सुनील काळे
आगामी लोकसभा निवडणुकीत सत्तेसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये सहभागी होणार की नाही यावर चर्चा सुरू आहेत. अशात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावर मोठं वक्तव्य केलंय.
जे जे भाजपच्या विरोधात लढत आहेत त्यांना आम्ही बरोबर घेऊ. प्रकाश आंबेडकर आमच्या बरोबर आहेत. जागा वाटपाच्या जबाबदारीवरून कुठलाही वाद नाही. त्याबद्दल आमचे प्रभारी बोलू शकतील, अशी प्रतिक्रिया नाना पटोलेंनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
पुढे सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत पटोले म्हणाले, सिंचन घोटाळा असेल किंवा सरकारच्या काळातले घोटाळे असतील. आम्ही सर्वच घोटाळे बाहेर काढू आणि त्याच मुद्द्यावरती आम्ही लढू. भाजप सर्वच ठिकाणी जुमला करतोय. हे लोकांना पटवून देऊ, असंही नाना पटोलेंनी यावेळी म्हटलं.
जरांगे पाटील यांच्या मुद्द्यावरून सरकार आरक्षणात तणाव निर्माण करत आहे. यांनी जात निहाय जनगणना करावी. त्यातूनच हा मार्ग निघू शकेल. आता सर्व जाती अस्वस्थ आहेत. आरक्षण जातं की काय अशी परिस्थिती आहे, अशा शब्दांत नागरिकांच्या मनातील भीती नाना पटोलेंनी व्यक्त केलीय.
महाविकास आघाडीत लोकसभेसाठी जागावाटप कसं असणार? तसेच मवीआमध्ये प्रकाश आंबेडकरांना देखील स्थान मिळणार का यावर अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. मात्र नाना पटोलेंनी दिलेल्या प्रतिक्रियेवरून वंचीतला देखील मवीआमध्ये स्थान मिळणार अशी चिन्ह स्पष्ट दिसत आहेत.
काल वंचित आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीकडून चर्चेसाठी निमंत्रित करण्यात आलं होतं. त्यावर संजय राऊतांनी म्हटलं की, जवळजवळ दृष्टीपथावर तोडगा आलेला आहे. आठ ते नऊ तास आम्ही काल चर्चा केली. आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत. ३० तारखेला पुन्हा एकदा वंचितही आमच्या चर्चेत सहभागी होईल. चेहरा पक्ष आणि खाली असलेल्या कार्यकर्त्यांचं केडर या तीन सूत्रांचा वापर आम्ही जागा वाटपा संदर्भात चर्चा करत आहोत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.