Maharashtra weather forecast next 24 hours : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मान्सूनचा जोर ओसरल्याने पावसाने उघडीप दिली आहे. पण बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भासह मराठवाड्यातील काही भागांत पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे आज संपूर्ण विदर्भ आणि नांदेड जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून 'येलो अलर्ट' जारी केला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सलग टिकून
पश्चिम बंगाल, ओडिशा आणि झारखंड भागांत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, चक्राकार वारे वाहत आहेत. ही हवामान प्रणाली हळूहळू पुढे सरकत असल्याने विदर्भात पावसाची शक्यता वाढली आहे. राज्याच्या उर्वरित भागात मात्र ऊन-सावल्यांचा खेळ पाहायला मिळेल आणि काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह पाऊस पडू शकतो.
नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि नांदेड या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहील असा अंदाज वर्तवला आहे. मुंबई, उपनगर आणि पुण्यामध्ये पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पावसाने विश्रांती घेतलेल्या भागात उकाडा वाढला आहे. मंगळवारी सोलापूर येथे राज्यातील सर्वाधिक ३३.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर महाबळेश्वर येथे सर्वात कमी १७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. विदर्भातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी विजांचा कडकडाट सुरू असताना उघड्यावर न थांबता आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.