MNS Chief Raj Thackeray Slams CM Uddhav Thackeray
MNS Chief Raj Thackeray Slams CM Uddhav Thackeray Saam TV
महाराष्ट्र

वर्षभरापूर्वी अ‍ॅम्ब्युलन्सचे भोंगे वाजत होते, आता...; मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंवर निशाणा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : शिवसेनेच्या मास्टर सभेनंतर आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांनी कोविड वॉरियर' पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यातून विरोधकांवर तोफ डागली आहे. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal singh chahal) यांनी लिहिलेल्या 'कोविड वॉरियर' पुस्तकाचा (covid warrior book) प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. यावेळी ठाकरे यांनी कोविड काळातील लढ्याबाबत माहिती दिली. कोविडवर बोलत असतानाच त्यांनी विरोधकांचा समाचारही घेतला. वर्षभरापूर्वी अ‍ॅम्ब्युलन्सचे भोंगे वाजत होते आता बाकीचे भोंगे वाजायला लागलेत, अशा शब्दात मुख्यमंत्री ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे.

कोविड वॉरियर पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, कोविड विषाणू महामारीच्या संकटात मुंबईत आयुक्तांपासून ते सफाई कामगारांपर्यंत सर्वांनीच न खचता काम करुन कोविडविरुद्ध लढा दिला. या काळात ज्या विविध उपाययोजना करुन कोविड नियंत्रणात आणला त्या 'मुंबई मॉडेल'ची यशोगाथा 'इकबाल सिंह चहल -कोविड वॉरियर' या पुस्तकाद्वारे जगासमोर मांडली जाईल. प्रसिद्ध लेखक मिनाझ मर्चंट लिखित 'इकबाल सिंह चहल - कोविड वॉरियर' या पुस्तकाचे आज सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते प्रकाशन झाले.सह्याद्री अतिथीगृहात आयोजित या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरण,पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे, राज्यसभा सदस्य अनिल देसाई,'महारेरा'चे अध्यक्ष अजोय मेहता,बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ.इक्बाल सिंह चहल आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, कोविडचा काळ हा कसोटीचा काळ होता.कोविडशी लढण्याचा जगाला अनुभव नव्हता.कोविडवर उपचार नव्हता तरी त्याचे व्यवस्थापन करु शकत होतो, अशी परिस्थिती होती.मार्च २०२० मध्ये कोविड केंद्र सुरु करण्याच्या सूचना दिल्या आणि वांद्रे कुर्ला संकुलात देशातील पहिले जम्बो कोविड रुग्णालय केवळ पंधरा दिवसात महानगरपालिकेने सुरु केले,अजूनही हे रुग्णालय तसेच ठेवले असून या ठिकाणी कायमस्वरुपी पाणीपुरवठा आणि मलनिस्सारणाची सुविधा निर्माण केली आहे, विविध उपाययोजना करणे हे एक सांघिक काम होते,या संपूर्ण अधिकारी-कर्मचाऱ्यांवर विश्वास टाकून त्यांच्यात हिंमत जागवली, त्यावेळी या सर्वांनी अतिशय अवघड काम केले. एक कॅप्टन म्हणून त्यांच्यात आत्मविश्वास जागवण्याचे काम आपण केले असेही मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले.

डॉक्टरांचा टास्क फोर्स नेमण्यासह एक-एक गोष्टी शिकत आणि त्या करीत गेलो.लॉकडाऊनच्या काळात मजूर घरी जाण्यासाठी पायी निघाले,रस्त्याने जाणाऱ्या या मजूरांना अन्नाची पाकिटे दिली.केंद्राकडे गाड्यांची त्यावेळी मागणी केली,गाड्यांना परवानगी देण्याची मागणी केली,अतिशय झोप उडवणारा हा काळ होता. अर्थचक्र पुर्ववत करण्यासारखे अनेक प्रश्न होते,ऑक्सिजनचा पुरवठा होत नव्हता,अशावेळी ऑक्सिजनच्याअभावी एकही मृत्यू होणार नाही याची दक्षता महानगरपालिकेने घेतली आणि ऐन ऑक्सिजनच्या टंचाईत दीडशे रुग्णांना स्थलांतरित केले त्यामुळे मोठी हानी आपण टाळू शकलो असे सांगून कोविडकाळात ज्या काही उपाययोजना आपण केल्या त्या माहितीचे संकलन होणेदेखील आवश्यक होते, त्या सर्व गोष्टींची माहिती या पुस्तकात आहे,असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

धारावीमध्ये कोविड नियंत्रणात आणला त्याचे जगभरात कौतुक झाले.रुग्णालये, खाटांचे व्यवस्थापन, रुग्णवाहिका अशा अनेक उपाययोजना केल्या. बोलणे आणि कृती यातील अंतर कमी केले म्हणून कोविडची यशोगाथा आपण या पुस्तकाद्वारे जगासमोर मांडू शकलो असे सांगून कोविडकाळात महापालिका, बेस्ट आणि सर्व यंत्रणांनी न खचता केलेल्या कामाचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी कौतुक केले आणि हे यश कोविडयोद्ध्यांना अर्पण केले.पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोविड काळात केलेल्या कामाचे कौतुक केले.

आयुक्त डॉ.चहल यांनी पदभार स्वीकारल्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच स्वतः मुंबईत फिरायला सुरुवात केली, त्यांच्या या कृतीमुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी हिंमतीने या संकटाविरुद्ध लढा दिला. विकेंद्रीकरणावर भर दिल्यामुळे यंत्रणेला तात्काळ निर्णय घेता आले.त्यातूनच या मुंबई मॉडेलच्या विविध उपाययोजना करता आल्या असे सांगून 'इकबाल सिंह चहल -कोविड वॉरियर' या पुस्तकाचा इतर भाषांमधून अनुवाद होईल आणि इतरांना त्यातील माहिती मार्गदर्शक ठरेल असा विश्वासही पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

आयुक्त डॉ. चहल यांनी कोविड काळात केलेल्या उपाययोजनांची माहिती प्रास्ताविकात दिली. ते म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनातून कोविड उपाययोजनांचे २९ विविध मॉडेल्स तयार केले. मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून जम्बो कोविड केंद्रांची उभारणी झाली, 'माझे कुटुंब,माझी जबाबदारी' सारख्या मोहिमेमुळे ३५ लाख कुटुंबांपर्यंत महानगरपालिका पोहोचली. रुग्णाला थेट कोविड अहवाल न देता प्रभाग कार्यालयाच्या माध्यमातून हा अहवाल देणारे मुंबई हे जगातील एकमेव शहर असून सुमारे पावणेअकरा लाख कोविड अहवाल दिले.

धारावी पॅटर्न, रुग्णवाहिका, १४४ खाजगी रुग्णालयांना महापालिकेच्या डॅशबोर्डवर आणणे, ऑक्सिजन सुविधा, लसीकरणावर भर आदी स्वरुपाची असंख्य कामे या काळात झाली असून त्यासह मिशन झिरो, कोविड चाचण्या असे विविध मॉडेल्स तयार केले, त्यातून 'मुंबई मॉडेल' ची सविस्तर माहिती या पुस्तकात दिली आहे, असेही आयुक्त डॉ. चहल यांनी यावेळी सांगितले.कोविड-१९ विषाणूच्या संसर्ग कालावधीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी विविध उपाययोजना केल्या, त्या उपाययोजना 'मुंबई मॉडेल' च्या रूपाने देशातच नव्हे तर जगभरात नावाजल्या गेल्या.

डॉ. चहल यांच्या प्रशासकीय नेतृत्वाखाली मुंबईसारख्या दाट घनता असलेल्या लोकसंख्येच्या महानगरात कोविड-१९ संसर्ग वेळीच नियंत्रणात आणण्यात यश आले, ही यशोगाथा लेखक मिनाझ मर्चंट यांनी 'इकबाल सिंह चहल - कोविड वॉरियर' या पुस्तकाच्या रुपाने शब्दबद्ध केली आहे.यावेळी लेखक मिनाझ मर्चंट, 'महारेरा' चे अध्यक्ष अजोय मेहता यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यांच्यासह मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, डॉ. संजीव कुमार, पी. वेलरासू आदी मान्यवर उपस्थित होते.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : राजकारण माझ्यासाठी नवं नाही, चंद्रहार पाटील सांगलीतून गरजले

Sleeping Promblem: रात्री चांगली झोप लागत नाही, आहारात करा बदल

Lok Sabha Election: नवी मुंबईत भाजपमध्ये फूट?, मंदा म्हात्रे यांचं मोठं वक्तव्य

Health Tips: तुम्हाला वारंवार पोटाचे विकार होतात का? आहारात 'या' गोष्टीचा करा समावेश

Maharashtra Politics 2024 : ...म्हणून नरेंद्र मोदी उद्धव ठाकरे यांना फोन करायचे: देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं त्या घटनेमागचं सत्य

SCROLL FOR NEXT