महाराष्ट्र शासनाचे नऊ कंपन्यांसोबत सामंजस्य करार
तब्बल ८०,९६२ कोटींची गुंतवणूक राज्यात होणार
४०,३०० रोजगार निर्मितीची संधी युवकांना उपलब्ध
विदर्भ, मराठवाडा व कोकणातील औद्योगिक विकासाला मोठी गती
मुंबईतील गोरेगाव येथे एआयआयएफए (आयफा) आयोजित स्टील महाकुंभ कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाचे नऊ कंपन्यांशी ८०,९६२ कोटी रूपयांचे सामंजस्य करार स्वाक्षरित झाले. या करारामुळे राज्यात ४० हजार ३०० रोजगार निर्मिती होणार आहे.
गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, रायगड, छत्रपती संभाजीनगर, सातारा आदी जिल्ह्यांत हे प्रकल्प उभारले जाणार आहेत. गडचिरोलीत सुमेध टुल्स प्रा. लि. आणि हरिओम पाइप इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या संयुक्त प्रकल्पांमुळे ५,५०० रोजगार उपलब्ध होणार असून ५,१३५ कोटींची गुंतवणूक होणार आहे.
छत्रपती संभाजीनगरात एनपीएसपीएल अॅडव्हान्स्ड मटेरियल (अथा ग्रुप) प्रा. लि. तर्फे ५,४४० कोटींची गुंतवणूक करून ‘क्रिटिकली अॅडव्हान्स्ड लिथियम बॅटरी मटेरियल आणि कार्बन कॉम्प्लेक्स’ उभारले जाणार आहे. यामुळे ५,००० रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. वर्धा येथे रश्मी मेटलर्जिकल इंडस्ट्री प्रा. लि.चा २५,००० कोटींचा एकात्मिक स्टील प्रकल्प येणार असून यामुळे १२,००० रोजगार निर्मिती अपेक्षित आहे.
रायगडमध्ये जिंदाल स्टेनलेस लिमिटेडचा ४१,५८० कोटींचा स्टेनलेस स्टील प्रकल्प उभारण्यात येणार असून त्याद्वारे तब्बल १५,५०० रोजगार निर्माण होतील. याशिवाय चंद्रपूर, सातारा व नागपूर येथेही स्पंज आयर्न, ऑटोमोटिव्ह स्टील पार्ट्स आणि आयएसपी प्रकल्प उभारले जाणार आहेत. चंद्रपूर येथे आयकॉन स्टील इंडिया प्रा.लि. ८५० कोटीची स्पंज प्रकल्पामध्ये गुंतवणूक करत असून यातून १५०० रोजगार निर्माण होतील. वाई येथे फिल्ट्रम ॲटोकॉम्प प्रा.लि. हे १०० कोटी रूपयांची ऑटोमोटिव्ह स्टील पार्टमध्ये गुंतवणूक करत असून याद्वारे १,२०० रोजगार निर्मिती होणार आहे.
मूल येथे जी.आर.कृश्ना फेरो अलॉय प्रा.लि. हे स्पंज निर्मितीसाठी १,४८२ कोटी रूपयांची गुंतवणूक करत असून यातून ५०० रोजगार निर्मिती होईल. त्याचबरोबर नागपूर येथे जयदीप स्टीलवर्क इंडिया प्रा.लि. ही कंपनी आयएसपी प्रकल्पाकरिता १,३७५ कोटी रूपयांची गुंतवणूक करत असून यातून ६०० रोजगार निर्मिती होणार आहे.
मुंबईत पार पडलेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत यांच्या उपस्थितीत 9 सामंजस्य करार करण्यात आले. या करारांमुळे भविष्यात तरुणांना रोजगार निर्मिती होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. या गुंतवणुकीमुळे विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील औद्योगिक विकासाला गती मिळणार असून स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.