राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसेने मतदारयादी तपासणी मोहीम सुरू
चारकोपमध्ये डुप्लिकेट नावं आणि चुकीचे फोटो आढळल्याने खळबळ
मनसेने बोगस मतदार घुसवण्याचा संशय व्यक्त
निवडणूक आयोगाकडे चौकशी आणि कारवाईची मागणी
संजय गडदे,साम टीव्ही
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) पुन्हा एकदा मतदारयादीतील गंभीर त्रुटींवर बोट ठेवत निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेचा मोठा प्रश्न उपस्थित केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर राज्यभरात सुरू झालेल्या 'मतदार यादी तपासणी' मोहिमेअंतर्गत आज चारकोप विधानसभा मतदारसंघात धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
विभाग अध्यक्ष दिनेश साळवी यांच्या नेतृत्वाखाली मनसैनिकांनी मतदारयादीचे बारकाईने निरीक्षण केले असता, एका उत्तम विजय बारस्कर नावाच्या व्यक्तीचे नाव एकाच यादीत दोनदा आढळले. विशेष म्हणजे या दोन नोंदींमध्ये फोटो मात्र वेगळे असल्याचे आढळले. एक बरोबर आणि दुसरा पूर्णपणे अनोळखी व्यक्तीचा. त्यामुळे बोगस मतदार घुसवण्याचा संशय मनसेकडून व्यक्त करण्यात आला आहे.
फक्त एवढंच नव्हे, तर यमुनाबाई गणपत कांबळे नावाच्या महिलेच्या मतदार नोंदीवर फोटो मात्र बुरखा घातलेल्या मुस्लिम महिलेचा असल्याचे मनसेच्या निरीक्षणात समोर आले आहे. या गंभीर विसंगतीमुळे निवडणूक प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर बेजबाबदारपणा आणि शक्यतो हेतुपुरस्सर घोळ झाल्याचे दिसत आहे.
या संदर्भात बोलताना दिनेश साळवी यांनी म्हटलं “ही फक्त सुरुवात आहे. आम्ही प्रत्येक विभागात अशा मतदार यादींची छाननी करणार आहोत. बोगस नोंदी, चुकीचे फोटो आणि डुप्लिकेट नावे हे लोकशाहीवरचा थेट प्रहार आहे. राज्य निवडणूक आयोगाने तात्काळ चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे'.
मनसेच्या या हालचालीमुळे राज्य निवडणूक आयोगाचे डोळे उघडतील का, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. मतदार याद्या ही लोकशाहीची पायाभरणी असल्याने अशा गंभीर त्रुटींकडे दुर्लक्ष करणे म्हणजे लोकशाहीची खिल्ली उडवणे होय.
राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेने घेतलेली ही मोहीम आता राज्यभरात उग्र स्वरूप धारण करणार असून, मुंबईपासून नागपूरपर्यंत सर्व विधानसभा मतदारसंघांतील याद्या तपासण्याचा मनोदय मनसेने व्यक्त केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.