राज्यामध्ये यंदा मान्सून वेळेआधीच दाखल झाल्यामुळे सर्वांना प्रचंड आनंद झाला होता. पण चार दिवसांतच पावसाने विश्रांती घेतली होती. आता विश्रांती घेतलेल्या पावसाला पुन्हा सुरूवात झाली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. गायब झालेला पाऊस पुन्हा आल्यामुळे बळीराजापासून ते उकड्याने हैराण झालेले नागरिक आनंदी झाले आहेत. राज्यात आज कुठे-कुठे कसा पाऊस पडत आहे ते आपण जाणून घेणार आहोत....
मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबईतील पूर्व उपनगरामध्ये गेल्या एका तासापासून तुफान पाऊस पडत आहे. या पावसामुळे सखल भागात पाणी साचायला सुरूवात झाली आहे. सायन, कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर, चेंबूर, मुलुंड, भांडूप आणि विक्रोळीमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईकरांची तारंबळ उडाली. या पावसामुळे लोकलसेवा उशिराने सुरू आहेत. अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी देखील झाली आहे.
ठाण्यात पावसाचा जोर वाढला. आज सकाळपासून ठाण्यात ढगाळ वातावरण होते. अचानक जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळे नागरिकांची तारंबळ उडाली. असाच पाऊस पडत राहिला तर शहरात पाणी साचण्याची शक्यता आहे. ठाण्यासह कल्याण, डोंबिवलीमध्ये देखील पाऊस सुरू आहे. तर नवी मुंबईत देखील पावसाला सुरुवात झाली. खारघर, बेलापूर, वाशी या भागामध्ये पाऊस पडत आहे.या पावसामुळे नवी मुंबई महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन सज्ज झाले आहे.
पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसरात विश्रांती घेतलेल्या पावसाला पुन्हा सुरूवात झाली. तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्यात पुन्हा एकदा पावसाला सुरूवात झाली. शहरातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पिंपरी-चिंचवड शहरात आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून रिमझिम पावसाची सतत धार सुरू आहे.
गेल्या ५ दिवसांपासून उघडीप घेतलेल्या पावसाने आज सकाळपासून सांगलीमध्ये पुन्हा हजेरी लावली. अचानकपणे पावसाच्या सरी पडण्यास सुरूवात झाली. तर उकाड्याने हैराण झालेल्या सांगलीकरांना दिलासा मिळाला. सकाळी साडेदहा वाजल्यापासून पावसाची रिपरिप सांगली जिल्ह्यामध्ये सुरू आहे. गेल्या पाच दिवसांपासून पावसाने उघडीत दिली होती. मात्र सकाळपासून ढगाळ वातावरण आणि पुन्हा एकदा पावसाचे आगमन झाल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. शेतकरी वर्गाच्या पेरण्या सुरू आहेत. तर काही ठिकाणी पेरण्या पूर्ण झाल्यामुळे या पावसाची शेतकऱ्यांना उत्सुकता होती.
आज उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा, पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या ठिकाणी हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. तर उर्वरित राज्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आज नंदूरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.