- चेतन व्यास
Wardha News : नागरिकांना पारदर्शकरितीने कालबध्द सेवा पुरविण्यासाठी तसेच शासकीय कामात गतिमानता व पारदर्शकता आणण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने व्हॉट्सॲप तक्रार निवारण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत व्हॉट्सॲप तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन (wardha) जिल्हाधिकारी राहुल कर्डिले (rahul kardile) यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले म्हणाले ज्या नागरिकांनी पुर्वीच त्यांचे व्यक्तिगत शासकीय कामासाठी तहसिल कार्यालय, उपविभागीय अधिकारी अथवा जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज सादर केला आहे. परंतु विहित मुदत उलटूनही अर्जावर कार्यवाही संदर्भात माहिती अप्राप्त आहे अशा अर्जदारांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे. याशिवाय शेतक-यांशी सबंधित योजना, जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या पंतप्रधान आवास योजना, आदिवासी विभागाच्या बिरसा मुंडा कृषि योजना, जिल्हाधिकारी कार्यालयासंबंधित शेतकरी शिवार पांदन रस्ता, प्रधानमंत्री पिक विमा योजना, कृषि विभागाच्या सर्व योजना, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, बियाणे, खते, औषधांसंबंधित तक्रारी, फळबाग लागवड, नालाखोलीकरण कामे आदी योजनांबाबत नागरिकांना तक्रार करता येणार आहे.
नागरिकांनी अर्ज सादर करतांना त्यांचे नाव, पत्ता व संपर्क क्रमांक लिहून ज्या कार्यालयाकडे पुर्वी अर्ज केला आहे. त्या कार्यालयाचे नाव, पत्ता, अर्जाचा दिनांक इत्यादी तपशिल वाचनीय स्वरुपात नमुद करुन अर्जाचा फोटो व्हॉट्सॲप क्रमांकावर सादर करावा असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.
नागरिकांना त्यांच्या व्हॉट्सॲपवरील संदेशाच्या तीन दिवसाच्या आत त्यांच्या यापुर्वीच्या अर्जाची सद्यस्थिती तसेच केलेल्या व करण्यात येणा-या कार्यवाहीबाबत माहिती पुरविली जाणार आहे असे निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांनी कळविले आहे.
हा आहे तक्रारीसाठीचा क्रमांक
या कक्षामध्ये सुरु करण्यात आलेल्या 9156706108 या व्हॉट्सॲप क्रमांकावर विविध विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांबाबत नागरिकांना काही तक्रार असल्यास दाखल करता येणार आहे असेही प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.