
पालघर : विधानसभा निवडणुकीत मनसेला यश आलं नाही. मनसेचा एकही उमेदवार निवडून आला नाही. ठाणे आणि कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातही मनसेची पीछेहाट झाली. या निवडणुकीच्या निकालावर राज ठाकरेंनी सविस्तर प्रतिक्रिया दिली नाही. त्यातच आज मनसे नेते अविनाश जाधव यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर आता मनसेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. पालघरमधील मनसे पदाधिकाऱ्याने अविनाश जाधव यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मनसेतील अंतर्गत वाद निवडणुकीनंतर काही दिवसातच चव्हाट्यावर आला आहे. पालघरचे मनसे जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांना जबर मारहाण करण्यात आली आहे. तसेच त्यांचे बंधू आतिश मोरे यांच्यावर पंधरा ते वीस मद्यधुंद अवस्थेत असलेल्या गुंडांनी धारधार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. हा हल्ला ठाणे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केल्याचा आरोप मोरे कुटुंबीयांकडून केला जात आहे.
आज रविवारी दुपारी अविनाश जाधव यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर अवघ्या काही वेळातच बोईसरमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांना लाथाबुक्यांनी जबर मारहाण करण्यात आली. तर त्यांचे बंधू अतिश मोरे यांच्यावर कोयते, तलवार, चाकू अशा धारधार शस्त्रामार्फत जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.
या घटनेत जखमी झालेल्या मोरे यांच्यावर बोईसरच्या शगुन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या पोलीस घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. मात्र या सगळ्या घटनांमुळे पालघर आणि ठाणे जिल्ह्यात मनसेत मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अंतर्गत वादाचा रूपांतरण थेट जीवघेण्या हल्ल्यापर्यंत गेल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी मनसेचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.