Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: मध्य रेल्वेद्वारे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसचा सातवा वर्धापनदिन साजरा

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज सोमवार, दिनांक १९ जानेवारी २०२६, राज्यातील २९ महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

मध्य रेल्वेद्वारे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसचा सातवा वर्धापनदिन साजरा 

मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसच्या ७व्या वर्धापन दिनाचा उत्सव आपल्या प्रवासी, रेल्वेप्रेमी, गाडी कर्मचारी, कोचिंग डेपो कर्मचारी तसेच मध्य रेल्वेच्या इतर कर्मचाऱ्यांसह साजरा केला.

आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादीला झटका, राष्ट्रवादीचा बडा नेता शिंदेंच्या शिवसेनेत

आंबेगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहेत. राष्ट्रवादीचे नेते, पुणे म्हाडाचे अध्यक्ष माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या खंदे समर्थकांनी आज शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

माजी खासदार भाजप नेत्या नवनीत राणा यांना पुन्हा धमकी

पोलिसांच्या डायल 112 क्रमांकावर अज्ञात व्यक्तींनी फोन करून दिली जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

पुण्यात मनसेच्या उमेदवारांविरोधात गुन्हा दाखल

पुणे महापालिका निवडणुकीसाठी उभे असलेले मनसे चे उमेदवार राम बोरकर यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात प्रभाग २९, ३० आणि ३२ याची मतमोजणी दीनदयाल शाळेत करण्यात आली होती.

नितीन नबिन यांची भाजप अध्यक्षपदी बिनविरोध निवड

भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी नितीन नबिन यांची बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा आज करण्यात आली. पक्षातील एकमतामुळे ही निवड निर्विवाद ठरली. या प्रसंगी मुख्यमंत्री तसेच पक्षाचे अनेक ज्येष्ठ व वरिष्ठ नेते उपस्थित होते. नितीन नबिन यांच्या निवडीमुळे पक्षाला नवे नेतृत्व आणि संघटनात्मक बळ मिळेल, असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला.

हिंगोलीत दिवसाढवळ्या तलवारीचा हल्ला; २६ वर्षीय तरुण गंभीर जखमी

हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरात भरवस्तीत दिवसाढवळ्या २६ वर्षीय तरुणावर तिघा अज्ञातांनी तलवारीने हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली. मारुती मुटकुळे असे जखमी तरुणाचे नाव असून, त्याच्या डोक्यावर तलवारीचे घाव घालण्यात आले. हल्ल्यात हाताच्या बोटालाही गंभीर इजा झाली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. जखमी मारुतीची प्रकृती चिंताजनक असून उपचारासाठी त्याला नांदेड येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

अंबरनाथमध्ये सत्ता स्थापनेचा मुहूर्त मार्चपर्यंत लांबणीवर; हायकोर्टाचे निर्देश

अंबरनाथ नगरपरिषदेबाबत तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा, असे निर्देश देत मुंबई हायकोर्टानं येथील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रससोबत हातमिळवणी करत बनवलेल्या सर्व समित्यांना स्थगिती दिलीय. त्यामुळं अंबरनाथमध्ये नव्यान उदयास आलेली शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी वैध की भाजपा नेत्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकांना हाताशी घेऊन केलेली नवी आघाडी खरी, याचा निर्णय आता जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावा, असं हायकोर्टानं सोमवारी (19 जानेवारी) या समित्यांना स्थगिती देताना स्पष्ट केलंय.यासंदर्भातील याचिकेवर सोमवारी हायकोर्टात न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या खंडपीठापुढं सुनावणी झाली.

ठाकरे गटाच्या नगरसेवकांना सूचना पत्र, बैठकीस अनुपस्थित राहिल्यास कारवाईचा इशारा

शिवसेना ठाकरे गटाकडून निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांना जिल्हाप्रमुख शरद पाटील यांनी सूचना पत्र दिले आहे. गट स्थापनेसंदर्भात उद्या होणाऱ्या बैठकीस उपस्थित राहण्याचे आदेश या पत्रात देण्यात आले आहेत. बैठकीस अनुपस्थित राहिल्यास पक्षविरोधी कृती मानून कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. मधूर म्हात्रे व किर्ती ढोणे घरी नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांकडे पत्र देण्यात आले.

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये भारतीय सेनेचे जवान शहीद

जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्याच्या सिंगपूरा भागात आतंकवाद्यांशी सुरू असलेल्या मुठभेडीत भारतीय सेनेचा एक जवान शहीद झाले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. शहीद जवान यांचे नाव हवलदार गजेन्द्र सिंग आहे. ही मुठभेड ऑपरेशन TRASHI-I या Counter-Terror ऑपरेशन दरम्यान झाली. जेथे आतंकवाद्यांविरुद्ध सुरक्षा दलांनी घेराबंदी करून कारवाई केली. या गंभीर घटनेमध्ये आणखी सैनिक जखमी झाले असून, आतंकवाद्यांच्या पत्त्याचा शोध सुरू आहे. सेनेने शहीद जवान यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

नाशिकमध्ये पोलिसांकडून वकिलाला मारहाण; वकील संघटनांचे आंदोलन

नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या आवारात पोलिसांनी वकिलाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. अॅड. तुषार दोंदे यांना सिव्हिल हॉस्पिटल परिसरात मारहाण झाल्याची घटना घडली. आत्महत्या झालेल्या पक्षकाराची बाजू ऐकून घेण्यासाठी ते रुग्णालयात गेले असताना हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेच्या निषेधार्थ जिल्हा न्यायालयाबाहेर वकील संघटनांनी निदर्शने केली असून संबंधित पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करून तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.

बिबट्याची दहशत आणि  कांदा दरावरून उमेदवाराची हटके एन्ट्री

शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती पंचायत समिती गणासाठी उमेदवारी अर्ज भरण्यावेळी वेगळेच चित्र पाहायला मिळाले. पिंपरी दुमाला येथील उमेदवार संदीप सोनवणे गळ्यात खिळ्याचा पट्टा आणि कांद्याची माळ घालून अर्ज दाखल करण्यास पोहोचले. शेतकऱ्यांच्या अडचणी, बिबट्याची वाढती दहशत आणि कांद्याला मिळणारा कवडीमोल दर या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी ही हटके पद्धत अवलंबल्याचे त्यांनी सांगितले.

पुण्यातील पासपोर्ट कार्यालयात नागरिकांची प्रचंड गर्दी

पुण्यातील मुंढवा भागातील पासपोर्ट कार्यालयात आज नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. नवीन पासपोर्ट काढणे तसेच पासपोर्टमधील बदलासाठी नागरिक पहाटेपासून रांगेत उभे होते. कार्यालयात अपुरी व्यवस्था आणि योग्य नियोजन नसल्याने अनेक नागरिकांना जमिनीवर बसून वाट पाहावी लागली. तासन्तास थांबावे लागत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून प्रशासनाने तातडीने व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी केली आहे.

कंपनीतील सुरक्षेअभावी कामगाराचा मृत्यू, नातेवाईकांचा आक्रोश

कामठी तालुक्यातील कवठा येथील ट्रुफॉर्म टेक्नो प्रॉडक्ट प्रा. लि. या कंपनीत सुरक्षेच्या अभावामुळे कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रमोद बोराडे असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. मध्यरात्री काम सुरू असताना अचानक लोखंडी प्लेट पोटावर लागल्याने तो गंभीर जखमी झाला. उपचारासाठी रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर नातेवाईकांनी कंपनीच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला असून प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.

आंबेगावात दोन्ही राष्ट्रवादी वेगवेगळ्या मैदानात?

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीवर जवळपास शिक्कामोर्तब झाला असला तरी पुण्यातील माजी मंत्री दिलीप वळसेंच्या आंबेगाव तालुक्यात चित्र वेगळे दिसत आहे. शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम स्वतंत्र लढण्यावर ठाम आहेत. अजित पवारांनी सुद्धा देवदत्त निकमांशी रोहित पवारांसमोर एकत्र लढण्याबाबत चर्चा केली तरीही निकम आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. विधानसभा निवडणुकीतील दिलीप वळसेंसोबतच्या संघर्षामुळे आंबेगावात मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता वर्तवली जात आहे.

नगरसेवक पदासाठी इच्छुकांची फिल्डिंग सुरू

महानगरपालिकेच्या निवडणुकीत ७४ पैकी ५० जागा जिंकत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. निवडणूक निकालानंतर आता सर्वांचे लक्ष नगरसेवक निवडीकडे लागले आहे. महापालिकेत पाच स्वीकृत सदस्यांची नियुक्ती होणार असून, संख्याबळामुळे बहुसंख्य जागा भाजपला मिळणार आहेत. त्यामुळे पक्षातील जुने कार्यकर्ते, तिकीट न मिळालेले नेते आणि पडद्यामागे काम करणाऱ्यांनी स्वीकृत पदासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.

किसन सभेचा चांदवड-नांदगाव येथे विविध मागण्यांसाठी रास्ता रोको

शेतकरी, वनजमीन धारक व कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी नाशिक जिल्ह्यात किसन सभेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. चांदवड व नांदगाव येथे कार्यकर्त्यांनी रस्ते अडवून आंदोलन केले. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अद्याप न मिळणे, मका पिकाच्या हमीभावातील फरक, बांधकाम कामगारांना नोंदणी असूनही लाभ न मिळणे तसेच वनजमीन कसणाऱ्यांचे प्रश्न प्रलंबित असल्याने हे आंदोलन करण्यात आले.

सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीची युती

सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र लढणार असल्याची माहिती राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी दिली. चार आमदारांच्या मतदारसंघात तुतारी किंवा घड्याळ या चिन्हावर निवडणूक होईल. दोन्ही राष्ट्रवादी आमने-सामने नसून जागावाटप करून लढणार आहेत. भाजपाविरोधात काही ठिकाणी सर्वपक्षीय आघाडी होण्याची शक्यता असून बहुमताचा आकडा गाठू, असा विश्वास उमेश पाटील यांनी व्यक्त केला.

Sangli ZP Election: सांगलीत जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपाच्या इच्छुकांच्या मुलाखती संपन्न

सांगली जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आता रणधूमाळी सुरू झाली आहे.भाजपाकडून निवडणूक लढवण्यासाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली असून भाजपाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. सांगलीमध्ये जिल्हा परिषदेच्या 61 गट आणि पंचायत समितीच्या 122 गणासाठी भाजपाच्या मुलाखती पार पडल्या.भाजप आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक आणि माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मुलाखतीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी तब्बल 876 जणांनी मुलाखती दिल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी आता भाजपाकडून सुरू करण्यात आली आहे.

Pune: प्रशांत जगताप यांनी घेतली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट

पुणे -

प्रशांत जगताप यांनी घेतली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट

मुंबईत जात हर्षवर्धन सपकाळ यांची घेतली भेट

पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी केले प्रशांत जगताप यांच अभिनंदन

प्रशांत जगताप यांनी कोंढवा आणि वानवडी परिसरात एकूण पाच नगरसेवक काँग्रेस पक्षाचे आणले आहेत निवडून

हर्षवर्धन सपकाळ यांची सदिच्छा भेट घेत अभिनंदन

Pune: उमेदवारी नाकारलेल्यांना आता 'स्वीकृत'चे वेध, भाजपमध्ये जोरदार लॉबिंग सुरू

पुणे -

उमेदवारी नाकारलेल्यांना आता 'स्वीकृत'चे वेध

भाजपमध्ये जोरदार लॉबिंग सुरू

पुणे महापालिका निवडणुकीत उमेदवारी नाकारलेल्या इच्छुकांना आता स्वीकृत नगरसेवकपदाचे लागले वेध

स्वीकृत नगरसेवकपदाची कमाल संख्या दहापर्यंत वाढविण्याच्या हालचाली सुरू

प्रचारादरम्यान अनेक इच्छुकांना स्वीकृत नगरसेवकपदी संधी देण्याचे सूतोवाच भाजपकडून करण्यात आले होते

Mumbai: मध्य रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूक अर्धा तास उशिराने

मुंबई -

मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने

३० ते ४० मिनिटं लोकल उशिराने धावत आहेत

बदलापूर-सीएसएमटी लोकल उशिराने धावत आहेत.

Pimpri Chinchwad: अजित पवारांची पिंपरी चिंचवडमधील नगरसेवकांसोबत बैठक

पुण्यानंतर अजित पवार पिंपरी चिंचवड शहरात निवडून आलेल्या नगरसेवकांसोबत घेत आहेत बैठक

पिंपर चिंडवड शहरातील सर्व नगरसेवक बैठकीसाठी उपस्थित

पिंपरी चिंचवड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३७ नगरसेवकांचा विजय

या सर्व नगरसेवकांना अजित पवार करणार मार्गदर्शन

Pune: आजपासून पुण्यात बजाज पुणे ग्रॅंड सायकल टूरचं आयोजन

आजपासून पुण्यात बजाज पुणे ग्रॅंड सायकल टूरचं आयोजन

ही स्पर्धा तीन दिवस चालणार

आज प्रोलॉग रेस आज होणार आहे.

आज होणारी रेस ही 7 किलोमीटरी असणार आहे.

ही टाईम ट्रायल शर्यत असणार आहे.

165 सायकलस्वार आज सहभागी होती. मात्र एकाचवेळी सगळे सायकलस्वार या स्पर्धेला सुरुवात करणार नाहीत तर 1 मिनिटांच्या अंतराने प्रत्येक सायकलस्वार स्पर्धेत सहभागी होणार आहे.

गुड लक चौकापासून सुरु होणार आहे . जंगली महाराज रस्त्यावरील KFC जवळ या स्पर्धेचा अंतिम स्पॉट असेल.

फर्ग्यूसन कॉलेज रोड- गणेश खिंड रोड- संचेती हॉस्पिटल- जंगली महाराज रस्ता हा प्रोलॉग रेसचा मार्ग असणार आहे.

Palghar: पालघरमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि किसान सभेच्या वतीने लॉन्ग मार्चचे आयोजन

पालघरमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि किसान सभेच्या वतीने चारोटी ते पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर लॉन्ग मार्च आयोजन करण्यात आलं आहे . मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी चे डहाणू विधानसभेचे आमदार विनोद नकले ,किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक ढवळे आणि शेतकरी नेते अजित नवले या मोर्चाचे नेतृत्व करत आहेत. 35 ते 40 हजार कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होणार असल्याचं मत डॉक्टर अजित नवले यांनी व्यक्त केले आहे .मागण्या मान्य झाल्या नाही तर वेळ प्रसंगी मुंबईकडे कूच करू असा इशारा अजित नवले यांनी दिला आहे.

Amravati: सोलर लावून देतो सांगून शेकडो ग्राहकांची फसवणूक, अमरावतीतील धक्कादायक घटना

अमरावतीत सोलर लावून देण्याची बतावणी करत शेकडो ग्राहकांची फसवणूक....

अमरावतीच्या गाडगेनगर पोलिसांसमोर महिलांनी दिला सोलर संचालकाला दिला चोप...

शेकडो ग्राहकांकडून लाखो घेतले पण घरी सोलर प्लांट लावून दिला नसल्याने नागरिकास व महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला

सोलर लावून दिला नसल्याने महिलांनी सोलर कंपनीच्या संचालकाला केली मारहाण

गाडगे नगर पोलीस स्टेशनमध्ये सोलर कंपनीच्या संचालका विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी शेकडो महिला पोलिसांमध्ये धडकल्या

Kolhapur: कोल्हापुरात काँग्रेस आणि शिंदेसेना एकत्र येण्याची शक्यता

मुंबईत शिंदेना बाजूला केले तर कोल्हापुरात काँग्रेस सोबत जाऊन सत्ता स्थापन करण्याचा पर्याय समोर आहे.सतेज पाटील याना याबाबत विचारले असता त्यांनी पडद्यामागे काय सुरू आहे याची खुली चर्चा होत नसल्याचे म्हणत अधिक बोलणे टाळले आहे.मात्र काँग्रेसचे ३४ आणि शिंदेंचे १५ एकत्र आल्यावर कोल्हापुरात सत्ता स्थापन करणे शक्य असल्याने त्याची खुमासदार चर्चा सुरू आहे.

पंढरपूरच्या तरूणाचा न्यूझीलंडमध्ये डंका; हाॅर्स रेसिंग स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले

पंढरपूर तालुक्यातील राहुल भारती या तरुणाने न्यूझीलंड मधील हॉर्स रेसिंग स्पर्धेत मिळवले २५ लाख रुपयांचे बक्षीस, पंढरपूर तालुक्यातील कान्हापुरी येथील राहुल याला हॉर्स रायडिंगची आवड होती. यासाठी त्याने पुणे येथे प्रशिक्षण घेतले. यानंतर न्यूझीलंड मध्ये स्थायिक झाला आहे. नुकतीच तेथे हॉर्स रायडिंग स्पर्धा झाली त्यात २५ लाख रूपयांचे बक्षीस मिळवले आहे.

Silver Rate: चांदीचा आजचा भाव 3 लाख 4 हजार रुपये प्रति किलो

देशभरात प्रसिद्ध असलेल्या खामगाव येथील चांदीच्या बाजारपेठेत आज चांदीचा भाव उच्चांक स्तरावर पोहोचला आहे खामगाव येथील चांदीच्या बाजारपेठेत चांदीचे आजचे भाव तीन लाख चार हजार रुपये प्रति किलो झाले असून अमेरिकेने लाभलेले निर्बंध,टेरिफ... इराण आणि वेनिंजुएला मध्ये असलेली अस्थिरता, व्याजदरात झालेली कमतरता यामुळे चांदी आणि सोन्याचे भाव वाढल्याचे व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे व आगामी काळात असेच भाव वाढत राहतील असे व्यापाऱ्यांनी सांगितले मात्र वाढत्या चांदीच्या भावामुळे चांदीचे 70 टक्के ग्राहक कमी झाल्यामुळे चांदीच्या बाजारपेठेत मोठी मंदी बघायला मिळत आहे.

Kolhapur ZP Election: कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसच्या वतीने इच्छुकांच्या मुलाखती सुरु

राज्यात महानगर पालिका निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केलेली आहे. एका बाजूला महायुतीने तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस निवडणुकीसाठी सज्ज झालेला आहे. आज कोल्हापुरातील काँग्रेस कमिटी इथ जिल्हा परिषद आणि पंचायत समिती साठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना प्रारंभ झालेला आहे. काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात झालेली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेत ज्या पद्धतीने काँग्रेसने आपला परफॉर्मन्स दाखवलेला आहे त्याच पद्धतीने किंबहुना अधिक परफॉर्मन्स कार्यकर्त्यांनी उमेदवारांनी या निवडणुकीत दाखवावा असा आवाहन सतेज पाटील यांनी केले आहे.

Jalgaon: जळगावच्या नशिराबाद येथे दोन गटात हाणामारी

जळगावच्या नशिराबादेत जुन्या वादातून दोन गटात हाणामारी होऊन दगडफेकीची घटना

घटनेत दोन्ही गटांकडून दगड व विटांचा तसेच लाठ्याकाठ्या, पाइप, कुन्हाडीचा वापर झाल्याने तब्बल १६ जण जखमी

जखमींना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नगरपरिषदेच्या निवडणुकीतील कामावरून झालेले वाद उफाळल्याने दोन गटात तुफान हाणामारी दगडफेक झाल्याची माहिती

घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्याने पुढील अनर्थ टाळला.

याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत नशिराबाद पोलिस ठाण्यात दोन्ही गटाच्या परस्पर तक्रारीवरून 30 ते 35 जणांविरुद्ध दोन गुन्हे दाखल झाले आहे.

Ajit Pawar: अजित पवार घेणार पुणे महापालिकेत निवडून आलेल्या उमेदवारांची बैठक

उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार पुणे महापालिकेत निवडून आलेल्या उमेदवारांची बैठक

पुणे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी उमेदवारांचा अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक

पुणे महापालिकेसाठी आज राष्ट्रवादीच्या गट नेत्याची निवड होण्याची शक्यता

दोन्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक बारामती हॉस्टेलमध्ये

पुणे महापालिका निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी ने २७ तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने ३ जागा जिंकल्या

दोन्ही पक्षाला समान न्याय मिळावा म्हणून २ गट नेत्यांच्या निवड होण्याची शक्यता..

Baramati: बारामतीत कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी

बारामतीत एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी प्रात्यक्षिक प्रदर्शन सुरू आहे 17 जानेवारी ला या प्रदर्शनाचे उद्घाटन झाल्यानंतर आज तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी हे प्रदर्शन पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती हे प्रदर्शन पाहण्यासाठी राज्यातून नव्हे तर परराज्यातून देखील शेतकऱ्यांनी हजेरी लावली आहे या शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मंगेश कचरे यांनी

अक्कलकुवा पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर पाच ठिकाणी धाडसी घरफोडी

अक्कलकुवा शहरात चोरट्यांनी एकाच रात्री धुमाकूळ घालत पाच ठिकाणी घरफोडी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे, अक्कलकुवा पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलीस वसाहतीतील एका पोलीस कर्मचाऱ्याचे घरही चोरट्यांनी लक्ष्य केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.चोरट्यांनी कोटला फळी, पोलीस वसाहत आणि ग्रामीण रुग्णालय कर्मचारी वसाहत या भागांत डल्ला मारला. यात बहादूरसिंग पाडवी, अशोक बोरदे, देवीदास वसावे यांच्यासह एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घरातून सुमारे 2 लाख रुपये रोख, 3 ते 4 तोळे सोने आणि 30 ते 40 तोळे चांदीचे दागिने असा लाखोंचा ऐवज लंपास केला आहे.

Maharashtra Live News Update: भाजपचे नगरसेवक फोडण्याचा शिंदेंचा डाव, राऊतांचा खळबळजनक दावा

एकनाथ शिंदेंना भाजपचे नगरसेवक फोडायचे आहेत. दिल्लीमधून शिंदेंना चावी देणारे कोण? असे राऊत म्हणाले.

नगर–मनमाड महामार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी_सुजय विखे पाटील थेट रस्त्यावर

नगर–मनमाड महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे गेल्या अनेक दिवसांपासून राहुरी परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण आहे.. कामाच्या संथ गतीमुळे सातत्याने वाहनांच्या लांब रांगा लागण्याचे चित्र दिसत आहे.. माजी खासदार सुजय विखे यांनी थेट रस्त्यावर उतरत परिस्थितीचा आढावा घेतला आणि हातात कागद पेन घेत ठेकेदारांना वाहतूक नियोजन कसे करावे? यासंदर्भात सूचना केल्या..

शहादा तालुक्यात दुर्मिळ युरेशियन ग्रिफॉन गिधाडाला जीवदान

शहादातालुक्यातील होळगुजरी गाव शिवारात एका दुर्मिळ महाकाय पक्षाचे दर्शन झाले. उडण्यास असमर्थ असलेल्या या पक्षाला पाहून स्थानिक तरुणांनी वन्यप्राणी संरक्षण आणि बहुउद्देशीय संस्था नंदुरबारचे अध्यक्ष संजय वानखेडे यांच्याशी संपर्क साधला. संजय वानखेडे यांनी फोटोंवरून हा पक्षी युरेशियन ग्रिफॉन, जातीचे गिधाड असल्याचे ओळखले आणि वनविभागाला पाचारण केले. शहादा वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत या गिधाडाला सुरक्षितरित्या रेस्क्यू केले. विशेष म्हणजे, या गिधाडाच्या मानेवर जिओ टॅग आणि पायात विशिष्ट प्रकारची पट्टी आढळून आली आहे. यामुळे हे गिधाड एखाद्या आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय संशोधन प्रकल्पाचा भाग असल्याचे स्पष्ट होत आहे. गिधाडे ही निसर्गातील महत्त्वाची स्वच्छतादूत मानली जातात. आययूसीएन (m च्या लाल यादीनुसार ही प्रजाती धोक्यात आहे. हे गिधाड कोठून आले आणि कोणत्या संस्थेने याला टॅग केले आहे, याचा अधिक तपास शहादा वनविभागाचे अधिकारी करत आहेत. सध्या या गिधाडावर उपचार सुरू असून, वनविभागाच्या सतर्कतेमुळे एका दुर्मिळ जीवाचे प्राण वाचले आहेत.

दुचाकीला वाचविण्याचसाठी चारचाकी आयशर ट्रॅक स्लिप , थेट घुसला दुकानात

आतापर्यंत आपण दुचाकी स्लिप झाल्याचं ऐकलं असेल मात्र नाशिकच्या पिंपळगाव मोर या गावांमध्ये चार चाकी आयशर ट्रक स्लिप झाल्याचे पाहायला मिळालं. रस्त्यावरील दुचाकी स्वराला वाचवताना हा ट्रक पूर्णपणे रस्त्यावरून बाजूला गेला आणि बाजूच्या वाळूमुळे स्लीप होत दुकानांमध्ये घुसला. झालेल्या या अपघातामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. तर एका दुकानाचे नुकसान झाले आहे . संपूर्ण अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय

गोसेखुर्द सिंचन प्रकल्पानं तब्बल 38 वर्षानंतर गाठली पूर्ण क्षमतेनं 100 टक्के जलसाठ्याची पातळी

विदर्भाच्या कृषी क्रांतीचं स्वप्न उराशी बाळगून 38 वर्षांपूर्वी म्हणजेच 22 एप्रिल 1988 मध्ये पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते भंडाऱ्याच्या पवनी इथं वैनगंगेवर गोसेखुर्द (इंदिरा सागर) प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती... तब्बल 38 वर्षानंतर गोसेखुर्द धरणाची क्षमता असलेल्या 245.500 मिटर म्हणजेच 1146.075 दशलक्ष घनमीटर साठा निर्मिती करण्यात गोसेखुर्द धरण प्रशासनाला यश आलं आहे. अधिकाऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतर आता प्रकल्पानं जलसाठ्याच्या संचयाचा ऐतिहासिक पल्ला गाठला आहे. गोसीखुर्द धरणाने शंभर टक्के संचयाचे उद्दिष्ट पूर्ण केल्यामुळे पूर्व विदर्भातील शेती आणि विकासासाठी हे एक सुवर्णयुग मानले जात आहे.

Maharashtra Live News Update: एमआयएम जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढवणार

एमआयएम पक्ष सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या 25 जागा लढविणार आहे. ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्यासह शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी एमआयएम पक्ष निवडणुकीला स्वबळावर सामोरे जाणार असल्याची माहिती एमआयएमचे शहर जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी दिली आहे.सोलापूर महानगरपालिकेत 8 नगरसेवक निवडून आल्यामुळे भाजपला एमआयएमच्या रूपाने भक्कम विरोधक असणार आहे.या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, अक्कलकोट,करमाळा, मंगळवेढा, पंढरपूर, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर यासह अन्य तालुक्यांमध्ये एमआयएम पक्ष आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढविणार आहे. इतर पक्षातील कोणी नाराज असतील तर त्यांनी वीस तारखेपर्यंत आमच्याशी संपर्क साधावा आम्ही आमच्या एमआयएम पक्षाचा एबी फॉर्म त्यांना देऊ अशी माहिती जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी दिली आहे.

12 गिर्यारोहकांची 15 तासानंतर सुटका

अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील आजोबागड येथे अडकलेल्या 12 गिर्यारोहकांची सैन्य दल आणि स्थानिकांच्या मदतीने सुटका करण्यात आली.. मुंबई आणि नाशिक येथील 9 पुरुष आणि 3 महिला शनिवारी आजोबागड वर भ्रमंतीसाठी गेले होते.. खाली उतरतांना अंधार झाल्यामुळे रस्ता दिसत नसल्याने हे गिर्यारोहक आजोबा गडाच्या माथ्यावरच अडकले होते.. 15 तास अडकल्यानंतर या गिर्यारोहकांनी स्थानिकांशी आणि सैन्य दलाशी संपर्क केला.. यानंतर स्थानिक नागरिक, वन विभाग आणि सैन्य दलाच्या दहा 10 ते 12 जवानांनी त्यांना सुरक्षित खाली आणले आहे.

रेशन दुकानदाराची आरेरावी; ग्राहकाने केला व्हिडीओ व्हायरल

रेशन दुकानदारांच्या उद्धरगीरी आणि आरेरावीचा व्हिडीओ सद्या व्हारल होत आहे. रायगड जिल्ह्यातील महाडमधील हा व्हिडीओ ग्राहकाने रेकॉर्ड करून व्हायरल केला आहे. महाडच्या कुंभे शिवथर येथील हि घटना असून सदर ग्राहकाने रेशन दुकानदाराकडे पावती मागीतल्या वरून दुकानदार संतापला आणि त्याने ग्राहकाशी उद्धटगीरीची भाषा शिवीगाळ केला आहे. या प्रकरणी सत्यता पडताळून कारवाई केली जावी अशी मागणी केली जात आहे.

ट्रॉली खाली येऊन एका ५१ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू

छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरात ट्रॅक्टरच्या मागील ट्रॉली खाली येऊन एका ५१ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रस्ता ओलांडत असताना ट्रॅक्टरला असलेल्या दुसऱ्या ट्रॉलीच्या चाकाखाली सापडल्याने हा भीषण अपघात झाला. शिवनाथ पवार असे मृत व्यक्तीचे नाव आहे.ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून,परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ धाव घेतली, मात्र तोपर्यंत शिवनाथ पवार यांचा जागीच मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

महाविकास आघाडीची कोल्हापुरात महत्त्वाची बैठक, राष्ट्रवादी शरद पवार गट अलिप्त

कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची कोल्हापुरात महत्त्वाची बैठक होत आहे. काँग्रेस, उद्धवसेना यांच्यासह आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. निवडणूक एकत्रित लढायची की स्वबळावर, यावर आज निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आघाडीपासून अलिप्त राहण्याची भूमिका घेतली आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून बिघाडी झाली होती. याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद निवडणुकीत आघाडीची रणनीती काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून बुधवारी, दिनांक २१ ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. प्रत्येक पक्षाने स्वतंत्र तयारी सुरू केली असली तरी एकत्र लढायचे की स्वतंत्र, याबाबत संभ्रम कायम आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकत्र येऊन जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याच्या चर्चांना वेग आला असला तरी स्थानिक पातळीवर ठोस हालचाली दिसत नाहीत. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता सध्या तरी धूसर मानली जात आहे.

असीम सरोदे यांच्या ऑफिस बाहेरील दोन चंदनाची झाडे चोरीला

डेक्कन परिसरात भांडारकर रोडवर आहे त्याचे ऑफिस

पहाटे साडेतीन-चार च्या सुमारास घडली चोरीची घटना

मावळात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपचा स्वबळाचा नारा,

मावळ तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीशी युती नाही; भाजपची ठाम भूमिका तर महायुतीची पहिली उमेदवार यादी जाहीर

मावळ तालुक्यात होणाऱ्या आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसशी कोणतीही युती केली जाणार नसल्याची ठाम भूमिका भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी मांडली. मावळ तालुक्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राष्ट्रवादीशी युतीबाबत कोणतीही चर्चा अथवा बोलणी झालेली नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नाशिकमध्ये मनसेत लवकरच संघटनात्मक बदल, निवडणुकीतील दारुण पराभवानंतर पक्षात खल

नाशिक महापालिका निवडणुकीतील दारुण पराभव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिव्हारी लागला आहे. पराभवाच्या कारणांचा शोध घेताना निवडणुकीतील पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीचा लेखाजोखा घेतला जाणार आहे. त्या संदर्भातील अहवाल पक्षप्रमुख राज ठाकरे यांना सादर करताना पक्षांतर्गत लवकरच संघटनात्मक बदलाचे संकेत पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिले आहेत. दरम्यान राज ठाकरे देखील लवकरच सर्व उमेदवारांची भेट घेणार आहेत. महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू यांची पहिली जाहीर प्रचारसभा नाशिकमध्ये पार पडली. या सभेतून राज ठाकरे यांनी नाशिककरांना साद घातली. मात्र निकालानंतर मनसेच्या दिग्गज पदाधिकाऱ्यांना पराभवाची चव चाखावी लागली. पक्षाचा केवळ १ नगरसेवक निवडून आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर निवडणुकीत पराभवाची कारणे, प्रचारातील उणिवा, मतदान तसच प्रमुख पदाधिकाऱ्यांची कामगिरी असा सर्वच बाबींचा अहवाल राज ठाकरेंना पाठवण्यात येणार आहे.

सांगलीत शिवसेनेला घेऊन भाजप सत्ता स्थापन करेल..राष्ट्रवादी अजित पवार गटाचेही स्वागत करू - पालकमंत्री चंद्रकांत पाटील.

काठावरच्या गणितांमध्ये आम्ही राज्य देखील चालवतो.. त्यामुळे सांगली महापालिकेत काठावरच्या बहुमतात शिंदे सेनेला घेऊन सत्ता स्थापन करू,असा विश्वास सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.. त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे देखील सत्ते मध्ये स्वागतच असेल,त्याबाबतचा निर्णय स्थानिक राष्ट्रवादीने घेऊन तसा प्रस्ताव दिला पाहिजे, असे

स्पष्ट करत महापालिकेत राष्ट्रवादी अजित पवार गट देखील सोबत येईल,असे संकेत मंत्री चंद्रकांत पाटलांनी दिले आहेत..ते सांगलीमध्ये बोलत होते.

हातकणंगलेत महाविकास आघाडीचा एल्गार

हातकणंगले तालुक्यातील येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी महाविकास आघाडी मोठ्या ताकदीने मैदानात उतरणार आहे. तालुक्यातील ११ जिल्हा परिषद आणि २२ पंचायत समितीच्या जागा काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यासह सर्व घटक पक्ष एकत्र येऊन लढवणार असल्याची स्पष्ट भूमिका माजी खासदार राजू शेट्टी यांनी मांडली आहे. हातकणंगले काँग्रेस कमिटीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, ही निवडणूक म्हणजे धनशक्ती विरोधात जनशक्तीचा लढा असेल. दरम्यान, महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील काही इच्छुक उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा आग्रह धरल्यामुळे जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. हा कळीचा मुद्दा माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी आमदार राजू आवळे यांनी बैठकीतून तात्पुरता बाजूला ठेवत, येत्या दोन दिवसांत अंतिम निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले. राजू शेट्टी यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करताना सांगितले की, तालुक्यातील ग्रामीण पाणीपुरवठ्याचा बोजवारा उडालेला आहे, शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे,जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करून खाजगी शाळांना पोसण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. चोकाक ते अंकली दरम्यानच्या महामार्गाचा प्रश्न जरी मार्गी लागलेला असला, तरी अन्यायकारक शक्तीपीठ मार्गाला आमचा विरोध कायम राहील, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

केवळ नातेसंबंध आहेत म्हणून साक्ष नाकारता येणार नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाचे नागपुर खंडपीठाने स्पष्ट मत व्यक्त

- तसेच ‘नातेवाईक साक्षीदार’ आणि ‘हितसंबंधित साक्षीदार’ वेगळे असल्याचे सांगत आरोपी सावत्र पित्याची जन्मठेप कायम ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय दिला...

- मुंबई उच्च न्यायालयाचा नागपुर खंडपीठाने साक्षीदार याची व्याख्या स्पष्ट करत

- निकालातून थेट लाभ होणारी व्यक्ती म्हणजे हितसंबंधित साक्षीदार, तर फक्त नात्याने संबंधित व्यक्ती म्हणजे नातेवाईक साक्षीदार असे निरीक्षण नोंदवले..

हातकणंगले तालुक्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र!

हातकणंगलेत महाविकास आघाडी सोबत स्वाभिमानी शेतकरी संघटना - राजू शेट्टी यांचा निर्णय

वंचित सोबतची चर्चा अंतिम टप्प्यात

११ जिल्हा परिषद, २२ पंचायत समिती जागांसाठी महाविकास आघाडीची ताकद दाखवणार

धनशक्ती विरोधात जनशक्तीचा लढा

जागावाटपाचा तिढा दोन दिवसांत सुटणार

धाराशिव जिल्ह्यातील 10 हजार शेतकऱ्यांच्या 2 लाख क्विंटल सोयाबीनला हमीभाव

:धाराशिव जिल्ह्यात नाफेडकडुन सुरू केलेली 30 हमीभाव केंद्र शेतकऱ्यांसाठी आधारवड ठरली आहेत.जिल्ह्यातील 10 हजार शेतकऱ्यांच्या 2 लाख 509 क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली असुन त्यापैकी हमीभावाने विक्री केलेल्या 7515 शेतकऱ्यांचे 83 कोटी 77 लाख 50 हजार 744 रुपये थेट त्यांच्या बॅंक खात्यात जमा झाले आहेत.गतवर्षी नाफेड अंतर्गत 20 खरेदी केंद्र सुरू होती तर यंदा 30 सोयाबीन केंद्र सुरू असल्याने गतवर्षीच्या तुलनेत खरेदीचा वेग अधिक आहे.

भूषण दालमिया विरुद्ध नगरपालिका सिओंकडे तक्रार!

बुलढाणा शहरातील रेसिडेन्शियल झोन व भर वस्तीत शेतीसाठी वापरण्यात येणारी विषारी औषधे व साहित्य भिषणसेठ दालमिया यांच्या मुलाने परवानगी न घेता जाळल्याने नागरीकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याची तक्रार प्रभाग क्रमांक 8 चे नगरसेवक सचिन गायकवाड यांनी मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे. शिवाय ह्या कृषी केंद्र कंपनीधारकावर दंडात्मक व फौजदारी कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

प्रभाग क्रमांक ८ मध्ये भीषणसेठ दालमिया यांचे कृषी सेवा केंद्राचे गोडाऊन आहे. येथून शेतीसाठी औषधे विक्री केल्या जाते.

निवडणूक निकालावेळी ध्वनी प्रदूषण करणाऱ्या बुलेट राजांवर पोलिसांकडून कारवाई

मतमोजणी दरम्यान उमेदवारांसोबत येवून बुलेटसारख्या वाहनांमध्ये अनाधिकृत बदल करून ध्वनिप्रदूषण करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

१९ वाहनचालक कार्यकर्त्यांवर ही कारवाई केली असून त्यांच्याकडून ९६ हजार ७०० रूपयांचा दंड वसूल केला आहे.

पुणे ग्रँड चॅलेंज टूर प्रोलॉगसाठी शहरात वाहतुकीत बदल

प्रोलॉग स्पर्धेसाठी ठरविण्यात आलेल्या मार्गांवरून वाहनांची वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात येणार आहे.

गोपाळकृष्ण गोखले रस्ता (फर्ग्युसन कॉलेज रस्ता), गणेशखिंड रस्ता (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रस्ता), जंगली महाराज रस्ता तसेच या मार्गांना जोडणाऱ्या रस्त्यांवर वाहतुकीवर निर्बंध लागू राहतील. स्पर्धेच्या कालावधीत हा संपूर्ण मार्ग दोन्ही बाजूस नो-पार्किंग झोन करण्यात येणार आहे.वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहावी, तसेच स्पर्धकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा आदेश काढण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहनांना (अग्निशामक दल, रुग्णवाहिका, पोलिस वाहने तसेच स्पर्धेशी संबंधित अधिकृत वाहने) या निर्बंधातून वगळण्यात आले आहे.

Maharashtra Live News Update: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला आज सुट्टी

पुणे जिल्ह्यात होत असलेल्या ‘पुणे ग्रॅंड चॅलेंज टूर २०२६’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेनिमित्त जिल्हाधिकारी यांनी संबंधित परिसरातील शाळा,महाविद्यालये, शिक्षण संस्थांना आज सुट्टी जाहीर केली आहे.

या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कार्यालयास आज सुटी जाहीर करण्यात आली आहे,अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाने परिपत्रकाद्वारे दिली आहे.

विद्यापीठ आस्थापनेतील स्थावर विभाग, सुरक्षा विभाग आणि आरोग्य केंद्र हे विभाग अत्यावश्यक सेवा अंतर्गत येत आहेत.

पुण्यात येरवडा येथील शादलबाबा दरग्याजवळ चारचाकीचा अपघात, जीवितहानी नाही

येरवडा येथील शादलबाबा दरग्याजवळ रविवारी पहाटे पावणेतीन वाजता भरधाव चारचाकीचा अपघात झाला.

वेगावर नियंत्रण सुटल्याने चारचाकी दुभाजकाला धडकून नंतर दरग्याजवळ खालच्या बाजूला असलेल्या दुकानांना जाऊन धडकली.यात चारचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पुढील भागाचे नुकसान झाले आहे.तसेच एका दुकानाचेही नुकसान झाले आहे. यावेळी सर्व दुकाने बंद असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

वाळू माफियांना महसूल प्रशासनाचा दणका, ऑन द स्पॉट घरकुल लाभार्थ्यांना दिली वाळू

हिंगोली जिल्ह्यात महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाने वाळू माफियांना चांगलाच दणका दिला आहे जिल्ह्यातील पाचही तालुक्यात महसूल प्रशासनाने जप्त केलेली वाळू शेकडो घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाटप करण्यात आली आहे, ऑन द स्पॉट पंचनामा करून ही वाळू घरकुल लाभार्थ्यांच्या ताब्यात दिल्याने जिल्ह्यातील वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.

Khed - जिल्हा परिषद निवडणूक प्रचारात बिबट्याची दहशत; प्रशासन आणि वनविभाग अलर्ट मोडवर

उत्तर पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असली, तरी ग्रामीण भागात बिबट्याच्या वास्तव्याने प्रचारात भीतीचं वातावरण निर्माण झालंय

गावखेड्यांत आणि शेतशिवारात उमेदवार प्रचार करत असताना बिबट्याची दहशत जाणवू लागली आहे. नागरिक भयभीत असताना निवडणूक प्रशासन अलर्ट मोडवर आलं असून, मुख्य निवडणूक अधिकारी अनिल दौंडे यांनी वनविभागाला सतर्क राहण्याच्या आणि जनतेत जनजागृती करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. निवडणूक काळात सुरक्षितता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाकडून विशेष पथक तयार करण्यात आलं आहे.

शेतकऱ्यांची जमीन सुपीक होणार, हिंगोलीत चिरागशहा तलावातून गाळ उपसा सुरू

हिंगोली मधील शेतकऱ्यांची शेकडो हेक्टर जमीन सुपीक होणार आहे हिंगोली पालिका क्षेत्रात असलेल्या चिराग शहा तलावातून गाळ उपसा करण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे गाळमुक्त तलाव गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत शेतात गाळाची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून अर्थसाह्य देखील करण्यात येणार आहे त्यामुळे दररोज शेतकरी ट्रॅक्टर डंपरच्या सहाय्याने शेतात गाळ घेऊन जाण्यासाठी गर्दी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील संगमवाडीत धावती रिक्षा उलटली

धाड धाड...! भर रस्त्यात तरुणावर गोळीबार, अहिल्यानगरमध्ये २४ तासांत दुसरी घटना

गुलाबी ओठ पाहून घायळ होईल प्रत्येकजण; ट्रेंडिंग Lipstickनं Valentine Day ला असा करा मेकअप

पायलटनं विमान ठरवून पाडलं? इटलीच्या वृत्तपत्राचा दावा

'श्रीमंत गरीब' राजपाल यादव! गावात 200 एकर जमीन, 50 कोटीचं घर; तरी 9 कोटीचं कर्ज फेडायला पैसा नाय, नेमका घोळ काय?

SCROLL FOR NEXT