कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांना किडनी विकण्यास भाग पाडल्याचा आरोप
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील शेतकरी या रॅकेटचे बळी
६ सावकारांवर गुन्हा दाखल, SIP कडून तपास सुरू
प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष
कर्ज फेडण्यासाठी दागिने, वस्तू घाण ठेवल्याच्या कहाण्या आपण ऐकतो, मात्र कर्ज वसुलीसाठी एका सावकाराने शेतकऱ्यांच्या चक्क किडन्या काढून वसुली केली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी ही घटना उघडकीस आली असून आता या किडनी रॅकेटमध्ये ४ शेतकरी अडकल्याचे वृत्त आहे. तसेच या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी आता SIP स्थापित करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथुर गावात राहणाऱ्या रोशन कुडे यांच्याकडे चार एकर शेती आहे. या शेतीवरच त्यांचं कुटुंब चालतं. मात्र वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलामुळे त्यांच्यासाठी शेती फायदेशीर ठरली नाही. त्यामुळे शेतीपूरक व्यवसाय करण्याचं त्यांनी ठरवलं. दुग्ध व्यवसायातून थोडी मिळकत होईल म्हणून त्यांनी गाई खरेदी केल्या. यासाठी त्यांनी दोन सावकाराकडून ५०-५० हजार रुपये घेतले. मात्र पुन्हा त्यांना नशिबाने धोका दिला. खरेदी केलेल्या गाई मृत पावल्या. त्यात शेतीही पिकेना आणि कर्जाचा डोंगर भलताच वाढत गेला.
सावकार घरी येऊन नको ते बोलू लागले. सावकाराच्या सततच्या बोलण्याला कंटाळून शेतकऱ्याने कर्जातून मुक्त होण्यासाठी दोन एकर जागा विकली. ट्रॅक्टर आणि घरातील सामान देखील विकलं. मात्र शेतकऱ्याच्या डोक्यावरचं जैसे थे च होते. बघता बघता थोडं थोडकं घेतलेलं कर्ज ७४ लाखावर गेलं. दुसरीकडे सावकाराकडून भरमसाठ व्याजासह वसुली केली जात होती.
हे कर्ज फेडण्यासाठी सावकारानेच शेतकऱ्याला किडनी विकण्याचा सल्ला दिला. एका एजंटने रोशन कुडे यांना कोलकत्ता येथे नेलं. कुडे यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर कंबोडिया येथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आणि किडनी काढण्यात आली. ही किडनी कुडे यांनी आठ लाखाला विकली.
याप्रकरणी या शेतकऱ्याने पोलिसांत तक्रार नोंदवली, मात्र प्रशासनाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. हे प्रकरण माध्यमांनी उघड केल्यानंतर रोशन कुडे या शेतकऱ्यासह आणखी ४ जणांनी कर्ज फेडण्यासाठी किडनी विकल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ६ सावकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून SIP स्थापित करण्यात आली आहे. आता प्रशासन कोणती ठोस पावलं उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.