अमित ठाकरे आणि २५ जणांविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील मोदींच्या फोटोवरून वाद निर्माण झाला होता.
विनापरवानगी प्रवेश आणि प्राचार्यांना धमकीच्या आरोपांनंतर गु्नहा दाखल करण्यात आलाय.
सचिन जाधव,साम प्रतिनिधी
पुणे दौऱ्यावर असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी मुख्याध्यापकांच्या कार्यालयातील पंतप्रधान मोदींचा फोटो काढला होता, यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली होती. अखेर प्रचार्यांच्या तक्रारीनंतर पुण्यातील चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये अमित ठाकरे सह २५ जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मुख्याध्यापकांच्या कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोसोबत होता. मोदींचा फोटो त्या रांगेत का लावला, अशी विचारणा करत अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो तेथून हटवण्यास सांगितलं. त्यानंतर भाजपनं त्यांच्यावर टीका केली असून अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली. दुसरीकडे महाविद्यालय प्रशासनाकडून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हा लावण्यात आलेला आहे. त्यानंतर भाजप नेते चंद्रकांत पाटील हे महाविद्यालयात दाखल झालेत.
पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात आज मनसेच्या विद्यार्थी शाखेचे उद्घाटन करण्यात आलं. यावेळी मनसे नेते अमित ठाकरेंनी तंत्रनिकेतन महाविद्यालयातील कँटीनची पाहणी केली. यावेळी महाविद्यालयातील कारभारावर अमित ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. वसतिगृह अधीक्षकांच्या कार्यालयातील फोटोवरून त्यांनी जोरदार गोंधळ घातला.
वसतीगृहामध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या होत्या. त्यानंतर अमित ठाकंनी वसती गृहामध्ये जात पाहणी केली. काही विद्यार्थ्यांनी अमित ठाकरेंना वसतीगृहातील मुलांना देण्यात येणाऱ्या जेवणात आढळलेल्या अळीचे फोटो दाखवले. त्यानंतर अमित ठाकरेंनी वसतीगृहाच्या कॅन्टीनची पाहणी केली. तेथे असलेले सडलेले कांदे पाहून अमित ठाकरे चांगलेच आक्रमक झाले. अमित ठाकरेंनी सडलेले कांदे थेट प्राचार्य यांच्या टेबलवर ठेवले.
सरकारी कॉलेज आहे, प्रोटोकॉलप्रमाणे पंतप्रधान मोदींचा फोटो असला पाहिजे. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला मोदींचा फोटो नको. ना आमच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या बाजूला. दुसऱ्या चार भिंती आहेत चार भिंती आहेत, तिकडे दुसरीकडे त्यांचा फोटो लावा प्रोटोकॉलप्रमाणे. आता काय यांच्यासाठी मोदी हे छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे झालेत का? का मोदी बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा मोठे झालेत? असा सवाल अमित ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला. भाजपनं गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याप्रकरणी अमित ठाकरे म्हणाले की, महाराजांसाठी दुसरा गुन्हा असेल तर मला अभिमान आहे. माझ्यावर आधी एक गुन्हा दाखल झाला तोही महाराजांसाठी आणि दुसरा पण महाराजांसाठी असेन तर मला अभिमान आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.