गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर मुंबईहून आलेल्या तरुणांपैकी तीन जण बुडाले
एकाचा मृत्यू, दोघांना वाचवण्यात यश
जीवरक्षकांनी वेळेवर धाव घेऊन दोघांचे जीव वाचवले
मृताच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर
रत्नागिरीतून धक्कदायक बातमी समोर आली आहे. गणपतीपुळे येथे मुंबईहून देवदर्शन व पर्यटनासाठी आलेल्या पाच तरुणांच्या ग्रुपपैकी तीन जण समुद्रात बुडाले. यातील एकाचा मृत्यू झाला आहे तर दोघांना वाचवण्यात यश आले आहे. या दोघांना उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. दरम्यान या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून मृत तरुणाच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी येथील प्रसिद्ध असलेल्या गणपतीपुळे पर्यटनस्थळाला भेट देण्यासाठी तसेच देवदर्शनासाठी पाच जणांचा ग्रुप आला होता. ते एका खासगी लॉजमध्ये राहण्यासाठी थांबले होते. दुपारनंतर ते समुद्रात उतरले. सायंकाळी उशिरापर्यंत ते समुद्रात खेळत होते. त्यातील प्रफुल्ल त्रिमुखी, भीमराज आगाळे आणि विवेक शेलार या तीन तरुणांनी समुद्राच्या खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते बुडू लागले.
यावेळी त्यांच्या इतर मित्रांनी आरडाओरडा केला. त्यानंतर समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या मोरया वॉटर स्पोर्टस् व्यावसायिक व जीवरक्षक यांनी समुद्रात उडी घेऊन या तिन्ही तरुणांना समुद्राच्या पाण्याबाहेर काढले. त्यांना तत्काळ गणपतीपुळे देवस्थानच्या रुग्णवाहिकेने मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली. प्रफुल्ल त्रिमुखी हा मृत झाल्याचे घोषित केले, तर भीमराज आगाळे आणि विवेक शेलार यांच्यावर तातडीने उपचार सुरु केले. भीमराज आणि विवेक थोड्या वेळात शुद्धीवर आल्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
मृत तरुण प्रफुल्ल त्रिमुखी याचे शवविच्छेदन करण्यासाठी खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात येणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता पवार आणि अमोल पणकुठे यांनी सांगितले. त्याच्या कुटुंबीयांना या घटनेबाबत कळविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेबाबत अधिक तपास जयगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय पाटील व त्यांचे सहकारी करीत आहेत. दरम्यान या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून मृत प्रफुल्लच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.