शिवनेरी बस सेवा आता राज्यातील १० शहरांमध्ये सुरू होणार.
२०० नवीन अत्याधुनिक व्होल्व्हो बसेस ताफ्यात दाखल होणार.
मुंबई–पुणे मार्गाप्रमाणे इतर शहरांनाही प्रीमियम सेवा मिळणार.
मुंबई–पुणे महामार्गाची ‘राणी’ म्हणून ओळख असलेल्या एसटीच्या अत्याधुनिक, आरामदायी ‘शिवनेरी’ बस सेवेची झेप आता राज्यभर घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांदरम्यान शिवनेरी धावणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. राज्यभर विस्तारासाठी २०० नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त व्होल्व्हो बसेस खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरूय. या बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होताच, मुंबई–पुणेप्रमाणेच इतर महत्त्वाच्या शहरांदरम्यानही शिवनेरी बसची सेवा सुरू होईल.
नाशिक ते पुणे,
नाशिक ते छत्रपती संभाजीनगर
नाशिक ते जळगाव-धुळे,
पुणे ते कोल्हापूर
पुणे ते सांगली
पुणे ते सोलापूर
नागपूर ते चंद्रपूर
नागपूर ते अमरावती- अकोला
अशा प्रमुख शहरांचा समावेश आहे. त्यामुळे राज्याच्या विविध भागांतील प्रवाशांना आलिशान, सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. नवीन २०० बसेसमध्ये ३० शयनयान (स्लिपर) बसेसचा समावेश असणार आहे. सध्या ज्या मार्गांवर विना-वातानुकूलित शयनयान बससेवा आहे, त्या ठिकाणी ‘स्लिपर शिवनेरी’ बससेवा सुरू करण्यात येण्यात आहे. आरामदायी बेड-कोच सुविधा, सुरक्षितता आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे दीर्घ पल्ल्याच्या प्रवासात प्रवाशांना नव्या अनुभवाची हमी मिळेल.
‘शिवनेरी’चा हा विस्तार म्हणजे केवळ बससेवेची वाढ नव्हे, तर महाराष्ट्राच्या प्रगत आणि गतिमान प्रवास संस्कृतीची नवी दिशा आहे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी यावेळी केले आहे.
महिला प्रवाशांना तसेच ६५ ते ७५ वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना तिकीटदरात ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. तर ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना शिवनेरी प्रवास पूर्णपणे विनामूल्य आहे. त्यामुळे नव्या मार्गांवरही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल, असा विश्वास मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.
सन २००२ मध्ये सुरू झालेल्या शिवनेरी बससेवा अनेकांच्या पसंतीस उतरली होती. वक्तशीरपणा, उत्कृष्ट आसनव्यवस्था आणि सुरक्षित प्रवास या गुणवैशिष्ट्यांमुळे उच्च मध्यमवर्गीय प्रवाशांच्या पसंतीस ही बस उतरली होती. इतर बससेवेपेक्षा तिकीटदर थोडे अधिक असतानाही सातत्याने मिळणाऱ्या उत्तम प्रतिसादामुळे ही सेवा सुरुवातीपासूनच नफ्यात आहे, असे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.