LOST SON REUNITES WITH FAMILY AFTER 24 YEARS DUE TO VOTER LIST VERIFICATION IN MAHARASHTRA saam tv
महाराष्ट्र

२४ वर्षांनंतर जेव्हा मुलगा अचानक समोर आला... SIR यादीतील एका जुळलेल्या नावाने आईचे डोळे पाणावले

SIR Process Reunites Family: मतदार यादी पडताळणीदरम्यान उघड झालेल्या माहितीतून २४ वर्षांपूर्वी हरवलेला मुलगा आईच्या कुशीत परतला. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील ही घटना प्रशासनाच्या संवेदनशीलतेचे भावनिक उदाहरण ठरली आहे.

Omkar Sonawane

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा: मतदार यादीचं पुनरिक्षण... हे ऐकलं की डोळ्यासमोर येतं ते सरकारी कामकाज. पण याच प्रक्रियेमुळे एका आईची तब्बल २४ वर्षांची प्रतीक्षा संपली. घर सोडून गेलेला मुलगा पुन्हा आईच्या कुशीत परतला. बुलढाण्यातील मलकापुरात घडलेली ही घटना केवळ भावनिक नाही, तर शासन व्यवस्थेच्या संवेदनशील चेहऱ्याचंही उदाहरण ठरली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केडगावचा नवनाथ धोंडीबा गायकवाड. कौटुंबिक वादानंतर तब्बल २४ वर्षांपूर्वी घर सोडून निघून गेला. अनेक गावांमध्ये भटकंती करत तो बुलढाणा जिल्ह्यातील मलकापुरात स्थायिक झाला. इथे संसारही थाटला. पण मागे आई, भाऊ आणि बहीण मात्र, वर्षानुवर्षे त्याची वाट पाहत राहिले. दरम्यान, राज्यात सुरू असलेल्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच एसआयआर प्रक्रियेदरम्यान बीएलओ नीता भोंबे आणि सहाय्यक बीएलओ अनिल भोंबे माहिती संकलनासाठी नवनाथ यांच्या घरी पोहोचले. पडताळणी करताना नवनाथचं नाव सोलापूरच्या मतदार यादीशी जोडलेलं असल्याचं समोर आलं. त्यानंतर करमाळा येथील बीएलओंशी त्यांनी संपर्क केला आणि उलगडलं तब्बल २४ वर्षांपासून हरवलेल्या मुलाचं रहस्य.

मुलगा जिवंत असल्याचं कळताच आई, भाऊ, बहीण आणि नातेवाईकांनी एका क्षणाचाही विलंब केला नाही. जवळपास ४०० किलोमीटरचा प्रवास करून ते थेट मलकापुरात पोहोचले आणि सकाळी अचानक मुलासमोर उभे राहिले. २४ वर्षांनंतर आईने आपल्या लेकराला मिठी मारली. आईच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. भाऊ, बहीण आणि उपस्थित प्रत्येकाच्याच डोळ्यांच्या कडा ओलावल्या. नवनाथ यांच्या पत्नीला सुरुवातीला नेमकं काय घडत आहे, हेच समजलं नाही. पण सत्य समजताच वातावरण आणखी भावनिक झालं. आईने आपल्या सुनेच्या गळ्यात स्वतःचं सोन्याचं मंगळसूत्र घातलं आणि प्रेमाने म्हणाली... आता इथे नका राहू... आमच्यासोबत घरी चला..

नवनाथ यांनीही लवकरच गावी येण्याचं आश्वासन दिलं.

या भेटीतील आणखी एक हळवा पैलू म्हणजे नवनाथ यांचे धाकटे भाऊ अशोक ते डायलिसिससाठी रुग्णालयात दाखल होते. पण उपचार पुढे ढकलून त्यांनी आधी भावाला भेटणं महत्त्वाचं मानलं. रक्ताच्या नात्याची ओढ किती विलक्षण असते, याचं हे जिवंत उदाहरण ठरलं.

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी सुरू झालेली एसआयआर प्रक्रिया... एका कुटुंबासाठी मात्र आयुष्यभर विसरता न येणारा क्षण घेऊन आली. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे एका आईला तिचा हरवलेला मुलगा, एका भावाला त्याचा मोठा भाऊ आणि एका बहिणीला तिचा लाडका भाऊ तब्बल २४ वर्षांनी परत मिळाला. सरकारी कागदपत्रांची पडताळणी आणि त्यातून जुळलेलं तुटलेलं नातं. मलकापुरातील ही घटना संवेदनशील प्रशासन आणि माणुसकीचा एक सुंदर चेहरा समोर आणणारी ठरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT