प्रत्येकी ६ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला.
मराठी भाषा वाद प्रकरणात अटक झालेल्या कार्यकर्त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला.
बोरिवली न्यायालयाने जामीन मंजूर केला.
संजय गडदे, साम प्रतिनिधी
मुंबईतील दहिसर परिसरात मराठी भाषेच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या गोंधळ प्रकरणात अटक करण्यात आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ११ कार्यकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बोरिवली न्यायालयाने सर्व आरोपींना जामीन मंजूर केला आहे. प्रत्येकी सहा हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने कार्यकर्त्यांची सुटका होणार आहे.
दहिसरमध्ये काही दिवसांपूर्वी मराठी भाषेच्या मुद्द्यावरून तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत मनसे नेते आणि कार्यकर्त्यांना अटक केली होती. त्यानंतर सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. अटकेनंतर आरोपींकडून जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावर आज बोरिवली न्यायालयात सुनावणी झाली.
या प्रकरणात मनसे उपाध्यक्ष कुणाल माईनकर, नेते नयन कदम, किरण नकाशे यांच्यासह अन्य आठ कार्यकर्त्यांचा समावेश होता. न्यायालयाच्या निर्णयानंतर मनसे कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले. सुनावणीदरम्यान बचाव पक्षाच्या वकिलांनी कार्यकर्त्यांवर अनावश्यक कारवाई झाल्याचा दावा केला. मराठी बोला असे सांगितल्यामुळे कार्यकर्त्यांना अडकवण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच या संपूर्ण घडामोडींना राजकीय रंग देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.
दुसरीकडे पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या भूमिकेत या घटनेमुळे परिसरातील दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे नमूद केले. पुढील संभाव्य कट किंवा तणावाच्या पार्श्वभूमीवर तपास सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणामुळे दहिसरमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, शिवसेना नेते संजय निरुपम यांच्या भेटीमुळे हा वाद चिघळल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर आता या प्रकरणाला पुढे कोणते राजकीय वळण मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.