मुंबई पुण्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी
पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज
विदर्भात उष्णतेचा रेड अलर्ट जारी
नागपूरमध्ये तापमान ४७ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता
राज्यात एकीकडे उन्हाचा कहर तर दुसरीकडे मान्सून पूर्व पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. मुंबईमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी पाऊस पडला. तर पुणे शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसाला सुरूवात झाली आहे. वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पुण्यामध्ये पाऊस सुरू आहे. या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबई आणि पुणेकरांना दिलासा मिळाला. तर विदर्भाला मात्र हवामान खात्याने उष्णतेचा रेड अलर्ट दिला आहे.
पुण्यातील अनेक ठिकाणी मान्सून पूर्व पाऊस सुरु आहे. शहरातील अनेक भागांमध्ये काही ठिकाणी मुसळधार तर काही भागांमध्ये संततधार पाऊस सुरू आहे. हवामान खात्याकडून पुणे शहराला आज येलो अलर्ट देण्यात आला होता. दुपारनंतर शहरात ढगाळ वातावरण आणि विजेचा गडगडाट होतो. आता पुणे शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात संततधार पाऊस सुरू झाला आहे. काही वेळासाठी झालेल्या पावसामुळे पुण्यातील रस्ते जलमय झालेत. पुढील दोन दिवस पुणे जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
पुण्याच्या भोर तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. तासभर पडेलेल्या पावसानं भोर शहराला जोडणाऱ्या नीरा नदीवरील राणी लक्ष्मीबाई पुलावर गुडघाभर पाणी साचल्यानं पुलाला तळ्याचे स्वरूप आले. पुलावर साचलेल्या गुडघाभर पाण्यामुळे वाहनचालकांची तारांबळ उडाली. पाण्यातून वाहन चालवताना चालकांना कसरत करावी लागते. पुलावरील पाण्याचा योग्य निचरा व्हावा यासाठी उपायोजना करण्यात आल्या नसल्यानं हे पाणी साचलेलं पहायला मिळतंय. पहिल्याच पावसाने पुलावरील रस्त्याला ओढ्याचे स्वरूप आल्याने प्रशासनाच्या कामकाजावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या दुर्लक्षपणामुळे रस्त्यावर पाणी साचल्यानं नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय.
तर, पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात आज दुपारनंतर वातावरणात अचानक बदल झाला आणि सणसवाडी परिसरात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला. सणसवाडी आणि परिसरात काळ्या ढगांनी दाटी करत जोरदार पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे वाहनचालकांची तारांबळ उडाली शेतकऱ्यांमध्येही समाधानाचे वातावरण पाहायला मिळत असून या पावसामुळे खरीप हंगामासाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नागपूरसह संपूर्ण विदर्भाला उष्णतेचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. नागपूरचे हवामान तज्ज्ञ प्रवीण कुमार यांनी सांगितले की, नागपूरसह विदर्भात तापमान वाढले आहे. अकोला अमरावती आणि पूर्व विदर्भातील वर्धा चंद्रपूर हे हिटव्हेव प्रभाव जाणवत आहे. पुढील ५ ते ६ दिवस तापमान वाढल्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यांना रेड अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. अकोला यवतमाळ अमरावती, वर्धा, या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.
चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट असणार आहे. सध्याचे तापमान हे सामान्य पेक्षा अधिकच राहील. ४५ ते ४७ च्या घरात हे तापमान राहील. ते काही ठिकाणी ४७ अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह तुरळक पाऊस असेल. सध्या तापमानात घट होऊन कुठलाही दिलासा नागरिकांना मिळेल असं वातावरण तयार झालं नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.