिवंत अळ्या आणि बुरशी आढळत आहे.
पालघर जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या २ लाख ७५ हजार १९१ मुलांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. आनंद लक्ष्मण चांदावरकर विद्यालय खानिवली आणि चिंचणी जिल्हा परिषद शाळा- ३ येथे आलेल्या पोषण आहारात बुरशी आणि जिवंत अळ्या आढळून आल्याने खळबळ उडाली. पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांना पोषण आहार पुरवण्याचे कॉन्ट्रॅक्ट में. इंडो अलाइड प्रोटीन फुड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे देण्यात आले आहे.
पोषण आहार निकृष्ट दर्जाचा येत असल्याच्या या आधीच शाळांकडून अनेक तक्रारी करण्यात आल्या. मात्र प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या शाळांमध्ये शिकणारी बरीच मुलं ही गरीब आणि आदिवासी बहुल भागातील आहेत. त्यामुळे अशाप्रकारचा पोषण आहार देऊन मुलांच्या जीवाशी खेळले जात आहे. या गरीब मुलांची अशाप्रकारे थट्टा केली जात असल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. या संबंधित ठेकेदाराविरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.