राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आज हवामान खात्याकडून मुंबई-पुण्याला यलो अलर्ट दिला होता. त्यानंतर आज सायंकाळी नवी मुंबई, नाशिक, पुण्यात पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली. त्यात पुण्यात अचानक झालेल्या पावसामुळे गणेशभक्तांची एकच धावाधाव पाहायला मिळाली. (Latest Marathi News)
पुण्यात सायंकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. एक दिवसाच्या विश्रांतीनंतर शहरातील अनेक भागात पाऊस सुरू झाला आहे. अशा पावसातही शहरात गणेशोत्सवाचा देखावा पाहण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी पाहायला मिळत आहे.
पुण्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलं आहे. अचानक आलेल्या पावसामुळे गणपती पाहण्यासाठी आलेल्या भाविकांची धावाधाव पाहायला मिळाली.
पुण्याच्या खेड तालुक्यातही सायंकाळपासून विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. खेड तालुक्यात पाऊस झाल्याने दुष्काळाचं संकट काही प्रमाणात मिटण्याची शक्यता आहे. या पावसामुळे शेतकरी वर्गाला दिलासा मिळणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील पूर्व भागात आज दुपारनंतर पावसाने अनेक ठिकठिकाणी जोरदार हजेरी लावली. चांदवडनंतर मालेगाव परिसरात संध्याकाळच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. यामुळे मालेगावात अनेकांची तारांबळ उडाली. मात्र गेल्या काही महिन्यापासून हलक्या स्वरूपात पडणाऱ्या पावसाने आज दमदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे.
जळगावच्या भुसावळ तालुक्यातील सुसरी येथील शेत शिवारात विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस पडला. यावेळी शेतातून काम आटोपून घरी जात असताना दोन महिलांच्या अंगावर वीज पडली. या घटनेत या दोन्ही महिलांचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी वरणगाव पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
महाडमध्ये जोरदार पाऊस झाला. महाडमध्ये विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाने जोरदार बॅटिंग केली. रायगडमध्ये एक तासापेक्षा अधिक काळ जोरदार पर्यन्यवृष्टी झाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.