Maharashtra News Live Update Saam Tv News
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update : डिलिमिटेशनवर छगन भुजबळांची सावध भूमिका; लोकसंख्येनुसार लोकप्रतिनिधित्व वाढायला हवं

Marathi Breaking Live Headlines Updates : इंडिया आघाडीची आज दिल्लीमध्ये बैठक, डिलिमिटेशन विधेयक, लोकसभेचं हिवाळी अधिवेशन अपडेट, शरद पवार हेल्थ अपडेट, देश- विदेशातील महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

डिलिमिटेशनवर छगन भुजबळांची सावध भूमिका; लोकसंख्येनुसार लोकप्रतिनिधित्व वाढायला हवं

डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर बोलताना छगन भुजबळ यांनी सावध भूमिका घेतली आहे. सुप्रिया सुळे यांनी विधेयक येऊ द्या, त्यानंतर भूमिका घेऊ, असं म्हटल्याचं भुजबळ म्हणाले. त्यांचं स्टेटमेंट मी वाचलं आहे, मात्र याबाबत माझ्याकडे सध्या अधिक माहिती नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

लोकसंख्या गेल्या ६०-७० वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. राज्याची लोकसंख्या वाढली असेल, तर त्या प्रमाणात लोकप्रतिनिधित्वही वाढायला हवं, हा डिलिमिटेशनमागचा उद्देश असू शकतो, असं भुजबळ म्हणाले. महाविकास आघाडी याबाबत काय भूमिका घेते, हा त्यांचा विषय आहे. आघाडीतील नेते एकत्र आल्यानंतर त्यांची भूमिका स्पष्ट होईल, असंही त्यांनी सांगितलं.

आपले दोन राजकीय गुरू बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार असल्याचं सांगत भुजबळ म्हणाले की, शरद पवार हे दुसऱ्या पक्षात आणि वेगळ्या आघाडीत आहेत, तर आपण युतीमध्ये आहोत. त्यामुळे राजकीय परिस्थितीनुसार भूमिका घ्यावी लागेल.

व्यंगचित्रकारांच्या समर्थनार्थ शिवसेनेचे आंदोलन; गुडलक चौकात शिवसैनिक एकवटले

व्यंगचित्रकारांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने गुडलक चौकात आंदोलन करण्यात आले. हातात व्यंगचित्रांच्या फ्रेम घेऊन शिवसैनिकांनी आंदोलनात सहभाग घेतला. व्यंगचित्रकारांच्या समर्थनार्थ शिवसैनिकांनी एकत्र येत आपली भूमिका मांडली.

डिलिमिटेशन बिलाला DMK चा पाठिंबा; चेन्नईतील बैठकीत निर्णय

डिलिमिटेशन बिलाला DMK ने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नईमध्ये झालेल्या बैठकीत पक्षाने याबाबत भूमिका स्पष्ट केली असून, डिलिमिटेशन बिलाच्या समर्थनार्थ निर्णय घेण्यात आला आहे.

एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमाला आलेल्या सात विधवा महिलांना पोलिसांनी रात्री १० वाजेपर्यंत डांबून ठेवल्याचा आरोप

बुलढाण्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमाला आलेल्या सात विधवा महिलांना मेहकर पोलिसांनी रात्री १० वाजेपर्यंत स्थानबद्ध करून ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. नैसर्गिक विधीसाठीही पोलिसांनी तब्बल दहा तास जाऊ दिलं नाही, असा दावा या महिलांनी केला आहे.

संशयाच्या आधारावर या महिलांना स्थानबद्ध करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

मीटर नाही, वीज वापर नाही; तरीही २,३६० रुपयांचे बिल! महावितरणचा भोंगळ कारभार

गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी येथे महावितरणचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. ज्या घरात वीज मीटरच बसवण्यात आलेले नाही, त्याच घराला तब्बल २ हजार ३६० रुपयांचे वीज बिल पाठवण्यात आले आहे. मीटर नसताना आणि वीज वापरच नसताना बिल आल्याने संबंधित ग्राहक हैराण झाला आहे.

या प्रकारामुळे आष्टीतील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. जिथे मीटर नाही, तिथे बिल येतं आणि जिथे मीटर आहे, तिथेही अव्वाच्या सव्वा बिल आकारलं जातं, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. महावितरणकडून केवळ बिल वसुलीसाठी तगादा लावला जातो आणि बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित केला जातो, असा आरोपही नागरिकांनी केला आहे. महावितरणच्या या भोंगळ कारभारावर प्रशासन काय उत्तर देणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

माहीममधील ज्वेलर्सवर गोळीबार प्रकरणी गुन्हे शाखेचा तपास; सहा पथके तीन राज्यांत रवाना

माहीम येथील एल. जे. रोडवरील पी. सी. जैन ज्वेलर्सवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला आहे. गुन्हे शाखेच्या विविध पथकांमधील सहा विशेष पथके तपासासाठी तीन राज्यांत रवाना करण्यात आली आहेत. प्राथमिक तपासात हा गोळीबार स्थानिक टोळीने घडवून आणल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

ज्वेलर्सचे मालक भरत जैन (४५) यांच्या तक्रारीनुसार, त्यांना १८, २४ आणि ३१ ऑक्टोबर रोजी मोबाईलवर धमकीचे संदेश आले होते. या संदेशांद्वारे १० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर बुधवारी सायंकाळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी दुकानावर गोळीबार करून घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेकडून आरोपींचा शोध सुरू आहे.

पुण्यात बेशिस्त पार्किंगला लगाम; १५ डिसेंबरपासून नव्या पार्किंग धोरणाची प्रायोगिक अंमलबजावणी

अतिक्रमणांवर बुलडोझर फिरवून रस्ते मोकळे करणाऱ्या पुणे महापालिकेने आता बेशिस्त पार्किंगविरोधात मोर्चा वळवला आहे. रस्त्यांच्या दुतर्फा वाहने उभी केल्यामुळे होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी स्वतंत्र पार्किंग धोरण तयार करण्यात येत असून, १५ डिसेंबरपासून त्याची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी केली जाणार आहे. दोन ते तीन महिने या धोरणाच्या परिणामांचा अभ्यास करून आवश्यक बदलांसह शहराच्या अन्य भागांतही त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती महापौर मंजुषा नागपुरे यांनी दिली.

पत्रकारांशी संवाद साधताना महापौरांनी पार्किंग व्यवस्थेतील त्रुटींवरही लक्ष वेधले. केवळ अतिक्रमणे हटवून उपयोग होणार नाही, तर मोकळे केलेले रस्ते वाहतुकीसाठी उपलब्ध राहतील, याची खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. फर्ग्युसन रस्ता, सेनापती बापट रस्ता यांसह प्रमुख रस्त्यांवर वाहनांच्या पार्किंगमुळे वाहतुकीसाठी उपलब्ध जागा कमी होत असल्याने रस्त्यांनुसार पार्किंग व्यवस्थेची नव्याने आखणी केली जाणार आहे. नव्या धोरणांतर्गत 'नो पार्किंग'चे फलक, रिक्षा थांब्यांसाठी स्वतंत्र फलक आणि वाहनतळासाठी रस्त्यांवर मार्किंग करण्यात येणार असून, १५ डिसेंबरपर्यंत तयारी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे.

नांद्रीतील वाळूमाफियांच्या दहशतीविरोधात छत्रपती शिवाजी ब्रिगेड आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

अमळनेर तालुक्यातील नांद्री येथे अवैध वाळू चोरीविरोधात तक्रार केल्याने शरद रतन पाटील यांची डंपरखाली चिरडून हत्या झाल्याच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, या मागणीसाठी छत्रपती शिवाजी ब्रिगेडच्या वतीने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

मयत शरद पाटील यांच्या कुटुंबीयांनी अस्थी हातात घेऊन शिवतीर्थ मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढला. या प्रकरणात जबाबदार अधिकारी आणि संशयित आरोपींवर गुन्हे दाखल करण्यासह पीडित कुटुंबाला ५० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली. वाळूमाफियांच्या दहशतीविरोधात संघटना आक्रमक झाली असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

अमरावतीच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात अस्वच्छतेचे साम्राज्य; देखभाल निधीच्या खर्चावर प्रश्नचिन्ह

अमरावतीच्या सर्वात मोठ्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. बाहेरगावाहून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना यामुळे मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. रुग्णालय परिसरातील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचीही नियमित देखभाल आणि दुरुस्ती होत नसल्याचे चित्र समोर आले आहे.

रुग्णालय आणि परिसराच्या देखभाल-दुरुस्तीसाठी दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जात असतानाही प्रत्यक्षात परिस्थिती जैसे थे असल्याने या निधीच्या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रुग्णालय परिसरात अस्वच्छता वाढत असून, या कारभाराबाबत नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

पुण्यात अतिक्रमणांवर सलग दहाव्या दिवशी बुलडोझर; २.२० लाख चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटवली

पुणे शहरातील अतिक्रमणांविरोधात महापालिकेने सुरू केलेल्या मोहिमेचा धडाका कायम असून, सलग दहाव्या दिवशीही बुलडोझर कारवाई सुरू आहे. काल शहराच्या विविध भागांत तब्बल २ लाख २० हजार ५३० चौरस फूट क्षेत्रावरील अतिक्रमणे हटवण्यात आली. खराडी, केशवनगर, धायरी, नऱ्हे, बावधन, धनकवडी आणि कात्रज परिसरात मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली. सहापैकी पाच परिमंडळांत महापालिकेचे बुलडोझर धडाडले, तर सहाव्या परिमंडळात मनुष्यबळाअभावी प्रत्यक्ष कारवाई होऊ शकली नाही.

पहिल्या परिमंडळांतर्गत खराडी पूर्व भागातील बाह्यवळण रस्ता, गावठाण रस्ता, झेनस्टार आयटी पार्क रस्ता, केशवनगर-मांजरी रस्ता आणि रेणुकामाता मंदिर चौक परिसरात तब्बल ६९ हजार ९५० चौरस फूट क्षेत्रावरील अतिक्रमणे हटवण्यात आली. पुणे शहरातील अतिक्रमणे आणि अनधिकृत फ्लेक्सविरोधात महापालिका प्रशासन आक्रमक झाले असून, शहरभर जोरदार कारवाई सुरू आहे.

जमिनींच्या बोगस व्यवहारांना लगाम; दस्त तयार करणाऱ्याची ओळख अनिवार्य करण्याचा प्रस्ताव

बनावट सातबारा, तोतया मालक आणि बोगस दस्तांच्या माध्यमातून होणाऱ्या जमीन व्यवहारांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. दस्त तयार करणाऱ्या व्यक्तीची ओळख आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी नवा नियम प्रस्तावित करण्यात आला असून, दस्त तयार करणाऱ्याचे नाव, पत्ता, स्वाक्षरी आणि ओळखपत्र जोडणे बंधनकारक करण्याचा प्रस्ताव आहे.

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने हा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. शासनाची मंजुरी मिळताच नव्या नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. बनावट कागदपत्रे आढळल्यास दस्त तयार करणाऱ्यावरही कायदेशीर कारवाईचा मार्ग मोकळा होणार असून, नोंदणी अधिनियमातील कलम ८२ अंतर्गत कारवाईला बळ मिळणार आहे. यामुळे जमीन व्यवहारांतील फसवणुकीला आळा बसण्यासोबतच नोंदणी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरील नाहक आरोपही कमी होण्याची शक्यता आहे.

विहिरीत पडलेल्या रानगव्याचे वनविभागाकडून बचावकार्य

सावंतवाडी परिसरातील बांदा भालावल येथे एका शेतविहिरीत गवारेडा पडल्याची घटना घडली. विहिरीला सुरक्षा कठडा नसल्याने हा गवारेडा अनावधानाने विहिरीत कोसळला. याची माहिती मिळताच वनविभागाच्या रेस्क्यू टीमने तातडीने घटनास्थळी दाखल होत बचावकार्य केले. जेसीबीच्या साहाय्याने विहिरीच्या एका बाजूने माती उकरून उतार तयार करण्यात आला आणि गवारेड्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले. बांदा परीसरात रानगव्यांचा कळप काही दिवसांपासून स्थिरावला असून शेती बागायतीचे नुकसान या रानगव्यांकडून करण्यात येत आहे त्यामुळे गव्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

ठाणे शहर विद्रूप करणाऱ्या अनधिकृत होर्डिंग्जवर 'स्पेशल ड्राईव्ह'द्वारे कठोर कारवाई करा; एकनाथ शिंदे

शहरातील बेकायदेशीर आणि अनधिकृत होर्डिंग्जवर तातडीने कठोर कारवाई करण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरव राव यांना दिले आहेत. अनधिकृत फलकांमुळे शहराचे मोठ्या प्रमाणावर विद्रूपीकरण होत असून, याविरोधात स्पेशल ड्राईव्ह राबवून ठोस कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

केवळ होर्डिंग्ज हटवून न थांबता, बेकायदेशीर फलक लावणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करा आणि प्रसंगी गुन्हे दाखल करा असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

आज इंडिया आघाडीची तर उद्या भाजप खासदारांची बैठक

पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत बैठकांचे सत्र

आज इंडिया आघाडीची तर उद्या भाजप खासदारांची बैठक

उद्या दिल्लीत होणार भाजप खासदारांची बैठक

डेलिमिटेशन विधेयक आणि त्यावर भूमिका मांडण्याबाबत भाजपचे वरिष्ठ नेते करणार मार्गदर्शन

जळगाव जिल्हा बँकेच्या नऊ जागांसाठी उद्या मतदान

जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर आता नऊ जागांसाठी रविवारी (ता. २९) मतदान होणार आहे. या निवडणुकीत निवडून द्यावयाच्या २१ जागांपैकी १२ जागा माघारीवेळी बिनविरोध झाल्या आहेत. आता नऊ जागांसाठी २९ उमेदवार रिंगणात आहेत. एकूण ३० मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. आता महायुतीचे सहकार पॅनल विरुद्ध काँग्रेस-शेतकरी संघटनेचे शेतकरी पॅनल यांच्यात सरळ लढत होणार आहे.

लग्नाचा बस्ता घेण्यासाठी जळगावला येणाऱ्या कुटुंबाच्या कारचा भीषण अपघात

चोपडा तालुक्यातील अडावद येथून नातेवाइकांच्या मुलाच्या लग्नाचा बस्ता घेण्यासाठी जळगाव शहरात येत असलेल्या कुटुंबाच्या कारला भीषण अपघात झाला. भरधाव कारचे पुढील टायर अचानक फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्यावर पलटी झाली. या भीषण अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अन्य सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

पश्चिम रेल्वेला लेटमार्क, ३० मिनिटे उशिराने

पश्चिम रेल्वेची वाहतूक २५ मिनिट उशिराने धावत आहे

तांत्रिक बिघाड झाल्यामुळे गाड्या उशिराने धावत असल्याची माहिती

तटरक्षक दलाचे हॉवरक्राफ्ट रत्नागिरीत

गोवा ते मुंबई दरम्यान गस्त घालणारे भारतीय तटरक्षक दलाचे अत्याधुनिक हॉवरक्राफ्ट हे जहाज रत्नागिरीतील भाट्ये येथे दाखल झालं होतं. जिल्हाधिकारी मनुज जिंदल आणि पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी याची प्रत्यक्ष सफर करीत तांत्रिक वैशिष्ट्यांची आणि कार्यपद्धतीची माहिती घेतली. यावेळी रत्नागिरी तटरक्षक दलाचे अधिकारीही उपस्थित होते.

छत्रपती संभाजीनगर : गंगापूर-संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात; कंटेनरच्या धडकेत दोन कारचा चक्काचूर

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील गंगापूर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील सिद्धार्थ जिनिंग जवळ शुक्रवारी रात्री भीषण अपघात घडला आहे. भरधाव कंटेनरने ओव्हरटेक करण्याच्या नादात दोन कारला जोरदार धडक दिली. या अपघातात एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत.

पुणे महापालिकेत अधिकाऱ्यांची दांड,स्थायी समितीची बैठक तहकूब

पुणे महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या मनमानीचा फटका थेट स्थायी समितीच्या कामकाजाला बसला आहे.

स्थायी समितीची महत्त्वाची बैठक असताना आयुक्तांसह दोन अतिरिक्त आयुक्त आणि अनेक विभागप्रमुखांनी बैठकीकडे पाठ फिरवली.

तब्बल दीड तास प्रतीक्षा करूनही अधिकारी उपस्थित न झाल्याने संतप्त सदस्यांनी बैठक तहकूब करण्याची मागणी केली. अखेर अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी बैठक तहकूब केली.

यंदा हिवाळी अधिवेशन ८,२६९ पोलिसांचा नजरेखाली

- हिवाळी अधिवेशनाच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्ताची तयारी केली आहे. अधिवेशन काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नागपूर शहर पोलिसांसह बाहेरील जिल्ह्यांतून ५ हजार ९५० अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड आणि एसआरपीएफ जवान तैनात करण्यात येणार आहेत.

- स्थानिक आणि बाहेरील मिळून एकूण ८ हजार २६९ पोलिस सुरक्षा व्यवस्था सांभाळतील

दौंड रेल्वे जंक्शनच्या कॅन्टीनला आग लागल्याची घटना

पुणे जिल्ह्यातील दौंड रेल्वे जंक्शनच्या कॅन्टीनला २७ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री आग लागल्याची घटना समोर आली आहे.ही आग फलाट क्रमांक ३ वरील पत्र्याच्या शेडपर्यंत पसरल्याची माहिती आहे.तत्काळ आग विझवण्याचे काम सुरू करण्यात आले आणि खबरदारीचा उपाय म्हणून वीजपुरवठा देखील तात्पुरता बंद करण्यात आला.आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

उरुळी कांचन येथे डंपरने दुचाकीला चिरडले ; महिलेचा जागीच मृत्यू, तरुणाची मृत्यूशी झुंज

उरुळी कांचन (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन येथील इरिगेशन कॉलनी चौकात भरधाव डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. डंपरच्या चाकाखाली महिला चिरडली गेल्याने घटनास्थळी मृत्यूचा थरार उडाला. शुक्रवारी (ता. 27) सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास हा भीषण अपघात घडला.

महात्मा फुले फेस्टिवलमध्ये राडा, भर कार्यक्रमात एका विद्यार्थ्याला मारहाण

फुले फेस्टिवलमध्ये लोककलावंतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता

कार्यक्रमाची सोशल मीडिया वरून ज्या प्रकारे जाहिरात करण्यात आली होती त्यानुसार इथे कार्यक्रम पाहण्यास आलेल्या लोकांना फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराज यांचे विचार त्यांच्यावर प्रबोधनात्मक गाणी ऐकण्यासाठी लोकांचा लोक इथे आले होते पण तसे न होता धार्मिकता आणि मोठ्या प्रमाणावर देवाची गाणी सादर केल्यामुळे इथे उपस्थित काही लोकांनी आक्षेप घेतला आणि आंबेडकरांचे नारे दिले त्यावरून गोंधळ झाला यावरून एका विद्यार्थ्याला राष्ट्रसेवा दलाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण केलीय...

Maharashtra News Live Update : पुण्यातील बुधवार पेठे परिसरातील मिठाई व्‍यावसायिकांवर एफडीएची कारवाई

अस्वच्छता आणि विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या आठ व्‍यावसायिकांची तपासणी करून ५१२.१ किलो मिठाई जप्त केली. सुमारे २ लाख ८८ हजार २०० रुपये किमतीचा हा साठा नाशवंत असल्याने जागेवरच नष्ट करण्यात आला.

‘एफडीए’च्या परिमंडळ-०६ व ०८ च्या पथकांनी ही मोहीम राबवली. यामध्ये बुधवार पेठ परिसरातील मे. श्रीमंत पेढेवाले, मे. श्री मंगल मूर्ती, मे. मंगलमूर्ती पेढे, मे. धारवाडी पेढे स्वीट्स अँड स्नॅक्स, मे. जय गणेश स्वीट सेंटर, मे. अथर्व स्वीट सेंटर, मे. हर्षवर्धन मिठाई उत्पादन केंद्र आणि मे. श्री कृपा दुग्धालय या व्यावसायिकांची तपासणी करण्यात आली. तर, मे. श्री मंगल मूर्ती आणि मे. हर्षवर्धन मिठाई उत्पादन केंद्र हे विनापरवाना सुरू असल्याचे आढळल्याने मंगल मूर्तीला व्यवसाय बंदची नोटीस बजावण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delimitation Bill : ‘शरद पवारांच्या सहकाऱ्यांनी माती खाल्ली’; संजय राऊत राष्ट्रवादीच्या खासदारांवर कडाडले, भाजपवरही निशाणा

Bhendi Bazaar : भेंडीच्या भाजीवरून पडलंय का मुंबईतील 'भेंडी बाजाराचं' नाव? उत्तर वाचून धक्काच बसेल

Delimitation Bill: मोठी बातमी! २२ खासदारांच्या पक्षाचा डिलिमिटेशनला पाठिंबा; संसदेतील राजकीय गणित बदलले

अंडी उकडताना फुटत असतील तर काय करावे?

Delimitation Bill : DMK डिलिमिटेशनला पाठिंबा देणार का? भाजप सरकारपुढे ठेवल्या 'या' अटी

SCROLL FOR NEXT