
रुपेश म्हात्रे, साम टीव्ही, डहाणू प्रतिनिधी
महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्याने तिचा गर्भतील बाळासह मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना डहाणूमध्ये बुधवारी घडली. पिंकी डोंगरकर (राहणार सारणी, तालुका डहाणू) या गर्भवती महिलेचे नाव आहे. आरोग्य यंत्रणेतील त्रुटींचा फटका गर्भवती मातेच्या जीवाला बसल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे
पिंकी डोंगरकर (राहणार सारणी, तालुका डहाणू) या गर्भवती महिलेने प्रसूतीसाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल होताच परिस्थिती चिंताजनक बनली. बुधवारी सकाळी प्रसूती वेदना जाणवू लागल्यावर तिला तातडीने उपचारासाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिची प्रकृती गंभीर होत असल्याने तिला गुजरातच्या वलसाड येथील रुग्णालयात हलवण्याचा सल्ला कासा रुग्णालयातील डॉक्टरांनी दिला. यावेळी 108 क्रमांकाच्या आपत्कालीन रुग्णवाहिकेची मदत घेण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु, ऑक्सिजनसारख्या अत्यावश्यक सुविधांचा अभाव असल्याने रुग्णवाहिका तातडीने उपलब्ध झाली नाही.
या विलंबामुळे गर्भवती महिलेच्या जीवाला धोका निर्माण झाला. रुग्णालय प्रशासनाने कासा उपजिल्हा रुग्णवाहिका तातडीने उपलब्ध करून दिली. मात्र, तोपर्यंत महिलेने प्रसूतीच्या तीव्र वेदना सहन केल्या, ज्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
108 आपत्कालीन सेवा अपयशी ठरली?
108 रुग्णवाहिका ही जीवनावश्यक सेवा असूनही तात्काळ सुविधा उपलब्ध होण्यात अडथळा निर्माण झाला. उधवा येथे रुग्णवाहिका असतानाही ऑक्सिजन अभावामुळे तिला पाठवण्यात उशीर झाला. या घटनेमुळे 108 सेवांच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
स्थानिकांची मागणी :
या घटनेमुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केला असून कासा उपजिल्हा रुग्णालयात 108 रुग्णवाहिका सेवा सुधारण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. वेळेवर सुविधा उपलब्ध नसल्याने भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, याची खात्री प्रशासनाने द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
आरोग्य व्यवस्थेतील हलगर्जीपणामुळे एका गर्भवती महिलेचा जीव संकटात सापडल्याने प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे. वेळेवर आणि योग्य सुविधा पुरवण्यात प्रशासन अपयशी ठरत असेल, तर याचा फटका सामान्य नागरिकांना बसणार हे निश्चित आहे. त्यामुळे ही यंत्रणा सक्षम आणि गतिमान करण्यासाठी ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.