नांदेडमध्ये दृष्टिहीन विद्यालयात विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार
मुख्याध्यापक आणि कर्मचारीवर कुटुंबीयांचा आरोप
उपचारादरम्यान विद्यार्थिनीचा मृत्यू
पोलीस तपास सुरु
Nanded 18 Year Old Girl School Rape Case News नांदेडमध्ये मानवतेला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. देगलूर येथील दृष्टिहीन विद्यालयातील १७ वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. धक्कादायक म्हणजे उपचारादरम्यान विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून या विद्यार्थिनीच्या मृत्यूस दृष्टिहीन विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि कर्मचारी जबाबदार असल्याचा गंभीर आरोप तिच्या वडिलांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी ही विद्यार्थिनी विद्यालयात पडल्याचे शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. त्यानंतर तिच्यावर देगलूर शहरातील एका डॉक्टरांकडे उपचार करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाही तिची प्रकृती सुधारण्याऐवजी अधिकच खालावत गेली. त्यामुळे तिला पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आले. त्यानंतर प्रकृती गंभीर झाल्याने तिला लातूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला.
या घटनेला वेगळे आणि गंभीर वळण मिळाले आहे. मृत्यूपूर्वी या विद्यार्थिनीने दृष्टिहीन विद्यालयात आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती तिच्या आजीला दिल्याचे समोर आले आहे. या संदर्भातील कथित व्हिडिओ रेकॉर्डिंगही समोर आल्याची माहिती आहे. त्यामुळे विद्यार्थिनीच्या मृत्यूमागील नेमके कारण आणि तिच्यावर अत्याचार झाला होता का, याबाबत तपास सुरु आहे.
या प्रकरणी काल रात्री उशिरा देगलूर पोलीस ठाण्यात पोक्सो कायदा, विनयभंग तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून संबंधित व्यक्तींची चौकशी तसेच उपलब्ध पुरावे आणि कथित व्हिडिओची पडताळणी केली जात आहे. दरम्यान, या घटनेमुळे निवासी दृष्टिहीन विद्यालयांमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. विद्यालय प्रशासनाकडून विद्यार्थिनींची सुरक्षा, आरोग्य आणि तक्रारींकडे गांभीर्याने पाहिले जाते का, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.