धुळ्यामध्ये मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात
पेट्रोल संपल्याने कार बंद पडली
उभ्या कारला कंटेनरीने धडक दिली
अपघातामध्ये ६ जण गंभीर जखमी
मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली. पेट्रोल संपल्यामुळे महामार्गावर अचानक बंद पडली. या उभ्या असलेल्या कारला पाठीमागून कंटेनरने जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये एका महिलेचा हात धडावेगळा झाला. तर ६ जण गंभीर जखमी झाले. या अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला. अपघातातील जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धुळे पोलिस सध्या अपघाताचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरपूरजवळील दभाषी गावाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास काळजाचा ठोका चुकवणारा हा भीषण अपघात झाला. शिरपूरहून धुळ्याकडे जाणारी एक कार पेट्रोल संपल्याने तापी नदीवरील दभाषी पुलाजवळ बंद पडली होती.
कारमधील प्रवाशांच्या मदतीसाठी त्यांचे काही नातेवाईक दुचाकीवरून पेट्रोल घेऊन घटनास्थळी पोहोचले होते. मध्यरात्रीच्या अंधारात कारमध्ये पेट्रोल टाकून ती सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच पाठीमागून आलेल्या एका भरधाव अज्ञात कंटेनरने या कारला जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी भयंकर होती की कंटेनरने कारला काही अंतर फरफटत नेले. या दुर्दैवी घटनेत एका महिलेचा हात शरीरापासून पूर्णपणे वेगळा झाला. मदतीला आलेल्या नातेवाईकांसह एकूण ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत जखमींना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
मात्र सर्वांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी धुळे येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. याप्रकरणी शिरपूर पोलिसांकडून फरार अज्ञात कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आणि पुढील तपास वेगाने सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.