वाशिम जिल्ह्यातील हराळ या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी दिलेल्या नोटीसाची होळी करण्यात आली. मोठ्या उद्योगपतींचे कर्ज जसे सरकारने माफ केले तसेच शेतकऱ्यांवरील संपूर्ण कर्ज माफ करावे आणि सातबारा कोरा करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे. दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज भरले नाही अशा शेतकऱ्यांना जिल्ह्यातील बँकांकडून कर्ज वसुलीसाठी नोटीसा देण्यात आल्या आहेत.
अब्दुल सत्तार यांच्या पालकमंत्री पदावरून मनसेची टीका केलीय. मारुतीरायाला शिव्या घालणारे अब्दुल सत्तार यांची संभाजी नगरच्या पालकमंत्री पदी वर्णी लागली. यावरून शिवसेनेच्या हिंदुत्वाबाबत मनसेने प्रश्न केलाय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकप्रतीनिधींचा अपमान केल्याचा आरोप आमदार संजय जगताप यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिगृहावरती पुरंदर आणि हवेलीच्या प्रश्नासंदर्भात बैठक लावली होती. याची माहिती आमदार संजय जगताप यांना मिळताच त्यांनी मुख्यमंत्री यांना पत्र लिहिले होते तरी देखील मुख्यमंत्री यांनी ही बैठक घेतली यावरून संजय जगताप आक्रकम झाले आहेत. पुरंदर तालुक्यातील सासवडमध्ये आमसभेचे आयोजन केले होते. त्यामुळे सह्याद्री अतिथी गृहावर होणारी बैठक तुम्ही पुढे ढकलावी अशी विनंती आमदार संजय जगताप यांनी मुख्यमंत्री यांना पत्र लिहून केली होती. परंतु मुख्यमंत्र्यांनी त्या विनंतीला मान न देता माजी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत ही बैठक घेतल्याने संजय जगताप आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री यांनी पुरंदरच्या आणि हवेलीच्या जनतेचा अपमान केला आहे. तसेच लोकप्रतिनिधींचा देखील अपमान केला आहे, अशी टीका आमदार संजय जगताप यांनी केली.
पुणे कल्याणीनगर अपघातप्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर आलीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांची पोलिसांनी कसून चौकशी केलीय. तब्बल ३ ते ४ तास सुनील टिंगरे यांची चौकशी करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून टिंगरे यांची चौकशी करण्यात आल्याच सांगितलं जात आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक संपलीय. अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस देवगिरीवरून रवाना झालेत. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. या नेत्यांमध्ये कोणत्या विषयावर चर्चा झाली याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाहीये. परंतु अचानक झालेल्या बैठकीमुळे चर्चांना उधाण आले आहे.
वरळी येथील सॉफ्ट टच नावाच्या स्पामध्ये एकाची गळा चिरून हत्या करण्यात आल्यामुळे खळबळ माजली आहे. गुरुसिद्धप्पा वाघमारे असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. घटनेची माहिती मिळताच वरळी पोलीस आणि गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी खूप निधी दिला आहे. UPA सरकारच्या काळात तो खूप कमी मिळत होता. 15 हजार 940 कोटी निधी महाराष्ट्रासाठी सरकारने दिला आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी अडकलेले अनेक प्रकल्प मार्गी लावल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं
मनोज जरांगे पाटील २ तारखेला कोर्टात उपस्थितीत राहणार आहेत. त्यांच्या वकिलांनी अटक वॉरंट इशू करू नये यासाठी पुणे न्यायालयात अर्ज केला आहे. दोन तारखेला हजर होऊ असं मनोज जरांगे यांच्या वकीलांकडून सांगण्यात आलं आहे. नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी मनोज जरांगे आणि इतर दोन जणांच्या विरोधात काल पुणे कोर्टाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले होतं.
मिरा भाईंदर अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून एक मोठी कारवाई करण्यात आली आहे.काशीगाव परिसरात दोन व्यक्तीना ताब्यात घेतले असता त्याच्याकडे २ कोटी १८ लाख रुपये किमतीचे ०१ किलो ९० ग्रॅम एम.डी.अंमली पदार्थ सापडले आहेत. यामध्ये ताब्यात घेतलेली महिला दक्षिण आफ्रिकी वंशाची असल्याचे समोर आले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
अनिल देशमुख खोटं बोलत आहेत, त्यांच्यावर हे बोलण्यासाठी कोणाचा दबाव आहे हे तपासावं लागेल. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केला होता. अटकेची पद्धत ही उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुख यांनी सुरू केली होती. CBI समोर आता CBI अधिकाऱ्याने जवाब दिला आहे. मी बावनकुळे यांना विनंती करेल की अनिल देशमुख यांच्या बाबत केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडे तक्रार करावी, असंही त्यांनी म्हटलं आहे.
पुण्यात आजही मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पुणे शहरातील मध्यवर्ती भागासह उपनगर भागात दमदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदीपात्रातील असलेला रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. नदीपात्राच्या रस्त्यालगत पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पुण्यातील खडकवासला धरण क्षेत्रात सुद्धा जोरदार पाऊस सुरू आहे.
पंकजा मुंडेना कोणी हरवलं सर्वाना माहिती आहे. यांच्या सर्व खर्चाचा ऑडिट व्हयला हवं. वंजारी आणि मराठ्यात यांनी वाद लावले, असे अनेक आरोप अजय बारस्कर यांनी मनोज जरांगेंवर केले आहेत. मला पैसा कमवायचा नाही आणि राजकारणात यायचं नाही. मी पब्लिक स्टंट करत नाही. माझ्या कुटुंबियांना सरकारी संरक्षण दिले होते. दोन महिने मी घरच्यांमुळे बोललो नाही.समाजाला भावनिक करायचं आणि उपोषण मागे घेऊन दौरा करायचे हे आधीच ठरलंय, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाची संततधार कायम. शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाची रिपरिप सुरु आहे. जिल्ह्यातील इगतपुरी, त्रंबकेश्वर, तालुक्यासह अन्य काही भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. इगतपुरी तालुक्यातील दारणा धरण ७५ टक्के भरले आहे.
पुण्यातील लोणावळा परिसरात तुफान पाऊस बरसत आहे. ढगफुटी सदृश्य पावसाने सखल भागात पाणी साचलं आहे. या पाण्यामुळं मळवली भागातील बंगल्यात 20 ते 22 पर्यटक अडकले. त्यातील 15 पर्यटकांना बाहेर काढण्यात आलं आहे. या पर्यटकांना शिवदुर्ग रेस्क्यू टीमला यश आलं आहे.
नागपूरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला आहे. रेशीम बाग चौकात उबाठाच्या कार्यालय परिसरात आंदोलन करण्यात आले. पुण्यातील भाजपच्या अधिवेशनात अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंविरोधात केलेल्या विधानाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झाला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लढा देणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी ५ व्या दिवशी उपोषण मागे घेतले. समाज बांधवांच्या हस्ते पाणी पिऊन त्यांनी उपोषण सोडले.
नालासोपारा पश्चिमपासून विरार म्हाडा वसाहतीला जोडणाऱ्या रस्त्यावर असलेल्या हनुमान मंदिरात चोरट्यांनी हात साफ केले आहेत. रात्रीचा पाऊस आणि अंधाराचा फायदा घेत चोरट्याने मंदिरात शिरून दानपेटी आणि हनुमानाच्या डोक्यावरील 12 तोळे चांदीचा मुकुट चोरला.
राहुल गांधी यांना शेतकरी नेत्यांना भेटण्यास मनाई करण्यात आली. राहुल गांधी यांनी संसदेतल्या कार्यालयात शेतकरी नेत्यांना भेटीसाठी बोलावलं होतं. संसद सुरक्षा प्रशासनाकडून शेतकरी नेत्यांना प्रवेश देण्यात आला नाही. ते शेतकरी आहेत म्हणून त्यांना आत येऊ दिलं जात नसावं, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
मराठा आंदोलन मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी लातूरमध्ये अचानक रस्ता रोको करण्यात आलाय. लातूर सोलापूर महामार्ग मराठा आंदोलकांनी अडवला. दरम्यान अचानक महामार्ग घडवल्याने महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तर आता आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 4 दिवस आमरण उपोषण केल्यानंतर आज पाचव्या दिवशी आपल उपोषण स्थगित केलंय. मध्यरात्री त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांनी 3 सलाईन लावून उपचार देखील घेतले आहे.
पुणे शहरासह घाट माथ्यावर जोरदार पाऊस सुरू आहे. पावसाचा फटका सिंहगडाला बसताना दिसत आहे. सिंहगडावरील देवटाक्याची भिंत पावसाने पडलीय. सिंहगड घाटात दरड कोसळल्याने मलबा बाजूला केला जात आहे.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या राज्यरीय बैठकीला सुरुवात झालीय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून तुपकर यांची हकालपट्टी केल्यानंतर महत्वाची बैठक होतेय. राज्यभरातील शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात तासाभरापासून पावसाची संततधार सुरू आहे. कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील रस्ते जलमय झालेत. रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलंय. कल्याण पूर्वेकडील मलंगगड येथील चेतना चक्की नाका परिसरात रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.
पुणेकरांची तहान भागवणारे खडकवासला धरण 100 टक्के भरले आहे. धरणाचे ११ दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यातून जवपास ९ हजार ४४५ क्युसिकने पाणी सोडण्यात आलंय, तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
ठाणे शहरात देखील आज सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. त्यातच ठाण्यातील घोडबंदर रोड वरील मानपाडा या ठिकाणी असलेल्या सखल भागात पाणी साचले आहे. पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे
नवी दिल्ली - भाजपचं शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे. त्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दिल्लीत येणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी मतदार याद्यांमधे सुधारणा करण्याची मागणी करणार असल्याची माहिती मिळतेय.
अंबरनाथमध्ये टँकर डिव्हायडरवर चढल्याची घटना घडलीय. कल्याण बदलापूर राज्य महामार्गावर हा अपघात झालाय. ही दुर्घटना अंबरनाथच्या भेंडीपाड्याजवळ घडली. अपघातात कुणीही जखमी नसल्याची पोलिसांनी माहिती दिलीय.
लातूर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून रिमझिम पाऊस होतोय. तर ढगाळ वातावरण आणि सततच्या रिमझिम पावसाने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचलंय. त्यामुळे खरीप पिकांना पाणी लागल्याने पिकांची नासाडी व्हायला सुरुवात झाली. तर शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत.
मध्यरात्रीच्या विश्रांतीनंतर पालघरमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या पाच दिवसांपासून पालघरमध्ये दमदार असा पाऊस पडत आहे. सूर्या प्रकल्पाचे धामणी धरण 78.87 टक्क्यांनी भरलंय. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. तापोळा महाबळेश्वर रोडवरील खंबीर बोल या गाव हद्दीतील डोंगराचा काही भाग खचला. त्यामुळे मलबा रस्त्यावर आल्याने तापोळा महाबळेश्वर रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती.
ठाण्यात इमारतीच्या छताचे प्लास्टर कोसळले. यात घरातील दोन व्यक्ती जखमी झाल्याची घटना घडली. ठाण्यातील लोकमान्य नगर येथील तुळजाभवानी निवास या इमारतीमध्ये सदरचा प्रकार घडलाय.
भंडारा जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. तसेच महाराष्ट्र, मध्यप्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागात पावसाची संततधार सुरू आहे. वैनगंगा नदीने देखिल धोका पातळी ओलांडली आहे. भंडारा जवळील कारधा छोट्या पुलावर देखील पाणी असल्याने हा पुल बंद करण्यात आला आहे. तर गोसेखुर्द धरनाचे 33 दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
धाराशिव जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे सोयाबीन, मुग, उडीद, तुर या पिकांना सध्यातरी फायदा होत आहे. जिल्ह्यातील धाराशिव, कळंब, तुळजापूर, भुम, वाशी,उमरगा भागात चांगला पाऊस झालाय.
बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या कल्याण - विशाखापट्टणम महामार्गावरील बीडच्या तालखेड फाट्यावर, दारुड्या तरुणांनी पेट्रोल टँकरवर दगडफेक केलीय. ही घटना रात्रीच्या दरम्यान घडली असून यामध्ये ड्रायव्हरला देखील दगड लागल्याची प्राथमिक माहिती आहे. यामुळे टँकर चालकात दहशतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.
पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र असलेल्या लोणावळ्यात पाऊस तुफान बॅटिंग करतोय, या पावसाने यंदाच्या मोसमातील उच्चांकी पावसाची नोंद केलीये. गेल्या 24 तासांत तब्बल 275 मिलिमीटर पाऊस बरसला आहे. म्हणजे 10.83 इंच इतका पाऊस कोसळल्यानं, ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याचं बोललं जातंय. या एक जून पासून 2601 मिलीमीटर इतका पाऊस बरसला आहे, गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत 2503 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती.
आजपासून मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या अंतिम युक्तिवादाला सुरुवात होणार आहे. खटल्यातील साक्षीदारांचे साक्षीपुरावे नोंदवण्याची प्रक्रिया मंगळवारी झाली पूर्ण
पुरावे, कागदपत्रांबाबतची पडताळणी विशेष एनआयए न्यायालयाचे न्यायाधीश ए. के लाहोटी यांनी केली पूर्ण
फिर्यादी आणि बचाव पक्षातर्फे आतापर्यंत नोंदवण्यात आलेल्या साक्षीपुराव्यांवरील अंतिम युक्तिवादाला आजपासून सुरूवात होणार
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.