अभिजीत सोनवणे, साम टीव्ही
राज्यातील मुंबई, पुणे यांसह इतर महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. तसंच अख्ख्या राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या नाशिक महापालिकेच्या १२२ जागांसाठीही आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यामध्ये सर्वसाधारण - ६२ जागा, ओबीसी - ३३ जागा, महिलांसाठी राखीव - ६१ जागा, अनुसूचित जाती - १८ जागा, अनुसूचित जमाती - ०५ जागा अशा जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. यामध्ये महायुतीचे जे माजी नगरसेवक तुरुंगात आहेत, त्यांना देखील आरक्षण सोडतीतून दिलासा मिळाल्याचं दिसतं.
निवडणुकीची चाहूल लागताच अनेक इच्छुकांनी आपापल्या पद्धतीने सोशल मीडियावर ब्रँडिंग करायला सुरुवात केली आहेत. मात्र या महापालिकेमध्ये अनेक वर्षांपासून सत्ता गाजवत असणारे तीन माजी नगरसेवक हे आता गंभीर गुन्ह्यांखाली कारागृहात आहेत. विशेष म्हणजे यामधील दोन नगरसेवक हे सत्ताधारी पक्षाचे म्हणजेच भाजपचे आहेत. तर एक नेता आरपीआय आठवले गटाचा आहे.
नाशिकमध्ये गुंडगिरी बोकाळली आहे. गुन्हेगारीचं साम्राज्य वाढलंय हे मागील काही वर्षांपासूनच्या घटनांवरून दिसून येतंय. नाशिक जिल्हा हा कायद्याचाच बालेकिल्ला आहे, असं म्हणत काही दिवसांपूर्वी पोलिसांनी भाजपचे माजी नगरसेवक उद्धव (बाबा) निमसे याला अटक केली. शहरातील नांदूर नाका परिसरात किरकोळ कारणावरून राहुल धोत्रे या युवकाचा खून करण्यात आला होता. यामध्ये उद्धव निमसेंचा हात असल्याचे समोर आल्याने ते काही दिवस फरारही होते. अखेर ते स्वतःहून पोलिसांना शरण गेले आणि आता सध्या ते तुरुंगात आहेत. प्रभाग क्रमांक 2 (क) हा निमसेंचा मतदारसंघ आहे.
तर आणखी एक भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील पंचवटी येथील पेठरोड येथे सराईत गुन्हेगार सागर जाधव याच्यावर दोघा तडीपार गुंडांनी गोळ्या झाडून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. या गोळीबाराच्या प्रकरणात जगदीश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे पुरावे तपासामधून पोलिसांच्या हाती लागले होते. यामुळे जगदीश पाटील देखील जेलमध्ये आहेत. प्रभाग क्रमांक 4 (क) हा त्यांचा मतदारसंघ आहे.
तर आरपीआयचा जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढेंना देखील आरक्षण सोडतीमध्ये दिलासा मिळाला आहे. प्रभाग 11(अ) हा त्यांचा मतदारसंघ आहे. मागील निवडणुकीत या प्रभागात महिला आरक्षण असल्याने त्यांनी आपल्या सुनेला उमेदवारी दिली होती. यंदा मात्र तोच प्रभाग अनुसूचित जाती पुरुषांसाठी राखीव ठरल्याने ही निवडणूक लोंढे तुरुंगातून लढवण्याची शक्यता आहे. सातपूर गोळीबार प्रकरण, खंडणी, खून अशा गंभीर आरोप लोंढेंवर असून तेही कारागृहात आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांचे अनधिकृत घर महापलिका आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत जमीनदोस्त केले होते.
या पार्श्वभूमीवर गंभीर गुन्ह्यांतर्गत जेलमध्ये असलेल्या या नेत्यांना पक्षाकडून उमेदवारी मिळणार का? आणि मिळाली तर सूज्ञ नाशिककर अशा गुंडप्रवृत्तीच्या लोकांना निवडून देणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.