Nashik Kalaram Temple : छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगीताराजे यांचा नाशिकच्या काळाराम मंदिरात अपमान करण्यात आला. तेथील महंतांनी संयोगीताराजे यांना वेदोक्त पद्धतीने मंत्रोच्चार करताना रोखले. तसेच त्या वेदोक्त अशा पद्धतीने मंत्रोच्चार का करु शकत नाहीत हे सांगण्याचा प्रयत्न केला. या बाबत संयोगीताराजे यांनी एक पोस्ट शेअर करत माहिती दिली. यामुळे आता राजकीय नेत्यांकडून यावर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. तसेच महंतांना २४ तासांत अटक करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी केली आहे. (Political News)
काय म्हणाले अमोल मिटकरी
शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधताना मिटकरी म्हणाले की, " नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये छत्रपती घराण्याच्या वारसदार संयोगीताराजे छत्रपती यांना वेदोक्त प्रकरणाचा अनुभव आलाय. यावेळी इतिहासातील काही घडामोडी सांगत अमोल मिटकरी पुढे म्हणाले की, साल १८९९ मध्ये शाहू महाराजांनाही पंचगंगेच्या घाटावर कार्तिक मासाच्या वेळी अशा प्रकारचा अनुभव आला होता. त्यावेळी तेथे त्यांना अपमान सहन करावा लागला."
"काळाराम मंदिरात महंतांनी संयोगीताराजे यांना रामरक्षा स्तोत्र आणि वेदोक्त मंत्र म्हणण्यापासून रोखलं. तुम्हाला तो अधिकार नाही, असं त्यांना सांगण्यात आलं. महाराष्ट्रातल्या बहुजनांनी आता जागं झालं पाहिजे. अशा भोंदूबाबांना जाब विचारला पाहिजे. सध्याच्या काळात हे महंत आणि ब्रह्मवृंद अशा प्रकारे उन्मत होत असतील, तर या महंतांवर २४ तासांच्या आत कारवाई करावी अन्यथा बहुजन समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा अमोल मिटकरींनी दिला आहे.
"संयोगीताराजे यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान, छत्रपतींच्या गादीचा अपमान. बहुजन समाजाचा एक घटक म्हणून आम्ही हा अपमान कधीही सहन करणार नाही. एवढी मग्रुरी वाढली असेल आणि छत्रपतींच्या वारसदारांना वेदोक्त तसेच पुरानोक्त शिकवण्याचा प्रयत्न करत असाल तर आतापर्यंत तुम्ही त्यांचे चाकर होतात, त्यामुळे चाकरासारखं वागावं, अशा शब्दांत मिटकरींनी संताप व्यक्त केला आहे.
या संपूर्ण प्रकरणावर संबंधित महंतानी आपली प्रतिक्रिया देत दिलगीरी व्यक्त केली आहे. तसेच मी संयोगीताराजे यांना वेदोक्त पद्धतीने मंत्रोच्चार करण्यास थांबवले नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. त्यांच्या या स्पष्टीकरणावर मिटकरी पुढे म्हणाले की, "महंत खोटं बोलतायत, संबंधित महंतांवर महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी तत्काळ कारवाई करावी करण्याची मागणी अमोल मिटकरींनी केली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.