राज्यात विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली असून निकाल जाहीर झाल्यानंतर आता ८ दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. महायुतीच्या सरकारला राज्याच्या जनतेने एकतर्फी कौल देत बहुमताने विजयी केलं आहे. मात्र असं असूनही अजून सत्तास्थापनेच्या निर्णयावर महायुतीत नाराजी नाट्य बघायला मिळत आहे. आधी मुख्यमंत्रिपदावरून आणि नंतर गृहामंत्रिपदाच्या दावेदारीवरून महायुतीत तिढा असल्याचं बोललं जात आहे. मात्र आता अखेर सत्तास्थापनेचा मुहूर्त लागल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. यासाठी तारीख, वेळ आणि ठिकाण महायुतीने ठरवलं असलं तरी अजून मुख्यमंत्री कोण होणार याबद्दलचा निर्णय गुलदस्त्यातच ठेवण्यात आला आहे.
राज्यातील नव्या सरकारचा शपथविधी ५ डिसेंबरला होणार असून त्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानाची जागा महायुतीने निश्चित केली आहे. दुपारी १२ ते १ वाजेच्या दरम्यान नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडेल, असं विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. भाजपचे देशातील सर्व प्रमुख नेते या शपथविधीसाठी उपस्थित राहणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. तत्पूर्वी या शपथविधी सोहळ्याच्या अनुषंगाने २ किंवा ३ डिसेंबरला भाजपच्या सर्व आमदारांची महत्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मंत्रिमंडळाच्या काही मंत्र्यांची नावं देखील निश्चित होऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, शपथविधी सोहळ्याचं वेळापत्रक जरी ठरवलं गेलं असलं तरी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे अजून महायुतीकडून जाहीर करण्यात आलेलं नाही. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत गुरुवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री भाजपचाच होणार असून त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर चर्चा झाली असल्याचे स्पष्ट संकेत देण्यात आलेले आहे, असं सूत्रांकडून सांगण्यात आलं असलं तरी अद्याप याबाबत भाजप अथवा महायुतीकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
दुसरीकडे अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिलेले एकनाथ शिंदे हे देखील मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र भाजपकडून त्यांना उपमुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव देण्यात आला आहे. हा प्रस्ताव शिंदे यांनी नाकारला आहे, असं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. राज्याचं गृहमंत्रिपद मिळाल्यास मुख्यमंत्रिपदाचा हट्ट सोडायला एकनाथ शिंदे तयार असल्याचंही बोललं जात आहे. परंतु भाजप महत्वाचं गृह खातं सोडेल का? हेही पहाणं गरजेचं ठरणार आहे.
अशी सगळी परिस्थिती असताना शपथविधीचा मुहूर्त महायुतीने ठरवला आहे. येत्या ५ डिसेंबरला राज्याचं नवं सरकार मुंबईच्या आझाद मैदानावर शपथ घेऊ शकत असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा महायुतीकडून करण्यात आलेली नाही. मात्र ३ डिसेंबरला भाजप आमदारांची महत्वाची बैठक पार पडल्यानंतर याबद्दल घोषणा केली जाईल, असं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील आज आपल्या शिर्डी येथील दौऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्याच्या नवीन सरकारचा शपथविधी येत्या ५ तारखेला होईल असं म्हंटलं असल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार? शपथविधी सोहळ्यात मंत्रिमंडळातील किती मंत्री शपथ घेणार याचं चित्र मात्र ३ डिसेंबरच्या बैठकीनंतरच स्पष्ट होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.