Maharashtra MLC Election Results 2023 : संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांचे अंतिम कल हाती आले असून निवडणूकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. त्यांचे ५ पैकी ३ जागेवरील उमेदवार निवडून आले आहे. नाशिकमधील जागा महाविकास आघाडीने गमावली असली तरी, नागपूर, अमरावती आणि औरंगाबादमध्ये महाविकास आघाडीने अपेक्षित यश मिळवलं आहे.
दुसरीकडे निवडणूकीत भाजपला केवळ १ जागा मिळाली आहे. दरम्यान, विधानपरिषदेच्या शिक्षक पदवीधर निवडणूकीत ५ पैकी ३ जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आल्याने कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला आहे. (Latest Marathi News)
देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपुरात भाजपला मोठा धक्का बसला आहे. नागपुर शिक्षक मतदार संघातील महाविकास आघाडी पुरस्कृत कॉंग्रेसचे उमेदवार सुधाकर अडबाले यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी भाजप पुरस्कृत उमेदवार नागो गाणार यांचा पराभव केला आहे.
अडबाले यांना १६ हजार ५०० मते मिळाली, तर गाणार यांना ६ हजार ३६६ मतांवर समाधान मानावे लागले. पहिल्या फेरीत अडबाले यांना १४ हजार ७१ मते मिळाली. तर गाणार ६ हजार ३०९ मतांवर राहिले. अडबाले यांनी पहिल्या फेरीत मतांचा कोटा पूर्ण करून विजय मिळवला.
औरंगाबादेतून विक्रम काळे विजयी
मराठवाडा शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे चौथ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काळे हे विजयी झालेत. निवडणूकीत विक्रम काळे यांना पारड्यात मतदारांनी भरभरून मतं टाकली असून त्यांनी भाजपचे उमेदवार किरण पाटील यांचा ६ हजार ९३७ मतांनी पराभव केला आहे. (Maharashtra Political News)
या मतमोजणीला तब्बल १५ तास लागले. दुसऱ्या पसंतीच्या मतांची ही मोजणी करण्यात आली. विक्रम काळे विजयी होताच, कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला असून भाजपने मोठी ताकद लावूनही मतदारांनी त्यांना जागा दाखवून दिली, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार सतीश चव्हाण यांनी दिली आहे.
अमरावतीत मविआचे धीरज लिंगाडे विजयी
दुसरीकडे अमरावती निवडणूकीत झालेल्या अटीतटीच्या लढाईत महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे हे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांचा पराभव केला आहे. धीरज लिंगाडे यांना ४३ हजार ३४० मतं, तर रणजित पाटील यांना ४१ हजार ०२७ मतं मिळाली आहेत. याशिवाय ८ हजार ५५१ अवैध मते झाली आहेत.
नाशिकमध्ये सत्यजित तांबेंचा विजय
नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. निवडणुकीत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी विजय मिळवला असून महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे.
काँग्रेसमधून बंड करत सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर संपूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकीवर लागून होतं. अखेर निवडणूकीत सत्यजित तांबे यांचा विजय झाला असून त्यांना एकूण ६८ हजार ९९९ मतं मिळवली आहे. तर शुभांगी पाटील यांना केवळ ३९ हजार ५३४ मतांवर समाधान मानावं लागलं आहे. त्यांचा तब्बल २९ हजार ४६५ मतांनी पराभव झाला आहे.
कोकणमध्ये भाजप उमेदवाराचा विजय
कोकण विधान परिषद निवडणूकीत भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय झाला आहेत. त्यांनी महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार आणि विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांना पराभवाचा धक्का दिला आहे. कोकण शिक्षक मतदारसंघात शेकापचे बाळाराम पाटील आणि भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यात सरळ लढत होती. या निवडणुकीत बाळाराम म्हात्रे यांना २० हजार ८०० मते मिळाली. तर शेकापचे बाळाराम पाटील यांना ९ हजार ५०० मते मिळाली. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी ११ हजार ३०० मताधिक्य घेत आपला विजय नोंदवला आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.