सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मुंबई विद्यापीठाने उद्या गुरुवार दि.१४ जुलै २०२२ रोजीच्या सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले. उद्या मुख्यतः इंजिनिअरिंग विद्याशाखेच्या परीक्षा आहेत. त्याचबरोबर इतरही विद्याशाखेच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत.
पनवेलमध्ये गाढी नदीला आला पूर आला आहे. गाढी नदीचे पाणी धोकादायक पातळीवर आले आहे. नदीतील पाणी वाढल्याने पनवेल कोळीवाढ्यात पाणी घुसले. पनवेल कोळी वाड्यातील अनेक घरात पाणी घुसल्याने लोकांचे नुकसान झाले. इमारतीचा तळ मजला पाण्याने भरला आहे. गाढी नदी शेजारील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे .
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये मोडक-सागर पूर्ण क्षमतेने भरला आहे. मुंबईला दररोज केला जातो ३८५ कोटी लीटर (३,८५० दशलक्ष लीटर) पाण्याचा पुरवठा. मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या ७ तलावांमध्ये ५६.०७ टक्के जलसाठा उपलब्ध आहे.
पुण्याच्या जवळ असलेला सिंहगड किल्ला पर्यटनासाठी तीन दिवस बंद ठेवण्यात यावा असे जिल्हा प्रशासनाला पत्र देण्यात आले आहे. पुण्यात सुरु असलेल्या पावसाचा अंदाज आणि पायथ्यापासून सिंहगडाकडे जाणाऱ्या ९ किमीच्या मार्गाला दरड कोसळण्याच्या शक्यतेमुळे पुणे वनविभागाने जिल्हा प्रशासनाला पत्र लिहून सिंहगड किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना १६ जुलैपर्यंत बंदी घालण्याची विनंती केली आहे.
पुणे जिल्ह्यात येत्या ४८ तासात अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शहरात देखील हवामान विभागाकडून पुढील दोन दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यात असणाऱ्या घाट परिसरात देखील पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागाचे अधिकारी अनुपम कश्यपी यांनी दिली आहे. पुण्यासोबतच पश्चिम महााष्ट्रातील इतर जिल्ह्यात देखील अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आला आहे.
पुण्यातील शाळांना उद्या सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. पावसामुळे सुट्टी जाहीर करण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला आहे.
भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरातील एकमेव स्मशानभूमी पुराच्या पाण्यात बुडाली आहे. मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात आलेल्या मुसळधार पावसामुळे तुमनी नाल्याला पूर आला आहे. तीन ते चार फुटावर पाणी असल्यामुळे शहरातील स्मशानभूमी बंद करण्याची वेळ तुमसर नगरपरिषदेवर आली असून पर्याय व्यवस्था म्हणून तुमसर शहराच्या स्मशानभूमी लगतच करण्यात आली आहे.
खेड तालुक्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस सुरु असल्याने ओढे नदीनाले ओसंडून वाहत आहेत. काही भागातील ओढे नाल्यांवरील रस्तेही वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. वेताळे गावातून साबुर्डी वाशेरेकडे जाणाऱ्या पुलावरुन पाणी जात आहे. नागरिकांनी धोका पत्करुन वेताळे पुलावरुन जाण्याचा प्रयत्न करुन नये नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे, मुसळधार पावसामुळे रेल्वे पटरीवर पाणी साचले आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेमार्गावरील वाहतूक उशिरा धावणार आहे.
मुठा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने मंगळवारी रात्री डेक्कन नदीपात्रातील भिडे पुल पाण्याखाली गेला. त्यामुळे मंगळवारी रात्रीपासूनच भिडे पुल वाहतुकीस बंद करण्यात आला असून वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात आठवडाभरापासून पडत असलेल्या पावसामुळे आता धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. त्याचबरोबर नद्यांची पाणीपातळीही वाढत आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी ३५ फूट पाच इंच एवढी झाली आहे. नदीचे पाणी कोल्हापूर शहराजवळ पात्राबाहेर गेल आहे. पावसाची रिपरिप अशीच राहिली तर आज रात्री उशिरापर्यंत पंचगंगा नदी इशारा पातळीवर म्हणजेच ३९ फुटांवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क आहे.
आज सकाळपासून मुंबईसह राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. मुंबईत सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर बोरीवली ते वांद्रे आणि अंधेरीत बोरिवलीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी, विलेपार्ले,आणि सांताक्रुज दरम्यान मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.